१३ एप्रिल २०१५
बर्लिन
(एखाद्या गोष्टीचा छंद तर प्रत्येकाला असू शकतो , पण त्याचा ध्यास घेऊन जिद्दीने आणि चिकाटीने तो जोपासला आणि त्याला कल्पकतेची जोड दिली तर यशाचे शिखर नक्कीच सर करता येते . 'सचिन विद्याधर जोशी' ह्या डोंगरवेड्या ट्रेकरने, 'गड -किल्ले' ह्या आपल्या आवडीच्याच क्षेत्रात नुकतीच डॉक्टरेट मिळवली आहे . सह्याद्रीतील तब्बल पाच नवीन किल्ले शोधून काढणाऱ्या ह्या बहाद्दराबद्दल त्याच्या सुहृदाने मांडलेले काही अनुभव आणि आठवणी )
साधारणपणे सतरा ते अठरा वर्षांपूर्वीचा सुमार . पुण्यातल्या नारायण पेठेतील एका वर्दळीच्या रस्त्यावरील चहाची टपरी . तिथे रोज संध्याकाळी किमान दहा ते बारा तरुणांचा घोळका तावातावाने चर्चा करताना हमखास दिसायचा. बहुतेकवेळा ह्या सर्व चर्चेचा विषय एकच ' मराठ्यांचा इतिहास , गड - किल्ले आणि दुर्गभ्रमंती म्हणजेच ट्रेकिंग '.
पाठीवरच्या पीट्टूमध्ये तहानलाडू आणि भूकलाडू, घेऊन प्रचीतगड, भैरवगड, मधुमकरंद गडाच्या दाट जंगलात केलेल्या मोहिमांच्या आनंदापुढे पायाला लागलेल्या जळवांचा त्रास काहीच वाटत नसे .
जुलै १९९९ किल्ले कोथळीगड
जुलै १९९९ किल्ले कोथळीगड
इतिहासाच्या आवडीमुळेच,सहावीत असताना आपल्या आतेभावाबरोबर हरिश्चंद्रगडा-पासून दुर्गभ्रमंती सुरु करणारा एक तरुण त्यात होता. त्याच नाव सचिन विद्याधर जोशी .इतिहासाची आवड ,अफाट निरीक्षण शक्ती, सदोदित किल्ल्यांचा आणि नकाशांचा अभ्यास करण्याची सवय , तल्लख स्मरणशक्ती ,नवनवीन किल्ल्यांवर जाण्याची आवड आणि नेतृत्वकौशल्य ह्यामुळे ‘ट्रेकिंग म्हणजे सचिन’ हे समीकरण त्यावेळेस प्रत्येकाच्या डोक्यात पक्क बसल होत.
.अभ्यास आणि कॉलेज आणि काहीजणांची नुकतीच सुरु झालेली नोकरीतली उमेदवारी सांभाळून ह्या सर्व गोष्टी चालत असत . बहुतेकांच्या घरच्या मंडळींचा ह्या डोंगरातल्या '' मनस्वी उनाडकीला'' तीव्र विरोध होता . पालकांच्या मते डोंगरात भटकणं म्हणजे अभ्यासाचा वेळ वाया घालविण त्यापायी ह्या मित्राना घरच्यांची नेहमीच बोलणी खायला लागत असत. त्यातून बहुतेक सारी मंडळी मध्यमवर्गीय घरातील असल्यामुळे ' ह्या भटकंतीचा ' आर्थिक आघाडीवर ताळमेळ घालण म्हणजे अजूनही अवघड कसरत असे . ह्या सगळ्या परिस्थितीत ही सारी दुर्गभ्रमंती सुरु ठेवण म्हणजे खर तर ''सोळा सोमवारपेक्षा अवघड असलेलं व्रत होत '.
ह्याच सुमारास दुर्गप्रेमी सतीश मराठे ह्यांच्या प्रयत्नांतून सुरु झालेल्या 'गिरीदर्शन ट्रेकिंग क्लबचं ‘व्यासपीठ ह्या सर्व मित्रांसाठी खुलं झाल आणि आर्थिक आघाडीवरचा प्रश्न काही प्रमाणात का होईना पण नक्कीच सुटला . कारण ह्यातले बरेचसे तरुण ' पदभ्रमण मोहिमांचे नेते ( ट्रेक लीडर्स ) ' म्हणून आपल्याबरोबर पाच -पन्नास हौशी डोंगरवेड्यांना दुर्ग भ्रमंतीला घेऊन घेऊन जाऊ लागले . आपली नवनवीन किल्ले बघण्याची हौस फुकटात भागवून घेता येते ह्यातच त्याना अपार आनंद मिळत असे .
