बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

आयुष्याचा सांगाती , "राजा शिवछत्रपति"

                                                                      जर्मन डायरी 
श्रावण शुद्ध पंचमी शके १९३७
                                                                                                 १९ ऑगस्ट  २०१५


तशी  गोष्ट काही  फारा वर्षांपूर्वीची नाही . 
 
साधारणपणे सहावी सातवीत असताना दिवाळीला आम्ही काही   मित्र  मातीचे  किल्ले बांधत असू .  
हे बहुतेक सगळे किल्ले पुण्याजवळच्या मावळ मुलुखातले   असत . 

 मी स्वत: त्यावेळी,   एक म्हणजे   आमच्या  कोल्हापूर जवळचा पन्हाळा आणि सातारचा अजिंक्यतारा  हे गड सोडले तर बाकीचे किल्ले   कधीच   पाहिले  नव्हते …  पण किल्ले बांधण्याच्या उत्साहाच्या आड ही गोष्ट कधीच नाही आली .  कधी राजगड आणि पुरंदर तर त्याच्या पुढच्या वर्षी तोरणा आणि सिंहगड ,  असे प्रत्येक दिवाळीत,   एक से एक मातीचे किल्ले आम्ही उभे करत असू . 
 
पुण्यापासून दीड पावणेदोनशे मैलांवरच  माझ छोट   गाव …    आणि त्या काळात ट्रेकिंग किंवा दुर्गभ्रमंती असा प्रकार फारसा नव्हता .  त्यात  ह्याबाबतीत  मार्गदर्शन करायला तर कुणीच नव्हत .… महाराष्ट्र  कर्नाटक सीमेवरच गाव,   त्यामुळे मराठी आणि कानडी च्या मिश्रणातून तयार झालेली आणि  एक वेगळाच लहेजा असलेली , ग्रामीण बाज असलेली   भाषा मी बोलत असे  . मे महिन्याच्या  सुटीत  कोल्हापूर आणि अगदीच चुकून जर पुण्याला जाण्याचा योग आलाच तर तिथे  माझ्या बोलण्याची यथेच्छ   टिंगलटवाळी होत असे.  
 
टीव्ही हा प्रकार नुकताच गावात आला होता पण आमच्या घरी नव्हता आणि त्यामुळे गड किल्यांवरचे  कार्यक्रम असलेच तरीही  पाहण्याची सोय नव्हती . 
 
मुंबई वरून येणारा " दैनिक लोकसत्ता " गावात पोहोचायला संध्याकाळ व्हायची  आणि शाळेतून घरी आलो की  मी अधाश्यासारखा  त्याचा फडशा पाडत असे . एवढाच खर तर शहराचा संबंध .  . 
 
त्यात कधी कधी दुर्गभ्रमंती वरचे लेख असायचे  . "मिलिंद गुणाजी "  हाही त्याच काळात  नुकताच लिहिता झाला होता   आणि त्याचे  भ्रमंती वरचे लेख  " साप्ताहिक लोकप्रभात "  येत असत . पण त्यात अगदीच त्रोटक माहीती  असे . 
 
पेशाने शिक्षक असलेले  माझे वडील  दर   उन्हाळ्याच्या सुट्टीत   पुण्यात जात असत …पुणे  विद्यापीठात पेपर्स तपासण्यासाठी .  त्यांचा तिकडे महिनाभर मुक्काम असे.  ते परत गावाकडे कधी येताहेत याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत असे . कारण प्रत्येक वेळी परत येताना ते  माझ्यासाठी पुस्तक आणत  असत … घरी येउन त्यांनी बॅग उघडायच्या आधीच माझी झडप त्यावर पडलेली असे . 
 
अश्याच एका वर्षी , पुण्यातील आपा बळवंत चौकातल्या  "  राका बुक एजन्सीतून " आणलेल्या  एका जाडजूड पुस्तकाचं    खाकी रंगाच कव्हर मी उघडल . …    नेहमीच्या सवयीप्रमाणे  आधी त्या नवीन  पुस्तकाला   नाक लावून,    त्या नवीन पुस्तकाचा मस्त  वास घेतला  आणि एकाच  आठवड्यात ते  पुस्तक   वाचून  संपवलं सुद्धा … 
 
पुस्तक वाचून संपल असेल पण त्या पुस्तकाची नशा   अजूनही उतरली नाहीये  …आणि  कदाचित कधीच उतरणार नाही . कारण ते पुस्तक होत  , बाबासाहेब पुरंदरे लिखित ,  "राजा शिवछत्रपति ". 

 

 
 
  
 
मी आजतागायत  " भगवद्‍गीता " कधी  पूर्णपणे  वाचलेली नाहीये … कधी वाचेन की नाही , ते माहिती  नाही .   पण  खर सांगतो , जेव्हा जेव्हा  मन बेचैन  व्हायचं तेव्हा तेव्हा  राजा शिव छत्रपती  हे पुस्तक समोर धरून त्याची पारायण केली    ह्या पुस्तकानं   जगायला एक नवीन उमेद दिली  …  आयुष्याकड   बघण्याची वेगळी दृष्टी दिली …   आणि  कदाचित  "राजा शिवछत्रपती"   हे  पुस्तकच  आयुष्याची  " भगवद्‍गीता "  बनून गेल  .  ह्या पुस्तकातलं  प्रकरण नी प्रकरण …  खर तर ओळ आणि ओळ , अगणित  वेळा वाचली असावी … त्या अजाणत्या वयात  ह्या पुस्तकानं असं  झपाटून टाकल होत. 
 
 
रयतेच्या राजानं  ,  म्हणजेच शिवछत्रपतींनी  ,  गुलामीत खितपत पडलेल्या   महाराष्ट्राला  स्वाभिमान आणि अस्मितेचे कसे धडे दिले  हे ह्या  पुस्तकातूनच समजल  …   "अहत तंजावर ते तहत  पेशावर " आलम   हिंदुस्थानात , " मराठ्यांचा  झेंडा " फडकवण्याची  प्रेरणा देणाऱ्या  शिवरायांची थोरवी  समजण्याची ,  थोडीबहुत  पात्रता अथवा कुवत   माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या पुस्तकानच  दिली .  
 
