सोमवार, १८ मे, २०१५

'लॉक ग्रिफिन' ते 'कॅम्प फायर' - एक 'धुंद स्वच्छंद' आनंदयात्रा


                                                                   जर्मन डायरी                                                                               १८  मे  २०१५ 

वसंत वसंत लिमये  उर्फ ' बाळ्या '  ह्या    माणसाबरोबर  खर तर मी    दोनेक वर्षच काम केल असेल   .  हिमालयातील ऋषिकेश  आणि  सिक्कीमपासून ते  तमिळनाडूतील  एर्काटपर्यंत  आणि   विक्रमगड , दमण , सजन  रिसोर्ट   पासून  ते गोमंतकापर्यंतच्या   सह्याद्रीच्या  पट्ट्यात     त्याच्याबरोबर  डोंगरात  फिरण्याचा अनुभव  मला मिळाला हे माझ अहोभाग्य .  हे  काम करत असताना खूप शिकायला मिळाल अस   म्हणण्यापेक्षा   कधी कधी  असा प्रश्न पडतो की ''    शिकायला काय  नाही मिळाल ?''    त्याच्या 'हाय प्लेसेस'  ह्या संस्थेबरोबर केलेल्या ह्या  देशभरातील  भटकंती मधून  /  जी अनुभवांची शिदोरी मिळाली  ती जगात कुठेही गेलो तरी आयुष्यभर  पुरेल ह्याची खात्री आहे  .डोंगरात फिरताना जी  मित्रमंडळी इथे  जोडली गेलीयेत  आणि आठवणींच्या कुपीत साठवण्याजोगे जे विलक्षण अनुभव जगलोय   ते तर ह्या सह्याद्रीचे  आणि हिमाईचे    अनंत  उपकार . 
    आयआयटी यन  ,  गिर्यारोहण क्षेत्रातील   आम्हा सर्वांचा  आदर्श , उत्तम  कलाकार  ,  सिद्धहस्त लेखक ,  एक यशस्वी व्यावसायिक   म्हणून  माहिती असलेल्या ' बाळ्याचा  वर्तमानपत्रातील कोणताही लेख , ' धुंद स्वच्छंद ' सारख पुस्तक असो की ' लॉकग्रिफिन सारखी भन्नाट ' कादंबरी  ह्या गोष्टी   केवळ '  पुस्तकाच्या कपाटाच्या कप्प्यात नव्हे तर  आमच्या हृदयाच्या  कप्प्यात  ठाण मांडून बसलेल्या आहेत .   अशा  ह्या हरहुन्नरी अवलियाचं नवीन    पुस्तक येऊ घातलंय  ग्रंथाली प्रकाशनातर्फे .    त्याचे  अनुभव   आपल्या जाणीवा कल्पनेपलीकडे समृद्ध करतील ह्याची खात्री आहे .  कोकण कड्याच्या पहिल्या यशस्वी चढाई पासून ते एक दोन नाही तर हिमालयातील तब्बल सोळा हिमशिखरांच्या  मोहिमांचा अनुभव असलेला ह्या माणसाने  'माणस'  घडवायचं  काम केलय ते वेगळच . 

त्याचं  पुस्तकही  त्याच्या नावासारखच   एकदम   आगळवेगळ   'कॅम्प फायर' ….  ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा  दिवस  २९ मे हा  त्यान   त्यानं  आणि त्याच्या  प्रकाशकांनी   विचार करून निवडला असणार हे निश्चित .   .   

 पृथ्वीच्या तिसरया   ध्रुवावर मानवाचं  पाऊल  ह्याच दिवशी  १९५३ साली   पडलं   होत … तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी ह्यांनी  जेव्हा   पृथ्वीतलावरचं  सर्वोच्च शिखर सागरमाथा अर्थात माउंट  एव्हरेस्ट सर केल तेव्हा . 

 जो माणूस  तब्बल चव्वेचाळीस वर्ष ह्या क्षेत्रात कर्तृत्व  गाजवून   डोंगराएवढ  काम करून ठेवतो त्याच्या पुस्तकाला  आणि त्याच्या विचारांना  डोंगरा एवढी प्रसिद्धी देण   हे   आता माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य मराठी वाचकाचं काम आहे . 
पुण्यातील माझ्या सर्व मित्र मंडळीना  आणि त्यातूनही  ' गिर्यारोहण  , पदभ्रमण , भटकंती  , साहस  ह्या क्षेत्रातील  मित्र मंडळीना  नम्र आवाहन , विनंती  आणि तंबी … २९ मेचा कार्यक्रम चुकवायचा विचार  मनातही आणू नका . 