अशारितीने फक्त परीक्षेचा काळ वगळता जवळजवळ प्रत्येक शनिवार-रविवारचे भन्नाट ट्रेक्स, इतिहासाचा अभ्यास, कोणी किती किल्ले करतो ह्यावर पैजा , एसटी आणि लोकल मधली
धमाल गाणी ,डोंगरात जोडलेला नवीन मित्र परिवार ,फोटोंची
धमाल गाणी ,डोंगरात जोडलेला नवीन मित्र परिवार ,फोटोंची
पारायण आणि कधीकधी ' किल्ल्यांच्या छायाचित्राची प्रदर्शनं ' असा हा डोंगर यात्रेचा आनंद सोहळा अव्याहत सुरु झाला . दुर्गभ्रमंतीची नशा काही औरच होती.
ह्या सर्व गोष्टीत समरस होऊनसुद्धा ''आता ह्याच्यापुढे काय?''हा डोळस विचार सचिन नेहमीच करत असे .किल्ला पहात असताना केवळ इतिहासामध्ये रममाण न होता ,किल्ल्याची तटबंदी , तिथले भग्न - अवशेष , क्वचित अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा ,पाण्याची खोदीव टाकी , चौथरे , पायऱ्या , किल्ल्यांच दरवाजे आणि त्यावरील शिल्पं अशा गोष्टींच बारकाईने निरीक्षण करण्याचा जणू त्याला छंदच जडला. किल्ल्यांच्या परिसरातील मंदीरे , सतीशिळा आणि वीरगळ , तिथले जुने वाडे -गढ्या आसपासच्या डोंगर वाटा,चोरवाटा आणि ह्या सर्वांच्या अनुषंगाने येणारा इतिहास ह्यावर त्याचे तासंतास विचारमंथन सुरु झाले . हे सर्व करताना त्याला खूप प्रश्न पडायचे , बऱ्याच कोड्यांची उकल व्हायची सुद्धा नाही . कादंबरीतील वर्णन आणि ऐकीव माहिती आणि प्रत्यक्षातील परिस्थिती ह्यात बरीच तफावतही जाणवायची . इतिहासातील केवळ ऐकीव अथवा वाचलेल्या गोष्टीना प्रमाण मानून एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहता येत नाही तर त्यासाठी ठोस पुरावे लागतात आणि त्यासाठी मोठा अभ्यास करावा लागतो ह्याची त्याला जाणीव झाली.
ह्याच काळात सचिनची ओळख महेश तेंडुलकर सारख्या इतिहासाने झपाटलेल्या अवलीयाशी झाली . महेशही त्या काळी दुर्गांचा अभ्यास करण्यासाठी डोंगरवाऱ्या करायचा . महेशमुळेच सचिन , ' भारत इतिहास संशोधक मंडळाशी ' जोडला गेला . तिथल्या वेगवेगळ्या विषयातील तज्द्य आणि व्यासंगी मंडळींबरोबर वेळोवेळी होणाऱ्या भेटी , नियमित बैठका आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे , दस्तऐवजांचे वाचन, शोधनिबंधांवरची नियमित चर्चा ह्या सर्व गोष्टींमुळे सचिनचा किल्ल्यांकड बघण्याचा दृष्टीकोन अधिकच व्यापक झाला . दरम्यानच्या काळात सचिनन आपलं रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. एका कंपनीत दोन तीन वर्ष नोकरीही केली . अखंड महाराष्ट्रात दुर्गभ्रमंती तर सुरु होतीच . ह्याच काळात त्याला पुण्यातील ख्यातनाम अशा ' डेक्कन महाविद्यालयात स हाय्यक संशोधक म्हणून काम करायची संधी चालून आली .तिथे नोकरी करता करता त्यानं तिथे ' पुरातत्व शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं . पुरातत्व विभागाच्या वतीने ' चौल येतील उत्खननाच्या कामात सलग चार वर्षं काम केल . आणि हेच दिवस त्याला खूप काही शिकवून गेले .तिथं शिकलेल्या बऱ्याच गोष्टींचा किल्ल्यांचा अभ्यास करताना कसा उपयोग करता येईल ह्यावर त्याच विचारचक्र सतत सुरु झाल .
