मंगळवार, ११ जून, २०१९

स्मृतिगंध

                                                               स्मृतिगंध





काही दिवसांपूर्वीच , जर्मनीतल्या एका छोट्या शहरातील विद्यापीठात जाण्याचा योग आला . निमित्त होतं   ते आमच्या मराठी कट्टा जर्मनीच्या ,  एका विद्यार्थिनीला PhD मिळाल्याचं . तिनं   तिचे PhD  चे गाईड  आणि अजून काही वर्गमित्रमैत्रिणींना एका छोट्या पार्टीसाठी  बोलावलं होत . ह्या कार्यक्रमासाठी भारतातून तिचे  कोणीही  कुटुंबीय  येऊ शकणार नसल्याने , ( Local Guardian )  म्हणून  मलासुद्धा ह्या  कार्यक्रमाला बोलावलं होतं . हा छोटेखानी कार्यक्रम तिच्याच कॉलेजच्या कॅंटीनमध्ये होता . त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या कॉलजच्या कॅम्पस मध्ये जाण्याचा योग  येत होता .

तिथलं ते सुंदर शैक्षणिक वातावरण , शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची एकमेकांबद्दल  असलेली आपुलकी आणि  बोलण्यातला   तितकाच सहजपणा बघून खूप छान वाटलं  ... आणि नकळतपणे माझ्याही  डोळ्यांसमोर अकरावी बारावीचे दिवस येऊ लागले .

एम डी विद्यालयातून दहावी झाल्यानंतर ,   अर्जुननगरला  कॉलेजला प्रवेश घेतल्यावर   , आपण काही खूप वेगळ्या विश्वात आलोय असं मला कधीच वाटलं नव्हतं . ह्याच खरं  कारण म्हणजे माझे वडील तिथेच पंचवीस वर्ष शिकवत असल्यामुळे अगदी प्राचार्यांपासून ते केमिस्ट्री लॅबच्या असिस्टंट पर्यंत सगळ्यांना मी ओळखत होतो .

१९६३ मध्ये  , महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या अर्जुननगरच्या माळावर स्व. देवचंदजी शाह ह्यांनी ह्या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली .  अतिशय दूरदृष्टी असलेल्या आणि माणसांची अचूक पारख असणाऱ्या स्व. देवचंदजींनी   महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील अनेक चांगल्या , होतकरू शिक्षकांना आपल्या कॉलेजमध्ये खास बोलावून घेतलं . गुमास्ते सर , कशाळीकर सर/मॅडम  , पेंढारकर सर , हर्डीकर सर / मॅडम , भालेराव सर , एस जे पाटील सर , रायबागी सर , नाडकर्णी सर हे आणि अनेक असेच प्राध्यापक त्यावेळी   निपाणीजवळच्या , निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अर्जुननगरच्या ह्या कॉलेजमध्ये आले . निपाणी हे खरं  तर ह्यातल्या कुणाचंही   मूळ गाव नसलं   तरी हा शिक्षकवृंद इथेच राहिला आणि निपाणीच्या , सीमाभागाच्या , सांस्कृतिक , सामाजिक आणि शैक्षणिक विश्वाशी  त्यांची नाळ जोडली गेली ...ऋणानुबंध निर्माण झाले . ह्या सगळ्या गोष्टींशी मी लहानपणापासून जोडला गेलो होतो .

 ह्या सर्व शिक्षकांची मुलं   हे   म्हणजे माझे लहानपणापासूनचे सवंगडी ..... वयामध्ये जरी  थोडंबहुत अंतर असलं    तरी एकमेकांच्या घरी जाणं , खेळणं आणि एकमेकांचे वाढदिवस साजरे करणं हे नित्याचं होतं .
ह्या सर्व शिक्षक मंडळींच्या   गप्पांच्या मैफली , स्नेहभोजनं    आणि दोन तीन वर्षातून एखादी   एखादी ट्रीप/ , वेगवेगळ्या    सामाजिक आणि संघटनात्मक चळवळीत त्यांची झोकून देण्याची वृत्ती ,  त्यांची विद्यार्थ्यांविषयीची तळमळ  ,  आणि त्यांना निस्वार्थीपणे  मदत करण्याची वृत्ती  , एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची सवय ह्या सर्व गोष्टीं मी लहानपणापासून अनुभवत आलो होतो .

