स्मृतिगंध

                                                               स्मृतिगंध





काही दिवसांपूर्वीच , जर्मनीतल्या एका छोट्या शहरातील विद्यापीठात जाण्याचा योग आला . निमित्त होतं   ते आमच्या मराठी कट्टा जर्मनीच्या ,  एका विद्यार्थिनीला PhD मिळाल्याचं . तिनं   तिचे PhD  चे गाईड  आणि अजून काही वर्गमित्रमैत्रिणींना एका छोट्या पार्टीसाठी  बोलावलं होत . ह्या कार्यक्रमासाठी भारतातून तिचे  कोणीही  कुटुंबीय  येऊ शकणार नसल्याने , ( Local Guardian )  म्हणून  मलासुद्धा ह्या  कार्यक्रमाला बोलावलं होतं . हा छोटेखानी कार्यक्रम तिच्याच कॉलेजच्या कॅंटीनमध्ये होता . त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या कॉलजच्या कॅम्पस मध्ये जाण्याचा योग  येत होता .

तिथलं ते सुंदर शैक्षणिक वातावरण , शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची एकमेकांबद्दल  असलेली आपुलकी आणि  बोलण्यातला   तितकाच सहजपणा बघून खूप छान वाटलं  ... आणि नकळतपणे माझ्याही  डोळ्यांसमोर अकरावी बारावीचे दिवस येऊ लागले .

एम डी विद्यालयातून दहावी झाल्यानंतर ,   अर्जुननगरला  कॉलेजला प्रवेश घेतल्यावर   , आपण काही खूप वेगळ्या विश्वात आलोय असं मला कधीच वाटलं नव्हतं . ह्याच खरं  कारण म्हणजे माझे वडील तिथेच पंचवीस वर्ष शिकवत असल्यामुळे अगदी प्राचार्यांपासून ते केमिस्ट्री लॅबच्या असिस्टंट पर्यंत सगळ्यांना मी ओळखत होतो .

१९६३ मध्ये  , महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या अर्जुननगरच्या माळावर स्व. देवचंदजी शाह ह्यांनी ह्या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली .  अतिशय दूरदृष्टी असलेल्या आणि माणसांची अचूक पारख असणाऱ्या स्व. देवचंदजींनी   महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील अनेक चांगल्या , होतकरू शिक्षकांना आपल्या कॉलेजमध्ये खास बोलावून घेतलं . गुमास्ते सर , कशाळीकर सर/मॅडम  , पेंढारकर सर , हर्डीकर सर / मॅडम , भालेराव सर , एस जे पाटील सर , रायबागी सर , नाडकर्णी सर हे आणि अनेक असेच प्राध्यापक त्यावेळी   निपाणीजवळच्या , निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अर्जुननगरच्या ह्या कॉलेजमध्ये आले . निपाणी हे खरं  तर ह्यातल्या कुणाचंही   मूळ गाव नसलं   तरी हा शिक्षकवृंद इथेच राहिला आणि निपाणीच्या , सीमाभागाच्या , सांस्कृतिक , सामाजिक आणि शैक्षणिक विश्वाशी  त्यांची नाळ जोडली गेली ...ऋणानुबंध निर्माण झाले . ह्या सगळ्या गोष्टींशी मी लहानपणापासून जोडला गेलो होतो .

 ह्या सर्व शिक्षकांची मुलं   हे   म्हणजे माझे लहानपणापासूनचे सवंगडी ..... वयामध्ये जरी  थोडंबहुत अंतर असलं    तरी एकमेकांच्या घरी जाणं , खेळणं आणि एकमेकांचे वाढदिवस साजरे करणं हे नित्याचं होतं .
ह्या सर्व शिक्षक मंडळींच्या   गप्पांच्या मैफली , स्नेहभोजनं    आणि दोन तीन वर्षातून एखादी   एखादी ट्रीप/ , वेगवेगळ्या    सामाजिक आणि संघटनात्मक चळवळीत त्यांची झोकून देण्याची वृत्ती ,  त्यांची विद्यार्थ्यांविषयीची तळमळ  ,  आणि त्यांना निस्वार्थीपणे  मदत करण्याची वृत्ती  , एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची सवय ह्या सर्व गोष्टीं मी लहानपणापासून अनुभवत आलो होतो .

ह्यातल्या बहुतेकांना ,   मी  आधीपासूनच  सर आणि मॅडम नाही तर काका आणि काकू असं म्हणत असे . त्यामुळं अकरावीत कॉलेजमध्ये आल्यावर ह्या सर्वाना    ,   सर आणि मॅडम म्हणून संबोधण्याची  सवय करणं  थोडंसं मजेशीर होत .