वेगवेगळ्या विषयांच सखोल डॉक्युमेंटेशन करणे , उपग्रहापासून मिळालेल्या चित्रांचा अभ्यास , 'जीपीएस' च तंत्र वापरून शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ल्याचं मोजमाप करणे अशा अनेक विषयांचा त्याने अभ्यास केला । ह्याकामी त्याला डॉ. विश्वास गोगटे आणि डॉ . श्रीकांत प्रधान ह्याचं अतिशय बहुमोल मार्गदर्शन लाभले त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी हा सर्व अभ्यास आणि ह्या दोन्ही गुरुंच मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरलं .२००६ मध्ये उपग्रहांच्या छायाचित्राचा आधार घेऊन आणि प्रचंड पायपीट करून सचिननं रायगडच्या प्रभावळीतील माणगाव जवळचा ' पन्हाळघर हा नवीनच किल्ला शोधून काढला . कुठल्याही ऐतिहासिक दस्तऐवज आणि कागदपत्रात त्याचा त्याआधी कुठेही उल्लेख नव्हता .
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजी प्रभू देशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात मोहनगड ह्या किल्ल्याचा उल्लेख आहे . हिरडस मावळात असा किल्ला आहे परंतु तो नेमक्या कोणत्या ठिकाणी तो आहे , त्याची स्थाननिश्चिती झालेली नाही हे सचिनच्या लक्षात आल.‘ काळाच्या उदरात आणि इतिहासाच्या गर्तेत’ लपलेल्या त्या किल्ल्याचा शोध घेण्यासाठी त्याने हिरडस मावळातल्या नीरा -देवघर धरण परिसरातील बरेचसे डोंगर अक्षरश: पिंजून काढण्यास सुरुवात केली . बरयाच डोंगरांचा पुरातत्वीय दृष्टीकोनातून अभ्यास केला , निरीक्षण आणि नोंदी केल्या . जवळजवळ दीड वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर २००८ मध्ये त्याला 'मोहनगडाचा शोध लावण्यात यश आलं . तिथे असलेल्या उपलब्ध अवशेषांचा अभ्यास करून , केवळ तर्कावर विसंबून न राहता , दुर्ग स्थापत्याचे सर्व निकष लावून आणि सारी निरीक्षण नोंदवून सरतेशेवटी ' मोहनगड हा किल्ला वरंधा घाटातील जननी देवीच्या डोंगरवर होता हे त्यानं सप्रमाण सिद्ध केल. तसा शोध निबंध ' भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केला ' .
नवनवीन किल्ले शोधण्याची ही उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती . पुढच्याच काही वर्षात त्याने ' अंजनवेलची वहिवाट ' ह्या मोडी लिपीतील कागदपत्रांचा संदर्भ घेऊन माणिकदुर्ग , कासार दुर्ग आणि नवते ह्या नव्या किल्ल्यांचा शोध लावला . ह्या किल्ल्यांवरचा ' माणसांचा राबता ' कधीचाच थांबला होता .केवळ कागदोपत्रीच माहिती असलेले हे किल्ले आहेत कुठे आणि त्यांचा नेमका ठावठिकाणा ना इतिहासाच्या अभ्यासकांना ठाउक होता ना शासनाला . डोंगर भटके आणि ग्रामस्थ, ह्यानाही इथे किल्ले आहेत ह्याबद्दल त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. केवळ इतिहासालाच माहिती असलेले हे किल्ले त्याच्या संशोधनातून वर्तमानात आले.
हे सारे नवीन किल्ले शोधण्याच काम नक्कीच सोप नव्हतं . ’डोंगर शोधण्याच काम हे डोंगराएवढच असणार’ ह्यात शंकाच नाही . हे पाचही किल्ले शोधताना आलेले अक्षरश: शेकडो अनुभव सचिनच्या पोतडीत आहेत.हे अवघड शिवधनुष्य पेलण्याच्या कामात निरपेक्षपणे मदत केलेल्या आणि २०० पेक्षा अधिक नवीन किल्ल्यांच्या भ्रमंतीत साथ दिलेल्या ‘प्रसाद जोशी’ आणि ‘केतकी वाळुंजकर’ ह्या सहकारयांचा तो नेहमीच नम्रपणे उल्लेख करत असतो
ह्यापुढेही जाऊन , गेली काही वर्ष प्रचंड राबून ,कित्येक किल्ल्यांना वारंवार भेटी देऊन,उन्हातान्हाचा आणि पावसाचा विचार न करता किल्ल्यांच्या परत परत चढाया करून आणि त्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण करून , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून , शेकडो कागद पत्र आणि ऐतिहासिक नोदी , दस्तऐवज , संदर्भग्रंथअभ्यासून कठोर परिश्रमाअंती सचिनन नुकतच त्याच पीचडी पूर्ण केलय आणि आता तो ‘डॉ. सचिन विद्याधर जोशी’ झाला आहे . त्यासाठी त्यान निवडलेला विषय होता '' A study of Defence Architecture & Geopolitical Significance of Coastal and Hinterland Forts in Konkan Maharashtra ''. महाराष्ट्रातील किल्ले ' ह्या विषयात अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच दुर्गप्रेमी संशोधक आहे.