 
राजा शिवछत्रपती ह्या पुस्तकान  ,  आयुष्यातलं  एक  नवीन दालनच  उघडलं  … शिवरायांच्या   पदस्पर्शाने  पुनीत झालेल्या सह्यगिरीतील   गडकिल्ल्यांना    भेटी देण्याच …
 
 
बारावी नंतर पुण्यात  सीओइपीत शिकायला आल्यावर  पुण्यात येण्याचा माझा खरा   मनसुबा माझ्या   घरच्यांच्या लक्षात आला  असावा … 
 
कारण पुण्यात आल्या नंतरच्या पहिल्या सात  वर्षातच  "तापी ते तिलारी " पट्ट्यातील   सह्याद्रीतील  दोनेकशे किल्ल्यांवर मुलूखगिरी करता आली  … पुण्याजवळच्या  कित्येक गडांवर  तर किती वेळा गेलो ह्याची कधीच मोजदाद नाही केली … सिंहगड, पन्हाळा  आणि राजगडावर   तर , कामानिमित्याने  सलग पंधरा पंधरा दिवस मुक्काम करण्याच  भाग्य लाभलं   …   शिवशंभूंच्या   जागरात  न्हाऊन निघालो … गडावरच्या गुहा , मंदीरं   , शिखरमाथा  आणि कडेकपाऱ्यात  जिवलग मित्रांबरोबर  फिरण्याची  खरी   प्रेरणा ह्या पुस्तकानचं   दिली .  
 
 
 
  स्वत:च्या  घरादाराचा विचार न करता  , आयुष्यातील  सत्तर वर्षं वर्ष   जो माणूस केवळ " शिवाजी "  ह्या तीन अक्षरांचा ध्यास घेऊन जगला  , अशा ह्या व्रती  योग्याला   वयाच्या   नव्वदीत  का होईना "  महाराष्ट्रभूषण "  हा पुरस्कार मिळतोय हेही नसे थोडके . त्याबद्दल   बाबासाहेबांच त्रिवार अभिनंदन .  "शिवराय"  हे वाचून नाही कळत … शिकवून सुद्धा समजणार नाही हा "जाणता राजा"  कसा होता ते … त्यासाठी  शिवशंभू  जगावे लागतात … आणि बाबासाहेब एक नाही दोन नाही तर तब्बल सत्तर वर्ष  श्वास घेताहेत तो शिवरायांचाच 

 
 
छत्रपती शिवरायांच  मन विशाल , मनाची भरारी दिगंतापर्यंत जाणारी   … अशा  युगपुरुषाच कार्य  तळागाळातील   सामन्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याच काम गेली सत्तर/ पंच्याहत्तर  वर्षे  बाबासाहेब करताहेत .  अशा माणसाला  , हा पुरस्कार मिळतोय ह्याचा अतिशय आनद आहे . 
 
बाबासाहेब , तुमचं   "राजा शिवछत्रपती"  हे पुस्तक जर आयुष्यात आल नसतं  , तर आयुष्य  कस असत ह्याची कल्पनाही करवत नाही . 
 आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो अशी त्या जगदिश्वरा चरणी प्रार्थना 
 


 बहुत काय लिहिणे ?


|| जय जय रघुवीर समर्थ || 
 
 
 
तळटीप  
 
१) गडकिल्ले  आणि दुर्गभ्रमंती ह्या क्षेत्रात   थोडेबहुत काम केल्यामुले  शिवशाहीर   महाराष्ट्रभूषण  बाबासाहेब पुरंदरे  ह्याना भेटायची संधी असंख्य  वेळा मिळाली .  स्वत:  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  व्यासपीठावर उपस्थित असताना  ,  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  करण्याची जबाबदारी मला दोन तीन   वेळा मिळाली ह्याबद्दल मी  रायरेश्वराचा  सदैव ऋणी राहीन . 


 
 
२) हा ब्लॉग  ,मी  माझे विचार  व्यक्त करण्यासाठी  करत असतो .   कुणाला काही शंका  , असतील तर त्याचे यथासांग  निरसन करण्यात येईल .   वादासाठी वाद  घालणाऱ्या  "   गेमाडे पंथीय "  प्रवृत्तींपासून   मी दहा हात दूर  असतो  .  अशा लोकांचे शंकानिरसन करण्यासाठी लागणारा वेळ , सहनशक्ती माझ्याकडे नसल्याने  कृपया त्यांनी आपला स्वत:चा आणि माझा अमूल्य वेळ दवडू नये अशी नम्र विनंती . 

धन्यवाद 

अजित रानडे 
 
 
 
 
 
 


शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

एका गिर्यारोहकाचे 'सुजाण ' डोंगरवेड

                                                                                                                                                                                                                                               

                                                                                                  १३ एप्रिल २०१५  
                                                                                                               बर्लिन   


(एखाद्या गोष्टीचा  छंद तर प्रत्येकाला  असू शकतो , पण त्याचा ध्यास घेऊन  जिद्दीने आणि चिकाटीने तो  जोपासला   आणि  त्याला   कल्पकतेची  जोड दिली  तर यशाचे शिखर नक्कीच सर करता येते . 'सचिन विद्याधर जोशी'  ह्या  डोंगरवेड्या ट्रेकरने, 'गड -किल्ले' ह्या  आपल्या आवडीच्याच क्षेत्रात नुकतीच  डॉक्टरेट मिळवली आहे . सह्याद्रीतील तब्बल  पाच नवीन किल्ले शोधून काढणाऱ्या ह्या बहाद्दराबद्दल    त्याच्या सुहृदाने मांडलेले काही अनुभव आणि आठवणी  )
ज्या जिवलग मित्राबरोबर गेली जवळजवळ १८ वर्षे सह्याद्रीच्या डोंगरमुलुखात मनस्वी भटकलो , त्याच्यावर लिहिलेल्या लेखास प्रसिद्धी दिल्याबद्दल "साप्ताहिक सकाळचे" आभार







साधारणपणे सतरा  ते अठरा वर्षांपूर्वीचा सुमार . पुण्यातल्या नारायण पेठेतील एका  वर्दळीच्या रस्त्यावरील  चहाची टपरी . तिथे रोज संध्याकाळी किमान दहा ते बारा  तरुणांचा घोळका तावातावाने चर्चा करताना  हमखास दिसायचाबहुतेकवेळा   ह्या सर्व चर्चेचा विषय एकच  ' मराठ्यांचा इतिहास , गड - किल्ले  आणि  दुर्गभ्रमंती   म्हणजेच ट्रेकिंग '.  