                              II शुभम भवतु II 


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                                 वसंत लिमये ह्याचं अजून एक पुस्तक     

                            

                                                      जर्मन डायरी 

                                                   - मु. पो . बर्लिन ऑगष्ट २०१२


मित्रवर्य (आणि खरे तर गुरूवर्य) वसंत वसंत लिमये ह्यांच्या 'लॉक ग्रिफिन' ह्या मराठी कादंबरीवरचा माझा अभिप्राय माझ्या शब्दात 

 (वेळ आणि इच्छा असेल तर जरूर वाचणे )

प्रिय बाळ्या, सध्या युरोपात सुट्टीचा हंगाम आहे ... त्यामुळे ठरवलं की 
ह्या कादंबरीच्या नायकाला तुझ्या 'भद्राला' तो अमेरिकेत जायच्या आधी आमचं 'फ्रँकफर्ट ' दाखवावं...

एयरपोर्ट वरून त्याला सकाळी उचललं आणि तडक 'युरोटौवर(European Central Bank ) गाठलं आणि पुढच्या आठ तासात त्यानं मला डोंबिवली ,नासिक आणि दिल्लीच्या कॅनौट प्लेस पासून कुमाऊ हिमालयापर्यंत आणि आणि लुईस मौंटन कॅम्प साईट अमेरिकेपासून पार आईसलंड, लंडन आणि परत दिल्लीपर्यंत असं काही फिरवलं की संध्याकाळी डोक गरगरायला लागल आणि मी 'लॉक ग्रिफिन' ग्रस्त झालो ... आणि श्रावणात जे करायची इच्छा नव्हती तेच करायला लागल . 

असो , . ...तुझ्या अगाध आणि अचाट निरीक्षण शक्तीला सलाम ! ज्या बारकाईने तू तपशील मांडले आहेस त्याला तोड नाही .... त्याच त्या 'ललित , प्रवासवर्णन , प्रेमकथा , ऐतिहासिक , इंग्रजीचे अनुवाद आणि भाषांतर ' अश्या मिळमिळीत आणि चाकोरीबद्ध साहित्यामुळे , माझ्यासारख्या सामान्य मराठी वाचकांमध्ये आलेली मरगळ , तुझ्या 'लॉक ग्रिफिन' कादंबरी ने झटकून टाकली आहे .... रहस्यमय इंग्रजी कथांना लाजवेल असा ' थ्रील्लर सस्पेन्स ' ह्या मराठी कादंबरीत आहे ...आणि ती खरोखर वैश्विक कादंबरी झाली आहे .

 माझ्या यथातथा इंग्रजी भाषेत माझ्या युरोपातल्या मित्र -मैत्रीणीना मी ह्या पुस्तकाबद्दल सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ... पण त्यांनी तुलाच उलटा निरोप धाडला आहे , की लवकरच ह्याच इंग्रजी भाषांतर हवंय ! आणि हो , तुझ्या पुढच्या कादंबारीचा चा नायक मात्र युरोपात आला पाहिजे ....त्याला काही लागेल ती मदत आपण करू . - 


परत एकदा धन्यवाद , 

अजित रानडे 

मराठी कट्टा  फ्रँकफर्ट , जर्मनी

बुधवार, ६ मे, २०१५

थेट भेट - डॉ. मोहन आगाशे’ 21st to 26th July 2014

स्थळ - फ्रँकफर्ट ट्रेन स्टेशन , संध्याकाळचा सहाचा सुमार 
Bitte zurücktreten, Zug fährt auf Gleis dreizehn (बिट झुरूक त्रेक्तन , झुग फार्त औफ ग्लाइस ड्रायझेन ) अशी अतिशय स्पष्ट आणि तितक्याच खणखणीत आवाजात उद्घोषणा होतीय … जर्मन भाषेची जाण नसणारे आणि थोडेसे गोंधळलेले काही प्रवासी ' भिवई वरती करून आणि कपाळाला आठ्या घालत ' इंग्रजीत सुद्धा ही उद्घोषणा होतीय का ह्याची वाट पाहताहेत … धीर नसलेल्या काही प्रवाशांची ह्याचा अर्थ काय हे इतरांना विचारण्यासाठी केविलवाणी धडपड चाललीय .