ह्यातल्या बहुतेकांना ,   मी  आधीपासूनच  सर आणि मॅडम नाही तर काका आणि काकू असं म्हणत असे . त्यामुळं अकरावीत कॉलेजमध्ये आल्यावर ह्या सर्वाना    ,   सर आणि मॅडम म्हणून संबोधण्याची  सवय करणं  थोडंसं मजेशीर होत .

अपवाद फक्त दोन प्राध्यापक  ज्यांना मी    'सर 'असं कधीच नाही म्हणू शकलो . ते म्हणजे   प्रा . रायबागी  आणि प्रा. भालेराव . अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे दोघे मला कॉलजच्या कॅंटीनमध्ये घेऊन गेले आणि मस्त खुसखुशीत शंकरपाळी आणि तिथला  स्पेशल कटिंग चहा पाजला .आणि मग  थोडंफार येऊ घातलेलं नवखेपण सुद्धा कुठच्या कुठे पळून गेलं . रायबागी काकांकडे तर मी , ते निपाणीतल्या राम मंदिराच्या मागे राहायचे तेव्हांपासून   नेहमीच जात असे . काका काकूंचा प्रेमळ आणि लघवी स्वभाव आणि प्रशांत , दिपू आणि निलू   ह्या त्यांच्या मुलांशी असलेली माझी गट्टी ह्यामुळे लहानपणी त्यांच्या घरी तासंतास  बसणं  होत असे .

दसऱ्याच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी ..... 'नारायणराव आणि वहिनी   तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  '  असं सांगायला रायबागी काका दरवर्षी आमच्या घरी  आवर्जून  यायचे . त्यावेळी  आमच्या घरी आणि  रायबागी काकांकडेही   फोन नव्हता . मला आणि माझ्या लहान भावाला , केदारला ह्याचं फारच अप्रूप वाटायचं कारण माझ्या   लहानपणी , आईवडिलांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या  असतात  किंवा त्यांचे आशीर्वाद घायचे असतात ही समज कदाचित आम्हाला  नसावी .

संगीत , चांगले चित्रपट आणि काव्य  ह्याची त्यांना आवड होती . 'नारायणराव ,  राजश्री टॉकीजला शंकराभरणम   हा चित्रपट आलाय आणि येत्या  रविवारी आपण सगळे मिळून जातोय बघायला' हे ते माझ्या वडिलांना अगदी हक्काने सांगायचे ( क्रिकेट आणि केमिस्ट्री हे दोन विषय सोडून बाकी इतर कुठल्याही विषयात फारसा रस न घेणाऱ्या माझ्या वडिलांना , असं इथं नमूद करावं लागेल ). माझ्या आजोबांना खांदा देण्यापासून ते  माझं १२ वी मधलं   यश साजरं करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत रायबागी काका  पुढं असतं .

 खरं  तर माझंच कशाला , निपाणी , अर्जुननगर आणि पंचक्रोशीतल्या सर्वच  विद्यार्थ्यांसाठी  ते असे निस्वार्थीपणे , निस्पृहपणे काम करत .

अजूनही आठवतंय .  मी  अकरावीमध्ये असताना  एक टूम निघाली होती आमच्या कॉलेजमध्ये ...  काही विद्यार्थी म्हणायचे कशाला हवंय   ते बायोलॉजी ...आपल्याला काय मेडिकल ला जायचंय का ?  PCM   घेऊ आणि स्कोर करू .  बायोलॉजी चा काहीच उपयोग नाही .ह्या परिस्थितीत विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना बायोलॉजी / जीवशास्त्र ह्या विषयाची आवड लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे   रायबागी  , भालेराव आणि हर्डीकर मॅडम ह्या त्रयीने . प्राणिशास्त्रामधील     Earthowrm (गांडूळ) ची Digestive System  कशी असते सांग असं जर कोणी झोपेंतून उठवून जरी   मला विचारलं तरी आजही  धडाधड  सांगू शकेन कारण ते श्रेय जात ते . रायबागी काकांना  .  अवघड , क्लिष्ट   विषय सोपा करून सांगण्याची कला साधलेले त्यांच्यासारखे शिक्षक मिळायला भाग्य लागत .