इथे दर  आठवड्याला नवनवीन मोहिमांचे बेत आखले जायचे . कधीपवनमावळातील   दुर्गचौकडी ,  तर कधी  बागलाणातले  साल्हेर- सालोटा ह्यासारखे  बेलाग  दुर्ग , कधी सागरी किल्यांच्या सफरी  तर कधी तडक  तळकोकण     गाठून तिथल्या एखाद्या गडमाथ्यावर मुक्काम करण्याचे बेत   … कधी   भीमाशंकरच्या  शिडीच्या वाटेवरून खाली  खांडसला उतरणे अथवा कर्णवडीची नाळ आणि गोप्या घाटासारख्या डोंगरवाटांवर मनसोक्त भटकंती  तर कधी ‘सिंदोळा  किंवा  मोरवी अशा अनगड गडांच्या शिखरमाथ्यावरच्या  चढाया . 
पाठीवरच्या  पीट्टूमध्ये  तहानलाडू आणि भूकलाडूघेऊन  प्रचीतगडभैरवगड, मधुमकरंद गडाच्या दाट जंगलात केलेल्या मोहिमांच्या आनंदापुढे पायाला लागलेल्या जळवांचा त्रास काहीच वाटत नसे . 

      
                                     जुलै १९९९ किल्ले कोथळीगड  



इतिहासाच्या आवडीमुळेच,सहावीत असताना आपल्या आतेभावाबरोबर हरिश्चंद्रगडा-पासून  दुर्गभ्रमंती सुरु करणारा  एक तरुण  त्यात होता.  त्याच नाव सचिन विद्याधर जोशी .इतिहासाची आवड ,अफाट निरीक्षण शक्ती, सदोदित  किल्ल्यांचा आणि नकाशांचा अभ्यास करण्याची सवय  , तल्लख स्मरणशक्ती ,नवनवीन किल्ल्यांवर जाण्याची आवड  आणि नेतृत्वकौशल्य    ह्यामुळे  ‘ट्रेकिंग म्हणजे सचिन’ हे समीकरण  त्यावेळेस प्रत्येकाच्या डोक्यात पक्क बसल  होत. 

.अभ्यास  आणि कॉलेज आणि काहीजणांची नुकतीच सुरु झालेली नोकरीतली उमेदवारी सांभाळून ह्या सर्व  गोष्टी चालत असत . बहुतेकांच्या घरच्या मंडळींचा ह्या  डोंगरातल्या '' मनस्वी उनाडकीला''  तीव्र विरोध होता . पालकांच्या मते  डोंगरात भटकणं म्हणजे  अभ्यासाचा  वेळ वाया    घालविण     त्यापायी ह्या मित्राना घरच्यांची नेहमीच  बोलणी खायला लागत असत. त्यातून बहुतेक  सारी मंडळी मध्यमवर्गीय घरातील असल्यामुळे  ' ह्या भटकंतीचा '  आर्थिक आघाडीवर ताळमेळ घालण  म्हणजे अजूनही अवघड  कसरत  असे . ह्या सगळ्या परिस्थितीत  ही  सारी दुर्गभ्रमंती सुरु   ठेवण  म्हणजे खर तर  ''सोळा सोमवारपेक्षा  अवघड असलेलं व्रत होत '.

 ह्याच सुमारास दुर्गप्रेमी सतीश मराठे ह्यांच्या प्रयत्नांतून सुरु झालेल्या 'गिरीदर्शन  ट्रेकिंग  क्लबचं   ‘व्यासपीठ ह्या सर्व  मित्रांसाठी खुलं   झाल   आणि आर्थिक आघाडीवरचा प्रश्न काही प्रमाणात का होईना पण नक्कीच सुटला . कारण ह्यातले  बरेचसे तरुण ' पदभ्रमण मोहिमांचे नेते ( ट्रेक  लीडर्स )   ' म्हणून  आपल्याबरोबर पाच -पन्नास हौशी   डोंगरवेड्यांना  दुर्ग भ्रमंतीला घेऊन  घेऊन जाऊ लागले . आपली  नवनवीन  किल्ले बघण्याची  हौस फुकटात भागवून  घेता येते ह्यातच  त्याना अपार आनंद मिळत असे .  


अशारितीने  फक्त परीक्षेचा  काळ वगळता जवळजवळ प्रत्येक शनिवार-रविवारचे भन्नाट ट्रेक्स,  इतिहासाचा अभ्यासकोणी  किती किल्ले करतो  ह्यावर पैजा , एसटी आणि लोकल मधली 
धमाल गाणी ,डोंगरात जोडलेला   नवीन  मित्र परिवार   ,फोटोंची 
   पारायण    आणि कधीकधी ' किल्ल्यांच्या छायाचित्राची  प्रदर्शनं  '   असा हा डोंगर यात्रेचा   आनंद सोहळा  अव्याहत  सुरु झाला . दुर्गभ्रमंतीची नशा काही औरच होती.



ह्या सर्व गोष्टीत समरस होऊनसुद्धा ''आता ह्याच्यापुढे काय?''हा डोळस विचार सचिन नेहमीच करत असे .किल्ला पहात  असताना  केवळ इतिहासामध्ये  रममाण न होता ,किल्ल्याची तटबंदी ,  तिथले  भग्न - अवशेष , क्वचित अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा  ,पाण्याची खोदीव टाकी , चौथरे , पायऱ्या , किल्ल्यांच  दरवाजे आणि त्यावरील शिल्पं  अशा गोष्टींच  बारकाईने निरीक्षण करण्याचा जणू त्याला छंदच जडला.  किल्ल्यांच्या परिसरातील मंदीरे  , सतीशिळा  आणि वीरगळ तिथले जुने वाडे -गढ्या  आसपासच्या  डोंगर वाटा,चोरवाटा आणि ह्या सर्वांच्या अनुषंगाने येणारा इतिहास  ह्यावर त्याचे  तासंतास   विचारमंथन सुरु झाले . हे सर्व करताना त्याला खूप प्रश्न  पडायचे , बऱ्याच  कोड्यांची उकल  व्हायची    सुद्धा नाही . कादंबरीतील  वर्णन आणि ऐकीव माहिती  आणि प्रत्यक्षातील परिस्थिती ह्यात  बरीच तफावतही जाणवायची .  इतिहासातील केवळ ऐकीव अथवा वाचलेल्या गोष्टीना प्रमाण मानून एखाद्या गोष्टीची  सत्यासत्यता पडताळून पाहता येत नाही तर त्यासाठी ठोस पुरावे लागतात आणि त्यासाठी मोठा अभ्यास  करावा  लागतो ह्याची त्याला जाणीव झाली.