तसंही गर्दीने गजबजलेल्या ह्या स्टेशन वर ही वेळ म्हणजे नक्कीच धावपळीची . ऑफिसेस मधून सुटलेल्या सुटाबुटां तल्या चाकरमान्यांची घरी जायची आणि बाहेरगावहून इथे आलेल्या प्रवाशांची हॉटेलवर जाण्याची लगबग … बाहेरून इथे येणाऱ्या आणि ह्या स्टेशन वरून युरोपातील मोठ्या शहरांसाठी सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या येण्या जाण्यातून निर्माण होणार एक ' एक आगळं वेगळं  ' संगीत इथे कानावर पडतं …इतक्या गर्दीत सुद्धा 'कबुतरं' काहीतरी टिपताना दिसताहेत आणि काही तुरळक भिकारी आपलं काम निष्ठेने करताहेत . इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या ' नाईट लाईफ ' साठी आसुसलेले काही बुभुक्षित निशाचर  गल्लीबोळातल्या काही 'खास' जागांचा शोध घेण्यात मग्न आहेत . ही गर्दी मला मात्र अजिबात नवीन नाहीये .

साव्व्वासाहाच्या सुमारास, डोक्यावरची उजवीकडे झुकणारी ती खास ' नेपाळी गुरखा टोपी' किंचित डावीकडे करत सत्तरीचा एक तरुण येताना दिसला . त्याच्या चालण्याच्या रुबाबावरून ह्या गर्दीत तो नवखा आहे अस अजिबात वाटल नाही . जवळ येत त्याने माझे सहकारी श्री रवी देशपांडे आणि सलील प्रधान ह्यांच्याशी हस्तांदोलन केल आणि जणू काही मला बर्याच वर्षांपासून ओळखत असावेत अश्या पद्धतीने माझ्या पाठीवर हलकीशी थाप मारून स्वत:ची ओळख करून दिली ‘ डॉ. मोहन आगाशे’.

पुढे स्टेशन जवळच्याच एका विश्रांती गृहात ' फ्रेंच वाईन ' आणि ' जर्मन रॅड्लर ' च्या संगतीत गप्पागोष्टींना चांगलाच बहर आला आणि पुढच्या तास -दीड तासात माझ्या ' अनुभव पुस्तकात ' अजून काही चाप्टर आड (add ) झाले हे सांगणे न लगे. १९७९ -८० पासून नित्य नियमाने जर्मनीत किंबहुना युरोपात येणाऱ्या डॉक्टरांशी ' घाशीराम कोतवाल ' ते 'काटकोन त्रिकोण ' आणि ' दु अँड मी ( Du And Me) ' पर्यंतच्या गप्पा झाल्या .

पुढे त्याच आठवड्यात शनिवारी २६ जुलै ला त्यांच्या ' अस्तु -सो बी इट ' ह्या चित्रपटाचा शो ' private screening ' आम्ही काही मित्र मंडळीनी आयोजित केला होता . महाराष्ट्रात प्रदर्शित व्हायच्या आधीच हा चित्रपट बघायला मिळतोय आणि तोही मोहन आगाशे ह्यांच्या उपस्थितीत ह्याचं आम्हा प्रत्येकाला कुतुहूल मिश्रित कौतुक होत .

नुकताच 'स्टूटगार्ट जर्मनी' इथल्या आन्तरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट जर्मन लोकांना प्रचंड आवडला आणि त्याच महाराष्ट्राबाहेर प्रचंड कौतुक होतंय . येत्या १ ऑगष्ट ला तो पुण्यात प्रदर्शित होतोय त्यामुळे ह्या चित्रपटाबद्दल फारस काही लिहित नाही . ध्यानातून मिळणार्या आनंदाची केवळ अनुभूतीच घ्यावी लागते .चौपाटीवरच ' चाट ' आणि आमच्या कोल्हापूरच्या' मिसळी वरची तर्री ' ह्य्याची चव समजावून सांगता नाही येत , ती प्रत्यक्ष चाखायला लागते . तसच काहीस इथेही आहे