बारावीनंतर शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर रायबागी काकांचा संपर्क हळूहळू कमी होत गेला .  आणि इथे जर्मनीत आल्यापासून एक संपूर्ण नवीन आयुष्य सुरु झालं . सोशल मीडियातून त्यांच्या मुलांशी  अधूनमधून बोलणं होत असत .२०१६ मध्ये माझी आई गेल्यावर त्यांना भेटण्याचा  योग   आला होता .  त्यांची श्रवणशक्ती खूपच कमी झालीये आणि हालचाल मंदावलीये हे जाणवत होत . पण त्याही परिस्थितीत त्यांनी खांदयावर प्रेमाने ठेवलेला हात , whatsaap वर येत असलेल्या    RIP  आणि Condolences   त्या ढीगभर मेसेजेसपेक्षा  हजारो पटींनी जास्ती आधार देऊन गेला . माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री जवळजवळ पन्नास वर्षांची .  त्यामुळे   २०१८ मध्ये माझे वडील)  गेले हे त्यांना बरेच दिवस सांगितलंच नव्हतं . उमेदीच्या काळात धडाडीने वाघासारखं   काम करणारी माणसं  सुद्धा आयुष्याच्या तिन्हीसांजेला खूप हळवी   होतात .


खरंच   , रायबागी काकांसारखी माणसं   माझ्या आयुष्यात आली हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो .
त्यांच्यामधल्या चांगल्या गुणांचा एक शतांश जरी भाग माझ्यामध्ये आला आणि मी   जमिनीवर पाय ठेऊन समाजासाठी  निस्पृहपणे , निस्वार्थीपणे  काही करू शकलो तर मी स्वतःला कृतकृत्य समजेन .



आपला

अजित रानडे
फ्रँकफर्ट जर्मनी


























मंगळवार, २ एप्रिल, २०१९

चार्ली चॅप्लिन , स्विझर्लंड आणि माझा माऊथ ऑर्गन




#HarmonicaofaWanderer #MajhiGermanDiary #charliechaplin 


मागच्या आठवड्यातल्या गुरुवारची गोष्ट . 
Block chain , Augmented reality , connected consumer आणि Digital Initiatives ह्या विषयांवर त्या स्विस कस्टमर टीमबरोबर दिवसभर काथ्याकूट करून झालाय .... 

ह्या वर्षाच्या शेवटच्या quarter ची सेल्स प्रोजेक्शन्स आणि धंदा आणायचं आणि नंबर्सच टार्गेट complete करण्यासाठीचं प्रेशर आणि गेले तीन दिवस रात्रंदिवस चाललेलं काम ह्यामुळं डोक्याचा नुसता भुगा झालाय.... 

स्वतःची बायको , आपलाच कस्टमर आणि आपल्याच स्वतःच्या टीम मधले काम न करणारे लोक ह्यांच्याशी हुज्जत घालून , फायदा तर शून्य होतो आणि वर आपलंच ब्लड प्रेशर वाढतं हे , वयाच्या चाळीशीत का होईना , पण स्वतःला समजावत दिवसातली शेवटची कॉफी ढोसतोय . 🙂

आणि कॉफीचा शेवटचा सीप घेताना लक्षात येतंय की गेले तीन दिवस आपण जिनिव्हा लेकच्या ह्या अतिशय रमणीय आणि आप्लसच्या कुशीतल्या गावात रहातोय हे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत 

पुढच्या पाच मिनिटात ऑफिसच्याच अवतारात तडक , फ्रांस बॉर्डर ला खेटून असलेल्या स्विझर्लंडच्या त्या छोट्या गावातल्या एका सुंदर गल्लीत येतोय ... तिथल्या रेस्टॉरंट मधल्या Happy hours च्या दिसणाऱ्या दोन तीन पाट्यांकडे थोडं दुर्लक्ष करत पुढं सरकतोय . थोडंसं उन्ह असूनही वातावरणात जाणवणारा गारवा , लाकडावरची अप्रतिम कलाकुसर असलेली लहानमोठी घरं, जवळच्याच चर्चच्या टॉवर क्लॉक मधून ऐकू येणारे संध्याकाळचे सहाचे ठोके , लेक जिनिव्हाचा अथांग पसरलेला तो जलाशय आणि त्याला खेटून असलेल्या आणि लांबचं लांब पसरलेल्या बीचवर पहुडलेली जोडपी आणि वाइन, आणि बीअरचे किणकिणणारे चषक हे सगळं पहात पुढे चालतोय 
... 