ह्याच काळात सचिनची ओळख महेश तेंडुलकर सारख्या इतिहासाने झपाटलेल्या   अवलीयाशी  झाली .  महेशही त्या काळी दुर्गांचा अभ्यास  करण्यासाठी डोंगरवाऱ्या   करायचा . महेशमुळेच  सचिन , ' भारत  इतिहास संशोधक मंडळाशी '  जोडला गेला .  तिथल्या  वेगवेगळ्या  विषयातील तज्द्य  आणि व्यासंगी  मंडळींबरोबर  वेळोवेळी   होणाऱ्या  भेटी , नियमित बैठका  आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे ,  दस्तऐवजांचे वाचनशोधनिबंधांवरची  नियमित  चर्चा ह्या   सर्व  गोष्टींमुळे सचिनचा किल्ल्यांकड   बघण्याचा दृष्टीकोन  अधिकच  व्यापक झाला . दरम्यानच्या काळात  सचिनन  आपलं  रसायनशास्त्रातील  पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.  एका कंपनीत दोन तीन  वर्ष नोकरीही  केली . अखंड महाराष्ट्रात  दुर्गभ्रमंती तर सुरु होतीच .  ह्याच काळात त्याला पुण्यातील ख्यातनाम  अशा ' डेक्कन  महाविद्यालयात      स हाय्यक संशोधक म्हणून  काम करायची संधी  चालून आली .तिथे नोकरी करता करता त्यानं   तिथे   ' पुरातत्व  शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं .  पुरातत्व विभागाच्या वतीने  ' चौल येतील  उत्खननाच्या कामात सलग चार वर्षं  काम केल .  आणि हेच दिवस त्याला खूप काही शिकवून गेले .तिथं   शिकलेल्या   बऱ्याच  गोष्टींचा किल्ल्यांचा अभ्यास करताना  कसा उपयोग करता येईल ह्यावर त्याच  विचारचक्र सतत सुरु झाल . 







 वेगवेगळ्या विषयांच सखोल डॉक्युमेंटेशन करणे  , उपग्रहापासून  मिळालेल्या चित्रांचा अभ्यास , 'जीपीएस' च तंत्र वापरून शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ल्याचं मोजमाप करणे अशा अनेक  विषयांचा त्याने अभ्यास केला । ह्याकामी त्याला डॉ. विश्वास गोगटे  आणि डॉ . श्रीकांत प्रधान ह्याचं अतिशय बहुमोल मार्गदर्शन लाभले   त्याच्या पुढच्या  वाटचालीसाठी  हा  सर्व अभ्यास आणि  ह्या  दोन्ही गुरुंच   मार्गदर्शन   खूपच उपयुक्त ठरलं .२००६ मध्ये उपग्रहांच्या छायाचित्राचा  आधार घेऊन आणि प्रचंड पायपीट करून  सचिननं  रायगडच्या  प्रभावळीतील  माणगाव जवळचा ' पन्हाळघर  हा नवीनच  किल्ला शोधून काढला .  कुठल्याही  ऐतिहासिक दस्तऐवज आणि  कागदपत्रात त्याचा त्याआधी कुठेही  उल्लेख नव्हता  . 

   छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजी प्रभू देशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात  मोहनगड ह्या किल्ल्याचा  उल्लेख आहे .  हिरडस मावळात असा किल्ला आहे   परंतु  तो  नेमक्या कोणत्या ठिकाणी तो आहे  , त्याची  स्थाननिश्चिती  झालेली नाही हे सचिनच्या लक्षात आल.‘ काळाच्या उदरात आणि इतिहासाच्या  गर्तेत’ लपलेल्या   त्या किल्ल्याचा  शोध घेण्यासाठी  त्याने हिरडस मावळातल्या  नीरा -देवघर  धरण  परिसरातील  बरेचसे   डोंगर  अक्षरशपिंजून काढण्यास सुरुवात केली . बरयाच  डोंगरांचा पुरातत्वीय  दृष्टीकोनातून अभ्यास केला , निरीक्षण आणि नोंदी केल्या . जवळजवळ दीड वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर  २००८ मध्ये  त्याला 'मोहनगडाचा शोध लावण्यात यश आलं . तिथे असलेल्या उपलब्ध अवशेषांचा  अभ्यास करून  , केवळ तर्कावर विसंबून न राहता ,  दुर्ग स्थापत्याचे  सर्व निकष  लावून आणि  सारी निरीक्षण  नोंदवून  सरतेशेवटी '   मोहनगड हा किल्ला  वरंधा घाटातील जननी देवीच्या  डोंगरवर होता हे त्यानं   सप्रमाण     सिद्ध केल. तसा शोध निबंध ' भारत इतिहास संशोधक मंडळात सादर  केला ' .