तद्दन गल्लाभरू ' लय भारी ' चित्रपटांची ' कीक  ' आपल्या सर्वाना बसल्यामुळे ही  ' Highly proteinecious dish of entertainment (सकस , पोष्टिक आणि दर्जेदार मनोरंजनाची डीश ) ' आपण कशी पचवतो हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भौतिक प्रगतीमुळे सध्या माणसाच सरासरी आयुर्मान वाढलंय आणि त्याचबरोबर अनेक समस्याही . (Dementia) विस्मरणासारखा असाध्य रोग जडल्यावर एका विद्वान प्राध्यापाकाची होणारी अवस्था , त्याच्या कुटुंबाची आणि आप्तस्वकीयांची होणारी फरफट आणि त्यातील नातेसंघर्ष ह्याच अतिशय प्रभावी चित्र इथे आहे .

एखादा चित्रपट प्रत्येकालाच आवडेल अस नाही . पण तुम्ही माझ्या खरडलेल्या ह्या चार(?) ओळी जर कदाचित इथपर्यंत वाचायचं धाडस करत असालच तर तुम्हाला आग्रहाची विनंती की हा चित्रपट पहाच . डॉक्टरांच्याच भाषेत सांगायचं तर , चित्रपट पाहून झाल्यावर जर तो तुमच्या प्रश्नांची उत्तर न देता जर प्रश्न निर्माण करत असेल तर तर तो नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक चित्रपट अस म्हणायला हरकत नाही. विस्मरणाचा आजार झालेले ह्यातले ' प्राध्यापक चक्रपाणी शास्त्री ' आपल्याला आपल्या आसपास पण दिसतील …कदाचित आपल्या कुटुंबात सुद्धा . आपण त्यांना कसे स्वीकारतो आणि ' समाज मनाची ' acceptance level (जसच्या तस स्वीकारण्याची वृत्ती ) कशी आहे आहे ह्याचा उहापोह करणारा हा चित्रपट आपल्याला नक्कीच काही शिकवून जाईल .

ह्यातील इतर लोकांबद्दल बोलायचं म्हंटल तर , इरावती हर्षेनी तिच्या भूमिकेच सोन केलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही . १९९५ च्या आसपास पुण्यातील पुरुषोत्तम करंडकातील ' पार्टनर्स ' ह्या नाटकामधून प्रेक्षकाना रडायला लावणारी गुणी अभिनेत्री अमृता सुभाष ने आपली छोटीशीच भूमिका समरसून केलीय . दिग्दर्शक ' सुमित्रा भावे ' आणि ' सुनील सुकथनकर ' ह्याना पैकीच्या पैकी मार्क्स .

इंग्रजी सब टायटल्स असणार्या ह्या चित्रपटा च्या शोला काही जर्मन मंडळीसुद्धा उपस्थित होती आणि चित्रपट संपल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकत असताना लक्षात आल , की अश्या कलाकृतीना भाषेची बंधन नसतात . स्वत: डॉक्टरांनी चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांना केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक डॉक्टर म्हणूनसुद्धा मनमोकळेपणे उत्तर दिली त्यामुळ ह्या कार्यक्रमाची खुमारी अजूनच वाढली .

डॉ. आगाशेनी ह्यातील केवळ मुख्य भूमिका केलीय अस नाही तर ते स्वत: ह्या चित्रपटाचे निर्मातेही आहेत . अश्या वेगळ्या विषयावरचा चित्रपट काढण्याच धाडस करत असताना ‘चित्रपट निर्मितीच्या आर्थिक प्रसव कळा ’ त्यांच्याहून अधिक कुणाला ठाऊक असणार? अशा चित्रपटाला राज्य पुरस्कार मिळतात , वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात तो गौरविला जाऊ शकतो हे खरय पण काहीवेळा चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करण्यात सुद्धा असे चित्रपट कमी पडू शकतात हे वास्तव आहे. वयाच्या सत्तरीत सुद्धा देशोदेशीच्या प्रेक्षकांसमोर ह्या चित्रपटातील संदेश पोहोचविण्याच्या त्यांच्या तळमळीला आणि धडपडीला सलाम !