अपवाद फक्त दोन प्राध्यापक  ज्यांना मी    'सर 'असं कधीच नाही म्हणू शकलो . ते म्हणजे   प्रा . रायबागी  आणि प्रा. भालेराव . अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे दोघे मला कॉलजच्या कॅंटीनमध्ये घेऊन गेले आणि मस्त खुसखुशीत शंकरपाळी आणि तिथला  स्पेशल कटिंग चहा पाजला .आणि मग  थोडंफार येऊ घातलेलं नवखेपण सुद्धा कुठच्या कुठे पळून गेलं . रायबागी काकांकडे तर मी , ते निपाणीतल्या राम मंदिराच्या मागे राहायचे तेव्हांपासून   नेहमीच जात असे . काका काकूंचा प्रेमळ आणि लघवी स्वभाव आणि प्रशांत , दिपू आणि निलू   ह्या त्यांच्या मुलांशी असलेली माझी गट्टी ह्यामुळे लहानपणी त्यांच्या घरी तासंतास  बसणं  होत असे .

दसऱ्याच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी ..... 'नारायणराव आणि वहिनी   तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  '  असं सांगायला रायबागी काका दरवर्षी आमच्या घरी  आवर्जून  यायचे . त्यावेळी  आमच्या घरी आणि  रायबागी काकांकडेही   फोन नव्हता . मला आणि माझ्या लहान भावाला , केदारला ह्याचं फारच अप्रूप वाटायचं कारण माझ्या   लहानपणी , आईवडिलांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या  असतात  किंवा त्यांचे आशीर्वाद घायचे असतात ही समज कदाचित आम्हाला  नसावी .

संगीत , चांगले चित्रपट आणि काव्य  ह्याची त्यांना आवड होती . 'नारायणराव ,  राजश्री टॉकीजला शंकराभरणम   हा चित्रपट आलाय आणि येत्या  रविवारी आपण सगळे मिळून जातोय बघायला' हे ते माझ्या वडिलांना अगदी हक्काने सांगायचे ( क्रिकेट आणि केमिस्ट्री हे दोन विषय सोडून बाकी इतर कुठल्याही विषयात फारसा रस न घेणाऱ्या माझ्या वडिलांना , असं इथं नमूद करावं लागेल ). माझ्या आजोबांना खांदा देण्यापासून ते  माझं १२ वी मधलं   यश साजरं करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत रायबागी काका  पुढं असतं .

 खरं  तर माझंच कशाला , निपाणी , अर्जुननगर आणि पंचक्रोशीतल्या सर्वच  विद्यार्थ्यांसाठी  ते असे निस्वार्थीपणे , निस्पृहपणे काम करत .

अजूनही आठवतंय .  मी  अकरावीमध्ये असताना  एक टूम निघाली होती आमच्या कॉलेजमध्ये ...  काही विद्यार्थी म्हणायचे कशाला हवंय   ते बायोलॉजी ...आपल्याला काय मेडिकल ला जायचंय का ?  PCM   घेऊ आणि स्कोर करू .  बायोलॉजी चा काहीच उपयोग नाही .ह्या परिस्थितीत विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना बायोलॉजी / जीवशास्त्र ह्या विषयाची आवड लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे   रायबागी  , भालेराव आणि हर्डीकर मॅडम ह्या त्रयीने . प्राणिशास्त्रामधील     Earthowrm (गांडूळ) ची Digestive System  कशी असते सांग असं जर कोणी झोपेंतून उठवून जरी   मला विचारलं तरी आजही  धडाधड  सांगू शकेन कारण ते श्रेय जात ते . रायबागी काकांना  .  अवघड , क्लिष्ट   विषय सोपा करून सांगण्याची कला साधलेले त्यांच्यासारखे शिक्षक मिळायला भाग्य लागत .


बारावीनंतर शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर रायबागी काकांचा संपर्क हळूहळू कमी होत गेला .  आणि इथे जर्मनीत आल्यापासून एक संपूर्ण नवीन आयुष्य सुरु झालं . सोशल मीडियातून त्यांच्या मुलांशी  अधूनमधून बोलणं होत असत .२०१६ मध्ये माझी आई गेल्यावर त्यांना भेटण्याचा  योग   आला होता .  त्यांची श्रवणशक्ती खूपच कमी झालीये आणि हालचाल मंदावलीये हे जाणवत होत . पण त्याही परिस्थितीत त्यांनी खांदयावर प्रेमाने ठेवलेला हात , whatsaap वर येत असलेल्या    RIP  आणि Condolences   त्या ढीगभर मेसेजेसपेक्षा  हजारो पटींनी जास्ती आधार देऊन गेला . माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री जवळजवळ पन्नास वर्षांची .  त्यामुळे   २०१८ मध्ये माझे वडील)  गेले हे त्यांना बरेच दिवस सांगितलंच नव्हतं . उमेदीच्या काळात धडाडीने वाघासारखं   काम करणारी माणसं  सुद्धा आयुष्याच्या तिन्हीसांजेला खूप हळवी   होतात .


खरंच   , रायबागी काकांसारखी माणसं   माझ्या आयुष्यात आली हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो .
त्यांच्यामधल्या चांगल्या गुणांचा एक शतांश जरी भाग माझ्यामध्ये आला आणि मी   जमिनीवर पाय ठेऊन समाजासाठी  निस्पृहपणे , निस्वार्थीपणे  काही करू शकलो तर मी स्वतःला कृतकृत्य समजेन .



आपला

अजित रानडे
फ्रँकफर्ट जर्मनी


























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या शाळेचा वाढदिवस

आयुष्याचा सांगाती , "राजा शिवछत्रपति"