नवनवीन किल्ले शोधण्याची ही उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती . पुढच्याच काही वर्षात त्याने ' अंजनवेलची   वहिवाट ' ह्या मोडी लिपीतील कागदपत्रांचा संदर्भ घेऊन माणिकदुर्ग  , कासार दुर्ग  आणि नवते ह्या नव्या किल्ल्यांचा शोध लावला . ह्या किल्ल्यांवरचा ' माणसांचा राबता ' कधीचाच थांबला होता .केवळ कागदोपत्रीच माहिती असलेले हे किल्ले आहेत कुठे आणि त्यांचा नेमका ठावठिकाणा  ना  इतिहासाच्या  अभ्यासकांना  ठाउक होता ना  शासनाला . डोंगर भटके आणि ग्रामस्थ, ह्यानाही इथे किल्ले आहेत  ह्याबद्दल त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. केवळ इतिहासालाच  माहिती असलेले  हे किल्ले  त्याच्या संशोधनातून वर्तमानात आले






  हे सारे नवीन किल्ले शोधण्याच  काम नक्कीच सोप  नव्हतं  .  ’डोंगर शोधण्याच काम हे डोंगराएवच असणार’ ह्यात शंकाच नाही .  हे पाचही किल्ले शोधताना आलेले  अक्षरशशेकडो अनुभव सचिनच्या  पोतडीत आहेत.हे अवघड  शिवधनुष्य पेलण्याच्या कामात  निरपेक्षपणे मदत  केलेल्या   आणि  २०० पेक्षा अधिक नवीन किल्ल्यांच्या  भ्रमंतीत साथ  दिलेल्या ‘प्रसाद जोशी’ आणि ‘केतकी वाळुंजकर’   ह्या  सहकारयांचा तो नेहमीच नम्रपणे उल्लेख करत  असतो  


 ह्यापुढेही जाऊन , गेली काही वर्ष प्रचंड राबून ,कित्येक किल्ल्यांना वारंवार भेटी देऊन,उन्हातान्हाचा आणि  पावसाचा  विचार न करता किल्ल्यांच्या परत परत चढाया करून आणि त्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं   सर्वेक्षण  करून , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून , शेकडो कागद पत्र  आणि ऐतिहासिक नोदी , दस्तऐवज , संदर्भग्रंथअभ्यासून  कठोर परिश्रमाअंती   सचिनन  नुकतच  त्याच  पीचडी  पूर्ण केलय   आणि आता तो  ‘डॉसचिन विद्याधर जोशी’ झाला आहे  .    त्यासाठी त्यान निवडलेला विषय होता ''  A study of Defence Architecture & Geopolitical Significance of Coastal and Hinterland Forts in Konkan Maharashtra  ''.  महाराष्ट्रातील किल्ले ' ह्या विषयात अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच दुर्गप्रेमी संशोधक आहे. 




 गेल्या काही वर्षात त्याची किल्ल्यांवरची काही पुस्तकही प्रसिद्ध झाली आहेतचारशे पेक्षा जास्ती किल्ल्यांची    सर्वेक्षण  आणि अभ्यास केलेल्या सचिनला,  वेगवेगळ्या शाळा आणि  विद्यापीठांमध्ये,परिसंवाद,व्याख्यानं,   कार्यक्रम ह्यातून  नेहमीच बोलावण असतं .  वेगवेगळ्या शाळांनी  आयोजित  केलेल्या  दुर्ग अभ्यास सहलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधायला तो नेहमीच उत्सुक असतो .किल्ल्यांचा अभ्यास, नवीन पिढीने फक्त भावनेच्या आहारी नजाता शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा ह्याबाबत  त्याला खूपच तळमळ आहे  . दुर्गप्रेमी मंडळी  आणि दुर्गसंवर्धन करणाऱ्या   संस्थांना  तर तो वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतोच  . महाराष्ट शासनाने दुर्ग  संवर्धनासाठी  नेमलेल्या  समितीत सचिनचा समावेश करून त्याच्या ह्या क्षेत्रातील  उल्लेखनीय योगदानाला  पोचपावतीच दिलेली आहे  असं म्हंटल तर नक्कीच वावग ठरणार  ठरणार नाही .

ह्या सगळ्या धावपळीत  त्यानं  संशोधन  आणि सर्वेक्षण मोहिमा , किल्ल्यांचा पुरातत्वीय अभ्यास  , वेगवेगळे शोध निबंध  ह्यावरचा ज्ञानयज्ञ   अखंड सुरु  ठेवलाय .यशामुळे हुरळून न जाता   'आता ह्यापुढे  काय ?  '  हा प्रश्न तो स्वत:ला नेमीच विचारात असतोत्याच्या सध्या चालू असलेल्या  संशोधनातून  येत्या काही महिन्यात  अजूनही काही  नवीन माहिती लवकरच उजेडात येणार आहे असं  दिसतंय . सचिनच वैशिष्टय  सांगायचं तर ,' किल्ल्यांचा आणि इतिहासाचा अभ्यास  आणि संशोधन करण्यासाठी  तो केवळ  इतिहासाची  पुस्तक आणि कागदपत्रात रमला  नाही’.  त्यासाठी  प्रसंगी  घरापासून दूर राहून  , दगदग सोसून  स्वत: शेकडो डोंगर पालथे घातले . पुरातत्त्वीय  शास्त्र   आणि ऐतिहासिक  नोंदी , कागद पत्रांचा  अभ्यास   ह्यांचा सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला . त्याच्या मते किल्य्यांना ‘ स्वत: प्रत्यक्षात भेट देणे ही सर्वात  महत्वाची गोष्ट आहे . त्याच्या दृष्टीने सर्वात आनंदाची गोष्ट  म्हणजे , सचिनच्या  पावलावर  पाउल ठेऊन बरेच तरुण - तरुणी  दुर्ग संशोधनासाठी पुढे येत आहेत आणि हे नक्कीच सुखावह चित्र आहे  . भविष्यात  महाराष्ट्रातील चारशेच्या आसपास  असलेल्या किल्ल्यांचा  शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास   आणि दुर्गांच्या   स्थापत्यावरील संशोधन करण्याचा मनोदय तो बोलून  दाखवतो  . खरतर चारशे किल्ल्यांचा  अभ्यास करण्यासाठी उभी हयात खर्ची घालावी लागेल ह्याची त्याला  जाणीव आहे                          

  ''घरात आपण स्वत:च ठेवलेली ' गाडीची  किल्ली '  कधीकधी आपल्याला हवी तेव्हा सापडत नाही .  आणि इथे तर  सर्वसामान्य घरातून पुढे आलेला आणि  मराठ्यांच्या इतिहासाची आवड असणारा हा तरुण पुढे येतो काय आणि आपल्या अथक परिश्रमांने   'पाच नवीन किल्ले  शोधून काढतो  काय ? खर तर  … सगळच    विलक्षण '' 


. आपल्याला एखाद्या विषयाची आवड आहे अस म्हणून  फक्त  चालत नाही तर  त्या आवडीला अभ्यासाची  आणि कल्पकतेची जोड  देऊन   आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून , त्या क्षेत्रात निष्ठेने वाटचाल केली तर त्यात स्वत:च भवितव्य घडविता येत  आणि समाजाला   सुद्धा  आपल्यापरिने योगदान देत येत . त्यासारखं   दुसर  समाधान काय असू  शकेल?  ह्याचं    मूर्तिमंत  उदाहरण म्हणजे  डॉसचिन विद्याधर जोशी.त्याच्या ह्या कार्याला मनापासून सलाम  आणि  पुढील  वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !         







