कोल्हापूरवरून पुण्याला येता येता गाडीत गाणी ऐकत होतो.
हॅालिवूडच्या 'सोनी स्टूडियोज' मध्ये 'सिंफनी ओर्केस्ट्रा' सोबतच्या त्या 'सैराट' मधल्या अजय अतुलच्या गाण्यानं पार नादावून टाकलं होत . म्हंटल जर्मनीत परत गेल्यावर हा पिक्चर बघायला मिळणं फारच अवघड आहे . म्हणून सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेला व्हॉटस अपवर मेसेज केला 'आम्हाला सैराट जर्मनीत , खरतर युरोपात दाखवायची इच्छा आहे . मदत करू शकाल का ? ' नागराजन त्याच्या प्रचंड धावपळीच्या कार्यक्रमातून वेळ काढून त्याच्या वारज्यातल्या घरी बोलावलं .
त्याच्या घरचं खरतर ऑफिसचं वातावरण पूर्णपणे 'सैराटमय ' झालेलं दिसत होत . नागराजला दीड वर्षांनंतर पुन्हा भेटत होतो . भरपूर गप्पा झाल्या . त्याच्या बोलण्यात, खर तर प्रत्येक वाक्यात सैराटच्या भविष्यातील यशाबद्दलचा आत्मविश्वास पुरेपूर जाणवत होता . जर्मनीत/युरोपात हा चित्रपट दाखविण्यासाठी, झी स्टूडीओच्या निखिल साने सरांशी ओळख करून देण्याबद्दल त्यान सांगितलं . दुपारी दीड वाजता नागराजची FM वर मुलाखत होती आणि त्यासाठी त्याला निघायचं होत . तरीही त्यान आम्हाला दुपारचं जेवण त्याच्याबरोबर करण्याचा आग्रह केला . जेवणाला नाही असं म्हणण्याची सवय नसल्यानं , सरळ भारतीय बैठक ठोकून नागराज बरोबर मूगाची उसळ , अंडा बुर्जी , मस्त चटणी आणि चपाती अस जेवण चांगलच चेपलं .
सैराट मधली जोडी रिंकू राजगुरू (अर्ची ) आणि आकाश ठोसर ( परश्या) ह्यांची तोंड ओळख झाली ( खर तर ह्या गाण्याचे व्हिडीओ मी त्यावेळी फारसे पहिले नसल्यामुळे मी त्या दोघांना पटकन ओळखू शकलो नाही . नागराजच्या भाषेतचं सांगायच असेल तर , राज , आर्यन , आदीत्य ,राहुल सारखे बॉलीवूडचे चॉकलेटी हिरो आणि झिरो साईजच्या हिरॉईनी बघून सरावलेल्या माझ्या डोळ्याना 'अर्ची ' आणि' परश्या ' विलक्षण गोड वाटले . नागराज च्याच 'फॅंड्री'तला कलाकार सुरज पवार सुद्धा भेटला .
करमाळ्यातल्या मळकटलेल्या चेहेरयाची पण स्वच्छ मनाची गावाकडच्या मातीतली ही अशी साधी माणसं मराठी मनावर 'गारुड ' घालायला सज्ज झालीयेत . ' जेऊर ते जर्मनी आणि लांडगेवाडी ते लॉस एन्जेल्स' पर्यंत आलम दुनियेतील सगळ्यांना 'याड' लावत असलेला 'सैराट' २९ एप्रिल ला रिलीज होतोय .
बॉक्स ऑफिसवर तो झिंगाट , सुस्साट , बुंगाट , तर्राट सुटणार आहे हे २०० %
सैराट च्या यशासाठी सर्वांतर्फे विराट शुभेच्छा !
आपला
अजित रानडे
मराठी कट्टा जर्मनी
https://www.facebook.com/marathikattagermany/
............................................................................................................
जर्मन डायरी
स्थळ -फ्रँकफर्ट एअर पोर्ट ...
२०१४
दमट हवेचा एक ढगाळ दिवस
फ्रँकफर्ट सारख्या बहुभाषिक आणि बहुढंगी शहरात राहायला लागून मला बघता बघता तीन वर्षं झालीयेत ह्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता . एअर पोर्टच्या लॉबी मध्ये बसून ब्लॅक कफेचे घोट घेत समोर दिणाऱ्या डाऊन टाऊन मधल्या गगनचुंबी इमारती न्याहाळत गेल्या तीन वर्षांचा लेखाजोगा मनात मांडत होतो .