साधारणपणे दहा मिनिटं चालल्यावर एका ठिकाणी पावलं थबकताहेत ...त्या सुंदर तलावाच्या काठावर एक पुतळा दिसतोय ... गेल्या शतकात ...आणि खरं तर अजूनही , सर्व रसिकांच्या मनावर राज्य करणारा मूकपटांचा नायक , कॉमेडीकिंग चार्ली चॅप्लिनचाचाच तो पुतळा आहे हे ते तिथे लिहिलेलं असूनही , ते खरं आहे का हे कन्फर्म करण्यासाठी चार चार वेळा विकिपीडिया चा आधार घेतला जातोय . आणि नंतर लक्षात येत की जगावर राज्य केलेल्या आणि जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या ह्या महान कलाकाराला काही वादग्रस्त प्रकरणांमुळे हॉलिवूड आणि अमेरिकेचा निरोप घ्यायला लागला ...आणि आयुष्यातली शेवटची वीस वर्ष त्यानं ह्या आप्लसनं वेढलेल्या आणि जिनिव्हा लेकने कुशीत घेतलेल्या नितांतसुंदर स्विस खेड्यात काढली ... आणि ह्याच खेड्यात चीरविश्रांती घेत तो पहुडला आहे . 

लहानपणापासून पारायणं केलेले त्याचे बरेच सिनेमे डोळ्यासमोर येऊ लागतात ... चार्ली चॅप्लिन आणि व्हर्जिनिया चेरील च ते रोमँटिक City Lights ह्या मूकपटामधलं थिम सॉंग आठवतं ..... आणि जळी स्थळी काष्ठी पाषाणी , गेली २० वर्ष माझ्यासोबत असलेला माझ्या माऊथ ऑर्गनवर , आपसूकच ही ट्यून वाजू लागते ... , आजूबाजूला असलेले लोक काय म्हणत असतील ह्याचा अजिबात विचार न करता ...