           



सोमवार, १८ मे, २०१५

'लॉक ग्रिफिन' ते 'कॅम्प फायर' - एक 'धुंद स्वच्छंद' आनंदयात्रा


                                                                   जर्मन डायरी                                                                               १८  मे  २०१५ 





वसंत वसंत लिमये  उर्फ ' बाळ्या '  ह्या    माणसाबरोबर  खर तर मी    दोनेक वर्षच काम केल असेल   .  हिमालयातील ऋषिकेश  आणि  सिक्कीमपासून ते  तमिळनाडूतील  एर्काटपर्यंत  आणि   विक्रमगड , दमण , सजन  रिसोर्ट   पासून  ते गोमंतकापर्यंतच्या   सह्याद्रीच्या  पट्ट्यात     त्याच्याबरोबर  डोंगरात  फिरण्याचा अनुभव  मला मिळाला हे माझ अहोभाग्य .  हे  काम करत असताना खूप शिकायला मिळाल अस   म्हणण्यापेक्षा   कधी कधी  असा प्रश्न पडतो की ''    शिकायला काय  नाही मिळाल ?''    त्याच्या 'हाय प्लेसेस'  ह्या संस्थेबरोबर केलेल्या ह्या  देशभरातील  भटकंती मधून  /  जी अनुभवांची शिदोरी मिळाली  ती जगात कुठेही गेलो तरी आयुष्यभर  पुरेल ह्याची खात्री आहे  .डोंगरात फिरताना जी  मित्रमंडळी इथे  जोडली गेलीयेत  आणि आठवणींच्या कुपीत साठवण्याजोगे जे विलक्षण अनुभव जगलोय   ते तर ह्या सह्याद्रीचे  आणि हिमाईचे    अनंत  उपकार . 
    आयआयटी यन  ,  गिर्यारोहण क्षेत्रातील   आम्हा सर्वांचा  आदर्श , उत्तम  कलाकार  ,  सिद्धहस्त लेखक ,  एक यशस्वी व्यावसायिक   म्हणून  माहिती असलेल्या ' बाळ्याचा  वर्तमानपत्रातील कोणताही लेख , ' धुंद स्वच्छंद ' सारख पुस्तक असो की ' लॉकग्रिफिन सारखी भन्नाट ' कादंबरी  ह्या गोष्टी   केवळ '  पुस्तकाच्या कपाटाच्या कप्प्यात नव्हे तर  आमच्या हृदयाच्या  कप्प्यात  ठाण मांडून बसलेल्या आहेत .   अशा  ह्या हरहुन्नरी अवलियाचं नवीन    पुस्तक येऊ घातलंय  ग्रंथाली प्रकाशनातर्फे .    त्याचे  अनुभव   आपल्या जाणीवा कल्पनेपलीकडे समृद्ध करतील ह्याची खात्री आहे .  कोकण कड्याच्या पहिल्या यशस्वी चढाई पासून ते एक दोन नाही तर हिमालयातील तब्बल सोळा हिमशिखरांच्या  मोहिमांचा अनुभव असलेला ह्या माणसाने  'माणस'  घडवायचं  काम केलय ते वेगळच . 

त्याचं  पुस्तकही  त्याच्या नावासारखच   एकदम   आगळवेगळ   'कॅम्प फायर' ….  ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा  दिवस  २९ मे हा  त्यान   त्यानं  आणि त्याच्या  प्रकाशकांनी   विचार करून निवडला असणार हे निश्चित .   .   

 पृथ्वीच्या तिसरया   ध्रुवावर मानवाचं  पाऊल  ह्याच दिवशी  १९५३ साली   पडलं   होत … तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी ह्यांनी  जेव्हा   पृथ्वीतलावरचं  सर्वोच्च शिखर सागरमाथा अर्थात माउंट  एव्हरेस्ट सर केल तेव्हा . 

 जो माणूस  तब्बल चव्वेचाळीस वर्ष ह्या क्षेत्रात कर्तृत्व  गाजवून   डोंगराएवढ  काम करून ठेवतो त्याच्या पुस्तकाला  आणि त्याच्या विचारांना  डोंगरा एवढी प्रसिद्धी देण   हे   आता माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य मराठी वाचकाचं काम आहे . 
पुण्यातील माझ्या सर्व मित्र मंडळीना  आणि त्यातूनही  ' गिर्यारोहण  , पदभ्रमण , भटकंती  , साहस  ह्या क्षेत्रातील  मित्र मंडळीना  नम्र आवाहन , विनंती  आणि तंबी … २९ मेचा कार्यक्रम चुकवायचा विचार  मनातही आणू नका . 


                              II शुभम भवतु II 






--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                                 वसंत लिमये ह्याचं अजून एक पुस्तक     

                            

                                                      जर्मन डायरी 

                                                   - मु. पो . बर्लिन ऑगष्ट २०१२


मित्रवर्य (आणि खरे तर गुरूवर्य) वसंत वसंत लिमये ह्यांच्या 'लॉक ग्रिफिन' ह्या मराठी कादंबरीवरचा माझा अभिप्राय माझ्या शब्दात 

 (वेळ आणि इच्छा असेल तर जरूर वाचणे )

प्रिय बाळ्या, सध्या युरोपात सुट्टीचा हंगाम आहे ... त्यामुळे ठरवलं की 
ह्या कादंबरीच्या नायकाला तुझ्या 'भद्राला' तो अमेरिकेत जायच्या आधी आमचं 'फ्रँकफर्ट ' दाखवावं...