' अस्तु ' हा खरोखर एक हृद्य अनुभव आहे . कार्यक्रम संपल्यावर मनात एक विचार येऊन गेला , ' इतक्या सुंदर मराठी कलाकृती आणि चित्रपट केवळ मराठीच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांसमोर पोचले पाहिजेत आणि ह्या प्रयत्नातला खारीचा वाटा आपण उचलायला काय हरकत आहे ?

धन्यवाद
अजित नारायण रानडे
Marathi Katta Frankfurt Germany

Private screening of Marathi Film ASTU in frankfurt Germany


( ता. क . -  हा लेख मी जेव्हा खरडला , तेव्हा मी ' लय भारी '  हा चित्रपट पहिला नव्हता . नुकताच तो पहिला , आणि या मताला पोहोचलो की मराठी भाषेला आणि चित्रपट रसिकांना ' अशा '   चित्रपटांची सुद्धा तितकीच गरज आहे . अजय -अतुल   आणि ' माऊली माऊली  '  निव्वळ लाजवाब ) 


मंगळवार, ५ मे, २०१५

माझ्या शाळेचा वाढदिवस
                                                                                                                   

                                                                                                           
                                                                                                             माईन नदीचा किनारा 
                                                                                                             १५ सप्टेंबर २०१३

रविवारचा दिवस ..सकाळीच घराजवळच्या  नदीच्या किनाऱ्यावर एक चक्कर मारायला बाहेर पडलो .....नदीवरून येणारी गार वारयाची झुळूक हिवाळा जवळ आलाय ह्याची सारखी जाणीव करून देत होती ..आभाळ भरून आल होत ...आणि मनात सुद्धा आठवणींचे मळभ दाटून यायला सुरुवात झाली... आणि बघता बघता मी शाळेच्या आठवणीत हरवून गेलो ..खरतर तर त्याला एक कारणही होत ...कोल्हापूर जिल्ह्याच्या  एका टोकाला असलेल्या एका छोट्या खेड्यातली आणि निसर्गसुंदर परिसरात वसलेली माझी छोटी शाळा आज मोठी झाली होती .स्थापनेची पन्नास वर्षं पूर्ण करत होती . आणि ठरवलं की आज मी शाळेला भेट देऊ शकत नसलो तरी , पत्र लिहायला काय हरकत आहे?


माननीय मुख्याध्यापक
एम डी विद्यालय , अर्जुन नगर ,
जिल्हा ,कोल्हापूर

नमस्कार  सर  ! मी अजित रानडे , आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी ! शाळेच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर .

साल १९८६ ...पावसाळा संपत आलेला ... अपघातामुळे पहिले तीन महिने मी शाळेला जाऊ शकलो नव्हतो.... शाळेचा पहिलाच दिवस ... वर्गात प्रवेश केल्यावर लक्षात आल ..की तो ऑफ पिरेड होता ... " व्हनुंगरे " सर सर्वाना अतिशय सुंदर सुरात एक कविता शिकवीत होते ...खर तर गात गात शिकवत होते

" गे मायभू तुझे मी
फेडीन पांग सारे
आणीन आरतीला
हे सूर्य चंद्र तारे "

बहुधा त्यावर्षीच्या पाठ्यक्रमात सुद्धा ती कविता नसावी ...पण ज्या तल्लीनतेने सर ती कविता शिकवत होते त्यामुळे पहिल्याच दिवसापासून ह्या शाळेशी एक वेगळंच नात तयार झाल

इथल्या सर्व गुरुजनांनी अपार आणि निर्व्याज प्रेम दिल .... NDS सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत खेळलेले सर्व खेळ , MNK, VK आणि  वाळवे मॅडम    ह्यांच्याबरोबर स्नेहसंमेलनात  मध्ये केलेली धमाल ,  APK,MD Patil आणि PK जोशी सरांकडून गणित आणि भूमिती शिकताना खाल्लेले प्रेमाचे फटके ... शनिवारी शाळा सुटल्यावर मित्रांबरोबर केलेल्या उचापती,सायकल वरून रामलिंग आणि आणि अडी-मलय च्या डोंगरात काढलेल्या नेहमीच्या मोहिमा आणि त्यातूनच आयुष्य भर त्यांच्या बरोबर जोडली गेलेली एक मित्रत्वाची नाळ.