लॅंडिंग करणार्या विमानांच्या चाकांचा धावपट्टीवर उतरताना होणार्या घर्षणाचा … आणि पल्याडला चाललेल्या विमानांच्या टेक ओफ चा हमिंग साउंड मंदपणे का होईना पण कानावर नक्की आदळत होता .
पण मनात , डोक्यात आणि काळजात एक वेगळच संगीत वाजत होत … ह्या वर्षाच्या सुरुवातीपासून ऐकत असलेल्या 'फॅंड्री' ह्या मराठी चित्रपटाच्या थीम सॉंगच ..
. जीव झाला येडापीसा रात रात जागनं
पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं
जादु मंतरली कुनी , सपनात जागंपनी
नशीबी भोग असा दावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
गावाकडेच लहानाचा मोठा झाल्यामुळे लहानपणापासून ' हलगी' वाजवलेली खूप वेळा ऐकली होती ... हलगी आणि लेझमीच्या तालावर नाचालोय सुद्धा अगणित वेळा …. पण 'फॅंड्री' मधल्या 'जब्या'च्या हलगीन आणि खर तर ह्या पिक्चरनच ' पार नादावून टाकल होत .
पण ह्या विचारांच्या तंद्रीतून लगेच बाहेर आलो … कारणच तस होत . ज्याची मी तासाभरापासून वाट पाहत होतो तो 'फॅंड्री ' ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे समोर आला आणि पुढच्या तासाभरात मी पूर्ण 'फॅंड्री' मय झालो हे सांगायची गरज नसावी . माझ आडनाव 'रानडे ' असूनही दाते , फडके , साने , लेले अशा एकारांती मित्रांपेक्षा 'जाधव , गायकवाड , कांबळे आणि रोड्डे' ह्या बहुजन समाजातील मित्रांबरोबर, तांबडा पांढरा रस्सा आणि मिसळी वरची तर्री पीत मी लहानाचा मोठा झालोय … आणि कदाचित पक्का 'गावठी ' आहे हे लक्षात आल्यावर आमची ' नाळ ' ताबडतोब जुळली . . एअर पोर्ट वरच्या त्या हॉटेलात ' खास लोकल ' काय असेल ते मला जास्ती आवडेल अस नागराज ने सांगितल्यावर ' माझ्या बहुमूल्य ज्ञानाचा खजिना मी रिता केला नसता तरच नवल . पुढच्या तासाभरात मराठी चित्रपट आणि आणि त्यांचे जागतिक चित्रपटसृष्टीतील स्थान ह्यापासून ते विद्रोही मराठी साहित्य संमेलन आणि वि. स. खांडेकर ते ' दया पवार ' अश्या सर्व चर्चा रंगल्या . मराठी भाषेला नवनव्या शब्दांची रसद पुरवण्याच काम हे ग्रामीण महाराष्ट्रानेच केलाय आणि 'शहरी लोक' नाही तर अस्सल गावाकडची मंडळीच मराठी भाषा जिवंत ठेवतील ह्यावर आमच एकमत झाल .
नागराज ची लंडन ची फ्लाईट असल्यामुळे तासाभरात आम्हाला चर्चा आटोपती घ्यायला लागली .मला भेटायला तो इथे थांबला ह्यासाठी त्याचे परत परत आभार मानले
मराठी भाषेला असा एक सुंदर आणि आशयघन चित्रपट देणाऱ्या आणि अतिशय प्रभावीपणे आपला संदेश पोहोचविणाऱ्या ह्या मस्त कलंदर , साध्या , दिलदार मित्राचा निरोप घेतला . ऑफिसला परत जात असताना मनात मात्र ' हलगी ' परत वाजू लागली . ठरवलं की इतके सुंदर मराठी चित्रपट , केवळ मराठीच नाही तर जगातल्या सर्व भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण खारीचा वाटा उचललाच पाहिजे .
ता क : मंडळी , आज ( ७ नोव्हेंबर २०१४ ) आमच्या इथे 'फॅंड्री' चा शो आहे … सगळे प्रेक्षक जर्मन . कळवेन नक्की त्यांची प्रतिक्रिया
आपला
अजित रानडे
मराठी कट्टा जर्मनी
,