एयरपोर्ट वरून त्याला सकाळी उचललं आणि तडक 'युरोटौवर(European Central Bank ) गाठलं आणि पुढच्या आठ तासात त्यानं मला डोंबिवली ,नासिक आणि दिल्लीच्या कॅनौट प्लेस पासून कुमाऊ हिमालयापर्यंत आणि आणि लुईस मौंटन कॅम्प साईट अमेरिकेपासून पार आईसलंड, लंडन आणि परत दिल्लीपर्यंत असं काही फिरवलं की संध्याकाळी डोक गरगरायला लागल आणि मी 'लॉक ग्रिफिन' ग्रस्त झालो ... आणि श्रावणात जे करायची इच्छा नव्हती तेच करायला लागल . 

असो , . ...तुझ्या अगाध आणि अचाट निरीक्षण शक्तीला सलाम ! ज्या बारकाईने तू तपशील मांडले आहेस त्याला तोड नाही .... त्याच त्या 'ललित , प्रवासवर्णन , प्रेमकथा , ऐतिहासिक , इंग्रजीचे अनुवाद आणि भाषांतर ' अश्या मिळमिळीत आणि चाकोरीबद्ध साहित्यामुळे , माझ्यासारख्या सामान्य मराठी वाचकांमध्ये आलेली मरगळ , तुझ्या 'लॉक ग्रिफिन' कादंबरी ने झटकून टाकली आहे .... रहस्यमय इंग्रजी कथांना लाजवेल असा ' थ्रील्लर सस्पेन्स ' ह्या मराठी कादंबरीत आहे ...आणि ती खरोखर वैश्विक कादंबरी झाली आहे .

 माझ्या यथातथा इंग्रजी भाषेत माझ्या युरोपातल्या मित्र -मैत्रीणीना मी ह्या पुस्तकाबद्दल सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ... पण त्यांनी तुलाच उलटा निरोप धाडला आहे , की लवकरच ह्याच इंग्रजी भाषांतर हवंय ! आणि हो , तुझ्या पुढच्या कादंबारीचा चा नायक मात्र युरोपात आला पाहिजे ....त्याला काही लागेल ती मदत आपण करू . - 


परत एकदा धन्यवाद , 

अजित रानडे 

मराठी कट्टा  फ्रँकफर्ट , जर्मनी













बुधवार, ६ मे, २०१५

थेट भेट - डॉ. मोहन आगाशे’



 21st to 26th July 2014

स्थळ - फ्रँकफर्ट ट्रेन स्टेशन , संध्याकाळचा सहाचा सुमार 




Bitte zurücktreten, Zug fährt auf Gleis dreizehn (बिट झुरूक त्रेक्तन , झुग फार्त औफ ग्लाइस ड्रायझेन ) अशी अतिशय स्पष्ट आणि तितक्याच खणखणीत आवाजात उद्घोषणा होतीय … जर्मन भाषेची जाण नसणारे आणि थोडेसे गोंधळलेले काही प्रवासी ' भिवई वरती करून आणि कपाळाला आठ्या घालत ' इंग्रजीत सुद्धा ही उद्घोषणा होतीय का ह्याची वाट पाहताहेत … धीर नसलेल्या काही प्रवाशांची ह्याचा अर्थ काय हे इतरांना विचारण्यासाठी केविलवाणी धडपड चाललीय .

तसंही गर्दीने गजबजलेल्या ह्या स्टेशन वर ही वेळ म्हणजे नक्कीच धावपळीची . ऑफिसेस मधून सुटलेल्या सुटाबुटां तल्या चाकरमान्यांची घरी जायची आणि बाहेरगावहून इथे आलेल्या प्रवाशांची हॉटेलवर जाण्याची लगबग … बाहेरून इथे येणाऱ्या आणि ह्या स्टेशन वरून युरोपातील मोठ्या शहरांसाठी सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या येण्या जाण्यातून निर्माण होणार एक ' एक आगळं वेगळं  ' संगीत इथे कानावर पडतं …इतक्या गर्दीत सुद्धा 'कबुतरं' काहीतरी टिपताना दिसताहेत आणि काही तुरळक भिकारी आपलं काम निष्ठेने करताहेत . इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या ' नाईट लाईफ ' साठी आसुसलेले काही बुभुक्षित निशाचर  गल्लीबोळातल्या काही 'खास' जागांचा शोध घेण्यात मग्न आहेत . ही गर्दी मला मात्र अजिबात नवीन नाहीये .

साव्व्वासाहाच्या सुमारास, डोक्यावरची उजवीकडे झुकणारी ती खास ' नेपाळी गुरखा टोपी' किंचित डावीकडे करत सत्तरीचा एक तरुण येताना दिसला . त्याच्या चालण्याच्या रुबाबावरून ह्या गर्दीत तो नवखा आहे अस अजिबात वाटल नाही . जवळ येत त्याने माझे सहकारी श्री रवी देशपांडे आणि सलील प्रधान ह्यांच्याशी हस्तांदोलन केल आणि जणू काही मला बर्याच वर्षांपासून ओळखत असावेत अश्या पद्धतीने माझ्या पाठीवर हलकीशी थाप मारून स्वत:ची ओळख करून दिली ‘ डॉ. मोहन आगाशे’.

पुढे स्टेशन जवळच्याच एका विश्रांती गृहात ' फ्रेंच वाईन ' आणि ' जर्मन रॅड्लर ' च्या संगतीत गप्पागोष्टींना चांगलाच बहर आला आणि पुढच्या तास -दीड तासात माझ्या ' अनुभव पुस्तकात ' अजून काही चाप्टर आड (add ) झाले हे सांगणे न लगे. १९७९ -८० पासून नित्य नियमाने जर्मनीत किंबहुना युरोपात येणाऱ्या डॉक्टरांशी ' घाशीराम कोतवाल ' ते 'काटकोन त्रिकोण ' आणि ' दु अँड मी ( Du And Me) ' पर्यंतच्या गप्पा झाल्या .