इतिहासाच्या सरांमुळे वाढलेली त्या विषयातली आणि विशेषत: युरोप च्या इतिहासाबद्दलची रुची ..माझ्या शिक्षकांनी पॅरिस  तर जाऊच  दे पण पुण्या - मुंबईला सुद्धा किती वेळा भेट दिली असेल कोण जाणे ? पण माझिनी आणि इटली , फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यावेळच पॅरिस , व्हर्सायचा राजवाडा , मेरी अन्तोनेत आणि तिचे विलासी राहणीमान ,युरोपातील महायुद्धं ह्याबद्दल आमच्या इतिहासाचा वर्ग संपल्यावर सुद्धा तासन तास गप्पा होत असत ...  युरोपात राहत असल्यामुळे आणि फिरतीचीच नोकरी असल्यामुळे  आज   जेव्हा जेव्हा मी ह्याठिकाणी भेट देतो तेव्हा तुमची आठवण नक्की होते सर !

.. १९८६ ते १९८९ ही तीन वर्षे आयुष्यातली सर्वात सुंदर आणि रम्य अशी वर्ष होती .

त्यातून जी गोड आठवणींची पुंजी मिळाली ती आयुष्यभर टिकून राहील ... विशेषत: कामानिमित्य गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर राहत असताना ह्या सगळ्या आठवणी मनात रुंजी घालत असतात . शाळेत मिळालेले साधेपणाचे संस्कार पाय जमिनीवर ठेवण्यासाठी नेहमीच मदत करतात .

५० वर्षे हा एक खूप मोठ्ठा टप्पा आहे आणि ह्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची .. ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायची खूप इच्छा होती सर पण दुर्देवान शक्य नाही . ह्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व आजी , माजी विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक आणि गुरुजनांना खूप खूप शुभेच्छा .


आपला नम्र
अजित नारायण रानडे

सोमवार, ४ मे, २०१५

ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं


                                                                                                             

                                                                                                        जून २०१२ 
                                                                                                      जर्मन डायरी 
अख्ख्या युरोपला सध्या फुटबॉल ज्वरानं  ग्रासलय  ! फ्रॅंकफर्ट स्टेशन जवळच्या " ओरिलीज" पबमध्ये प्रचंड मोठ्या स्क्रीनवर " जर्मनी - डेन्मार्क'  पहात होतो .. रंगीबेरंगी वेश परिधान केलेल्या तरुण तरुणींचा सळसळता उत्साह, मद्याचे हिंकाळणारे चषक,जोरदार शिट्ट्या, प्रचंड गोंगाट ह्यांनी वातावरण भारून गेलंय ! आणि ह्याच वेळी सर्वांपासून थोडा दूर कोपऱ्यात एक पन्नाशीचा  माणूस दिसला ...'देसी ' होता हे नक्कीच .. बहुधा पाकिस्तानी असावा ...त्याच्या डोळ्यात पाणी दिसत होत .....काही विचारण्याच्या आधीच त्यान त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला ...... त्यावर गाणे चालू होत ....... " ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं...मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा" . आजूबाजूला चाललेल्या त्या प्रचंड गोंगाटात सुद्धा , मेहेदी हसन साहेबांचा तो स्वर्गीय आवाज मी अचूक ओळखू शकलो ... एकापेक्षा एक सरस आणि अवीट गोडीच्या गझलानी संगीतरसिकांवर पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे गझलसम्राट मेहदी हसन साहेब नुकतेच गेले ....आणि भारत आणि पाकिस्तान ह्यांना सांधणारा शेवटचा अत्यंत महत्वाचा दुवा नाहीसा झाला ! जगजीत सिंह ,सुरेश भट आणि आता साक्षात मेहेंदी हसन साहेब आपल्यात नाही आहेत ....आणि 'गझल' खरोखर पोरकी झालीय ! ह्या गझल सम्राटाला मानाचा मुजरा !

शनिवार, २ मे, २०१५

ब्लॉगारंभ - महाराष्ट्र दिन , १ मे २०१५ आणि मी

                                                                                                   


कालच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिल २०१५ ला    ' हिटलरनं  ' आत्महत्या केल्याला   बरोब्बर  ७० वर्षं पूर्ण   झाली ...   आणि त्याच्याच  किंवा खर तर मला आवडणारया ' बिस्मार्कच्या  ' ह्या  जर्मनीत    मला येऊन  तब्बल ४४ महिने . 