अजित रानडे 

फ्रँकफर्ट जर्मनी 



रविवार, ३१ मार्च, २०१९

जर्मनीमध्ये भेटलेल्या जपानी आज्या





पोर्शे झेन्ट्रुम (Porsche Zentrum ) च्या त्या चकचकीत आणि पॉश R &D सेंटरमधून बाहेर पडताना त्या मक्ख चेहऱ्याच्या प्रोक्युरमेन्ट च्या दोन मॅनेजर्सशी हस्तांदोलन केलं .. आणि झपाझप स्टेशन कडे चालायला लागलो . डोक्यात विचारांचं वादळ थैमान घालत होतं .... असंख्य प्रश्नांच्या जंजाळात पूर्णपणे गुंतलोय असं वाटायला लागलं ... काय चुकलंय हेच कळतं नव्हतं ... तोंडाशी आलेला घास कुणीतरी शेवटच्या क्षणी पळवलाय असं वाटत होत .. युरोप मध्ये गेल्या सात वर्षात सेल्स पर्सन म्हणून काम करत असताना , कस्टमर कडून अगदी शेवटच्या क्षणाला .... ' सॉरी , आम्ही दुसरा पार्टनर सीलेक्ट केलाय आणि त्यांच्याबरोबर काम सुरु करत आहोत ' ..हे ऐकणं माझ्यासाठी अजिबात नवीन नव्हतं ..... पण , नवीन धंदा मिळवण्यासाठी ,जिथे गेले सहा महिने दिवसरात्र राबलो .. तिथेआपल्याला नाकारण्यात आलंय हे सत्य पचवणं जरा अवघड जात होत .. आमच्याच कंपनीची बंगलोर आणि चेन्नई मधली काही मंडळी माझी फजिती व्हायची वाटच बघत असणार याची खात्री होती ,...कारण युरोपात राहणारा भारतीय कंपनीचा सेल्स मॅनेजर , म्हणजे कंपनीच्या पैशावर अख्खा युरोप फिरणारा आणि रोज रात्री आयफेल टॉवर खाली बसून बिअर पिणारा भाग्यवान प्राणी ... असा ह्यातल्या काही मंडळींचा घट्ट समज असतो ह्याची पूर्ण खात्री होती
असो , ह्या सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत ... पण इतका मोठा धंदा हातातून गेल्यावर , ह्या वर्षाचं सेल्स टार्गेट कसं अचिव्ह करणार हा यक्षप्रश्न आ वासून उभा होता . खरतर सेल्स च्या जॉब मध्ये फायर करणं आणि होणं युरोपमध्ये फारच कॉमन आहे हे माहिती होत
स्टेशनवर पोहोचलो आणि स्टुटगर्ट ला जात असणारी एक रिजनल ट्रेन दिसली त्यात चढलो . डोक्यात भरलेल्या विचारांमुळे ती ट्रेन जवळजवळ रिकामी आहे हेही कदाचित लक्षात नाही आलं .
मधल्या कुठल्यातरी एका स्टेशनवर एक खिदळणाऱ्या तरुणींचा ग्रुप ह्या ट्रेनमध्ये चढलाय आणि माझ्या मागच्याच सीटवर बसलाय असं काहीस जाणवलं , पण फारसं लक्ष दिल नाही . नेकर नदीच्या काठाकाठाने जाणाऱ्या त्या अतीव सुंदर मार्गाने ट्रेन पुढे जात होती पण खरं तर कशातच लक्ष लागत नव्हतं .
साधारण १५ ते २० मिनिटांनी कुणीतरी जपानी , कोरियन किंवा तत्सम भाषेत बोलतंय आणि एकमेकींना टाळ्या देत मस्त धमाल चाललीय हे जाणवत होत आणि मग मागे वळून पाहिलं तर लक्षात आलं की माझ्या मागच्या बाजूला बसलेल्या ह्या पाच सहा जणी म्हणजे साधारणपणे पंचाहत्तरी पार केलेल्या मैत्रिणींचा ग्रुप आहे . त्यांना काही माहिती हवीय हे जाणवलं म्हणून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं ह्यातली एक आजी सोडून बाकी सगळ्यांना जपानी सोडून दुसरी कुठलीच भाषा येत नाही
त्यातल्या सर्वात वयस्कर आजीबाईंना थोडस इंग्लिश येत हे समजल्यावर, मग माझ्याचं मोबाईलवरच गुगल ट्रान्स्लेटर वापरून आमचा संवाद सुरु झाला आणि जे काही मला समजलं ते सांगायलाच हवं
ह्या सगळ्या आज्यांचा ग्रुप जपानवरून युरोपात फक्त फिरायला आला होता . ह्या सगळ्या आज्यांमधे एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे ह्या सगळ्यांचे नवरे आधीच वरती गेले होते आणि ह्यातली एक आजी सोडली तर बाकी सर्व जणींना कुठला ना कुठला आजार होता . असंही लक्षात आलं की ह्या सगळ्यापासून दूर जाण्यासाठी ह्या सगळ्यांनी मिळून युरोप ट्रिपचा प्लॅन आखला होता . आणखी एक गोष्ट गोष्ट , ह्या पैकी कुणीही आपला मोबाईल बरोबर घेऊन फिरत नव्हती .
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमधल्या कोबेमधेच राहिलेल्या एका अमेरिकन सोजीराच्या प्रेमात पडलेली ती ८४ वर्षांची जपानी आजीबाई , मला समजेल इतपत इंग्रजी बोलत होती .ह्या वयात तिचा उत्साह एखाद्या विशीतल्या तरुणीला लाजवणारा होता . खूप गप्पा झाल्या त्यांच्याशी . त्यातल्या दोघी भारतात बोधगयेला दीड महिना राहून गेल्यात आणि २०१६ मध्ये त्यांनी उत्तर भारतात कुठल्याही गाईडच्या मदतीशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास केलाय हे ऐकल्यावर मी त्यांचे फक्त पाय धरायचे बाकी होते .
पुढची ४५ मिनिट आमच्या अशा मोडक्यातोडक्या इंग्रजी , जपानी आणि जर्मन मध्ये गप्पा झाल्या , एक मस्त सेल्फी झाला . त्यातल्या दोघी थोड्या लाजल्यामुळे ह्या फोटोत आल्या नाहीत
स्टुटगार्ट मध्ये उतरून पुढे फ्रँकफर्टच्या ट्रेनमध्ये बसायच्या आधीच लक्षात आलं की दोन तासांपूर्वी माझ्या डोक्यात थैमान घालणारे विचार कुठच्याकुठे पळून गेलेत 
चिअर्स
अजित रानडे
फ्रँकफर्ट जर्मनी