पुढे त्याच आठवड्यात शनिवारी २६ जुलै ला त्यांच्या ' अस्तु -सो बी इट ' ह्या चित्रपटाचा शो ' private screening ' आम्ही काही मित्र मंडळीनी आयोजित केला होता . महाराष्ट्रात प्रदर्शित व्हायच्या आधीच हा चित्रपट बघायला मिळतोय आणि तोही मोहन आगाशे ह्यांच्या उपस्थितीत ह्याचं आम्हा प्रत्येकाला कुतुहूल मिश्रित कौतुक होत .

नुकताच 'स्टूटगार्ट जर्मनी' इथल्या आन्तरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट जर्मन लोकांना प्रचंड आवडला आणि त्याच महाराष्ट्राबाहेर प्रचंड कौतुक होतंय . येत्या १ ऑगष्ट ला तो पुण्यात प्रदर्शित होतोय त्यामुळे ह्या चित्रपटाबद्दल फारस काही लिहित नाही . ध्यानातून मिळणार्या आनंदाची केवळ अनुभूतीच घ्यावी लागते .चौपाटीवरच ' चाट ' आणि आमच्या कोल्हापूरच्या' मिसळी वरची तर्री ' ह्य्याची चव समजावून सांगता नाही येत , ती प्रत्यक्ष चाखायला लागते . तसच काहीस इथेही आहे

तद्दन गल्लाभरू ' लय भारी ' चित्रपटांची ' कीक  ' आपल्या सर्वाना बसल्यामुळे ही  ' Highly proteinecious dish of entertainment (सकस , पोष्टिक आणि दर्जेदार मनोरंजनाची डीश ) ' आपण कशी पचवतो हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भौतिक प्रगतीमुळे सध्या माणसाच सरासरी आयुर्मान वाढलंय आणि त्याचबरोबर अनेक समस्याही . (Dementia) विस्मरणासारखा असाध्य रोग जडल्यावर एका विद्वान प्राध्यापाकाची होणारी अवस्था , त्याच्या कुटुंबाची आणि आप्तस्वकीयांची होणारी फरफट आणि त्यातील नातेसंघर्ष ह्याच अतिशय प्रभावी चित्र इथे आहे .

एखादा चित्रपट प्रत्येकालाच आवडेल अस नाही . पण तुम्ही माझ्या खरडलेल्या ह्या चार(?) ओळी जर कदाचित इथपर्यंत वाचायचं धाडस करत असालच तर तुम्हाला आग्रहाची विनंती की हा चित्रपट पहाच . डॉक्टरांच्याच भाषेत सांगायचं तर , चित्रपट पाहून झाल्यावर जर तो तुमच्या प्रश्नांची उत्तर न देता जर प्रश्न निर्माण करत असेल तर तर तो नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक चित्रपट अस म्हणायला हरकत नाही. विस्मरणाचा आजार झालेले ह्यातले ' प्राध्यापक चक्रपाणी शास्त्री ' आपल्याला आपल्या आसपास पण दिसतील …कदाचित आपल्या कुटुंबात सुद्धा . आपण त्यांना कसे स्वीकारतो आणि ' समाज मनाची ' acceptance level (जसच्या तस स्वीकारण्याची वृत्ती ) कशी आहे आहे ह्याचा उहापोह करणारा हा चित्रपट आपल्याला नक्कीच काही शिकवून जाईल .

ह्यातील इतर लोकांबद्दल बोलायचं म्हंटल तर , इरावती हर्षेनी तिच्या भूमिकेच सोन केलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही . १९९५ च्या आसपास पुण्यातील पुरुषोत्तम करंडकातील ' पार्टनर्स ' ह्या नाटकामधून प्रेक्षकाना रडायला लावणारी गुणी अभिनेत्री अमृता सुभाष ने आपली छोटीशीच भूमिका समरसून केलीय . दिग्दर्शक ' सुमित्रा भावे ' आणि ' सुनील सुकथनकर ' ह्याना पैकीच्या पैकी मार्क्स .

इंग्रजी सब टायटल्स असणार्या ह्या चित्रपटा च्या शोला काही जर्मन मंडळीसुद्धा उपस्थित होती आणि चित्रपट संपल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकत असताना लक्षात आल , की अश्या कलाकृतीना भाषेची बंधन नसतात . स्वत: डॉक्टरांनी चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांना केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक डॉक्टर म्हणूनसुद्धा मनमोकळेपणे उत्तर दिली त्यामुळ ह्या कार्यक्रमाची खुमारी अजूनच वाढली .

डॉ. आगाशेनी ह्यातील केवळ मुख्य भूमिका केलीय अस नाही तर ते स्वत: ह्या चित्रपटाचे निर्मातेही आहेत . अश्या वेगळ्या विषयावरचा चित्रपट काढण्याच धाडस करत असताना ‘चित्रपट निर्मितीच्या आर्थिक प्रसव कळा ’ त्यांच्याहून अधिक कुणाला ठाऊक असणार? अशा चित्रपटाला राज्य पुरस्कार मिळतात , वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात तो गौरविला जाऊ शकतो हे खरय पण काहीवेळा चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करण्यात सुद्धा असे चित्रपट कमी पडू शकतात हे वास्तव आहे. वयाच्या सत्तरीत सुद्धा देशोदेशीच्या प्रेक्षकांसमोर ह्या चित्रपटातील संदेश पोहोचविण्याच्या त्यांच्या तळमळीला आणि धडपडीला सलाम !

' अस्तु ' हा खरोखर एक हृद्य अनुभव आहे . कार्यक्रम संपल्यावर मनात एक विचार येऊन गेला , ' इतक्या सुंदर मराठी कलाकृती आणि चित्रपट केवळ मराठीच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांसमोर पोचले पाहिजेत आणि ह्या प्रयत्नातला खारीचा वाटा आपण उचलायला काय हरकत आहे ?

धन्यवाद
अजित नारायण रानडे
Marathi Katta Frankfurt Germany

Private screening of Marathi Film ASTU in frankfurt Germany


( ता. क . -  हा लेख मी जेव्हा खरडला , तेव्हा मी ' लय भारी '  हा चित्रपट पहिला नव्हता . नुकताच तो पहिला , आणि या मताला पोहोचलो की मराठी भाषेला आणि चित्रपट रसिकांना ' अशा '   चित्रपटांची सुद्धा तितकीच गरज आहे . अजय -अतुल   आणि ' माऊली माऊली  '  निव्वळ लाजवाब )