सध्या   इथं   एका फ्रेंच कंपनीत जर्मन लोकांबरोबर  इंग्रजी भाषेचा  टेकू घेऊन    जर्मनी  आणि  आसपासच्या    काही देशात फिरण्याच काम  करतो ,विक्री प्रतिनिधी म्हणून .

जर्मन भाषा किती समजते हा  जरी संशोधनाचा  विषय असला तरी ,  समोरचा माणूस ' जर्मन मध्ये   बोलतोय की  इटालियन  अथवा फ्रेंचमध्ये ' हे मी नक्की सांगू शकतो . 


युरोपात    तीन चार हिवाळे काढल्यानंतरही   मनातल्या संवेदना अजून नक्कीच  गोठलेल्या नाहीयेत …

आयुष्य थोडं बदललं  असलं तरी , डोक्याची मंडई करणाऱ्या  समोरच्या माणसाला हासडली   जाणारी शिवी ' अस्सल मराठीच असते ' 

दरम्यानच्या काळात   जसं  इथल्या   ' ऱ्हाईनच्या ' पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलय   … तसं    तिकडही मुळा -मुठेच्या  आणि  आमच्या कोल्हापूर -निपाणीच्या  पंचगंगा आणि वेदगंगेच्या    सुद्धा  . … 

बऱ्या…. च  गोष्टी बदलल्या .…   

'' भूकंप झाले , खून पडले …  डॉलर - युरो वर- खाली होत राहिले 
 तेलाच्या किमती  चढल्या  -उतरल्या …  विमान पाडली गेली 
 जातीपातीच्या,  दहशतवादाच्या राजकारणानं   अख्खं जग ढवळून निघालं 

गाजरं  दाखवली गेली  , टोप्या घातल्या , फिरवल्या , निष्ठा    बदलल्या 
देशोदेशीची सरकारं   बदलली  , इतिहासाच्या खुणा  मिटवायचा प्रयत्न झाला 
वर्तमानाच्या कानशिलाला बंदूक लावून भविष्य घडवायचा प्रयत्न चालू झाला 

' कुठल्यातरी भाषेच्या आक्रमणामुळे दुसऱ्या कुठल्यातरी भाषेची ' मुस्कटदाबी झाली 
सांकृतिक दहशतवादाच्या भस्मासुराने  इथे युरोपात  Charlie Hebdo  ला संपवायचा  प्रयत्न केला 
आणि कदाचित तिकडे   कॉम्रेड  पानसरे आणि  नरेंद्र दाभोळकरांचा धगधगता अंगार   विझवला 


तिकडे 'भूमी अधिग्रहणाचे  आणि इकडे ' समलिंगी  संबंधांचे समर्थक-विरोधक एकमेकांना   भिडले  
' लव जिहाद ' आणि ' घर वापसी' वर चर्चासत्र झडली , ' निर्भयां वरचे बलात्कार चालूच  राहिले  

पत्रिकेतल्या 'मंगळाशी' जमो वा ना जमो पण खऱ्या मंगळावर 'प्लॉटस कधी पडणार' ह्याचे विचार सुरु झाले  
इकडे आम्सटरडॅम,पॅरिसच्या चकचकीत  आलिशान  पब्समध्ये  मद्याचे चषक रिते होत राहिले  
आणि तिकडे  मलबार हिल वरच्या  धनदांडग्यांच्या  टॉवरचे  इमले एकावर एक चढतच  राहिले  

'' पण खपाटीला गेलेल्या  पोटाच्या त्या खेड्यातील शेतकऱ्यानं आपलं स्वत:च इमान विकल नाही 
नसेल  जरी घरात खायला दाणा तेव्हा सरळ मृत्यूला कवटाळलं पण दुसऱ्याच घर  कधी फोडलं नाही ''
बस्स   मित्रानो , 


सांगायसारखं   असं खूप घडतय  आजूबाजूला आणि  मनात सुद्धा …  
आज  विचार केला की कधी वेळ मिळेल तेव्हा जमेल तसं  लिहाव …  म्हणून हा ब्लॉग प्रपंच . 
मी कोणी सिद्धहस्त लेखक  नाही  … तसच  अशुद्धलेखन आणि ऱ्हस्व- -दीर्घाची  ओढाताण हा प्रकार सुद्धा बऱ्याच वेळा होईल ह्याची खात्री आहे . ( किंबहुना  तिकडे बघायला  वेळसुद्धा नाही अजिबात  ) . 