गेल्या काही वर्षात त्याची किल्ल्यांवरची काही पुस्तकही प्रसिद्ध झाली आहेत. चारशे पेक्षा जास्ती किल्ल्यांची सर्वेक्षण आणि अभ्यास केलेल्या सचिनला, वेगवेगळ्या शाळा आणि विद्यापीठांमध्ये,परिसंवाद,व्याख्यानं, कार्यक्रम ह्यातून नेहमीच बोलावण असतं . वेगवेगळ्या शाळांनी आयोजित केलेल्या दुर्ग अभ्यास सहलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधायला तो नेहमीच उत्सुक असतो .किल्ल्यांचा अभ्यास, नवीन पिढीने फक्त भावनेच्या आहारी नजाता शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा ह्याबाबत त्याला खूपच तळमळ आहे . दुर्गप्रेमी मंडळी आणि दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थांना तर तो वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतोच . महाराष्ट शासनाने दुर्ग संवर्धनासाठी नेमलेल्या समितीत सचिनचा समावेश करून त्याच्या ह्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला पोचपावतीच दिलेली आहे असं म्हंटल तर नक्कीच वावग ठरणार ठरणार नाही .
ह्या सगळ्या धावपळीत त्यानं संशोधन आणि सर्वेक्षण मोहिमा , किल्ल्यांचा पुरातत्वीय अभ्यास , वेगवेगळे शोध निबंध ह्यावरचा ज्ञानयज्ञ अखंड सुरु ठेवलाय .यशामुळे हुरळून न जाता 'आता ह्यापुढे काय ? ' हा प्रश्न तो स्वत:ला नेमीच विचारात असतो. त्याच्या सध्या चालू असलेल्या संशोधनातून येत्या काही महिन्यात अजूनही काही नवीन माहिती लवकरच उजेडात येणार आहे असं दिसतंय . सचिनच वैशिष्टय सांगायचं तर ,' किल्ल्यांचा आणि इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी तो केवळ इतिहासाची पुस्तक आणि कागदपत्रात रमला नाही’. त्यासाठी प्रसंगी घरापासून दूर राहून , दगदग सोसून स्वत: शेकडो डोंगर पालथे घातले . पुरातत्त्वीय शास्त्र आणि ऐतिहासिक नोंदी , कागद पत्रांचा अभ्यास ह्यांचा सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला . त्याच्या मते किल्य्यांना ‘ स्वत: प्रत्यक्षात भेट देणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे . त्याच्या दृष्टीने सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे , सचिनच्या पावलावर पाउल ठेऊन बरेच तरुण - तरुणी दुर्ग संशोधनासाठी पुढे येत आहेत आणि हे नक्कीच सुखावह चित्र आहे . भविष्यात महाराष्ट्रातील चारशेच्या आसपास असलेल्या किल्ल्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास आणि दुर्गांच्या स्थापत्यावरील संशोधन करण्याचा मनोदय तो बोलून दाखवतो . खरतर चारशे किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी उभी हयात खर्ची घालावी लागेल ह्याची त्याला जाणीव आहे
''घरात आपण स्वत:च ठेवलेली ' गाडीची किल्ली ' कधीकधी आपल्याला हवी तेव्हा सापडत नाही . आणि इथे तर सर्वसामान्य घरातून पुढे आलेला आणि मराठ्यांच्या इतिहासाची आवड असणारा हा तरुण पुढे येतो काय आणि आपल्या अथक परिश्रमांने 'पाच नवीन किल्ले शोधून काढतो काय ? खर तर … सगळच विलक्षण ''
. आपल्याला एखाद्या विषयाची आवड आहे अस म्हणून फक्त चालत नाही तर त्या आवडीला अभ्यासाची आणि कल्पकतेची जोड देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून , त्या क्षेत्रात निष्ठेने वाटचाल केली तर त्यात स्वत:च भवितव्य घडविता येत आणि समाजाला सुद्धा आपल्यापरिने योगदान देत येत . त्यासारखं दुसर समाधान काय असू शकेल? ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. सचिन विद्याधर जोशी.त्याच्या ह्या कार्याला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !
मनापासून अभिनंदन !!
उत्तर द्याहटवाwell written. Thanks
उत्तर द्याहटवा