खर तर    गेलं वर्षभर   ठरवतोय आज ब्लॉग लिहू उद्या लिहू , पण  काय करणार न्युटनचा पहिला नियम  आड येतो '' Law of inertia ''    .  जडत्वाचा किंवा खर  तर आळसाचा  नियम  म्हणायला हव  …  आणि न्यूटन  महाशयांनी   तो नियम माझ्याकडे बघूनच जगासमोर मांडला आहे अशी माझी खात्री  आहे  . असो , ह्या अवस्थेतून बाहेर काढण्याच  आणि धक्कास्टार्ट  करण्याच  काम माझ्या काही जवळच्या मित्र मंडळीनी केलय त्याना खूप धन्यवाद.  

 खर तर   मी भारतात असतांना  सह्याद्रीतील  जे दोनेकशे डोंगर -किल्ले पालथे घातले त्याबद्दलच लिहावं  असा विचार मनात डोकावत होता  होता . ' साहस पर्यटन'  ह्याच  क्षेत्रात बराच  काळ काम केल्यामुळे 'हिमालयातील बऱ्यापैकी केलेल्या   भटकंतीचे अनुभव शब्दबद्ध करावेत असंही   वाटत होत .  पण नंतर लक्षात आलं  की  ह्याच  विषयाला वाहिलेले  आणि अप्रतिम फोटोनी  सजलेले  सुंदर सुंदर ब्लॉग्स  माझे बरेच नवीन  मित्रमैत्रिणी  लिहिताहेत . आणि ते वाचायला मला जास्ती आवडतात . 

 मग ठरवलं की जेव्हा जे काही मनात येईल ते लिहायचं  . नवं - जुनं , क्वचित पूर्वी पेपरमध्ये किंवा कुठल्याश्या मासिकात  छापून  आलेलं …  आणि   बऱ्याच वेळा मीच माझ्या   फेसबुकवर पूर्वी  खरडलेलं  लिखाणसुद्धा ह्या ब्लॉगवर  टाकायचा नक्कीच प्रयत्न करायचा    . … 

जगातल्या बऱ्याच  सुंदर  किंबहुना  चांगल्या- वाईट   गोष्टीत आणि वेगवेगळ्या   क्षेत्रांत    थोडी  जास्तीच  रुची  असल्यामुळे … रोज नवे अनुभव येतात  आणि जाणीवा कल्पनेपलीकडे  समृद्ध होत असतात . उचंबळून येणाऱ्या   ह्या विचारांना मूर्त स्वरूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न.  

स्वत:ला   व्यक्त  करण  आणि इतरांनी  ते वाचावं   अशी  अपेक्षा असण्यात काहीच वावग नाही . माझीही माझ्या  मित्र मंडळींकडून तशी  अपेक्षा नक्की आहे , हे न संकोचता सांगतो .  मित्र मंडळींच्या ' लाईक्स'ना  किंवा  त्यांनी केलेल्या स्तुतीला उत्तर देताना माझा आळस  आड येतो  , तेव्हा कृपया  माझ्या प्रतिसादाची  अपेक्षा बाळगू नका  अशी नम्र विनंती  … ( कृपया राग , गैरसमज नसावा ) .   एखाद्या लेखावरून कुणी वादाचे विषय उकरून काढत असेल तर त्याचा प्रतिवाद करायला लागणारी सहनशक्ती , वेळ आणि इच्छा  कदाचित  माझ्याकडे नसेल   . ( त्यामुळे वादाच्या विषयात फारसं  न पाडण्याकडे माझा कल  राहील हे नक्की  ) 

 खरं   सांगायचं तर , ब्लॉग लिहिण्याचा  माझा उद्देश   थोडा वेगळाच   आहे .…   अजून २५ -३० वर्षांनी,  कदाचित मी जेव्हा आतासारखा भटकू शकणार नाही , तेव्हा सह्याद्रीतील किंवा हिमालयातील  कुठच्यातरी  डोंगरातल्या किंवा शेतातल्या  माझ्या छोट्याश्या घराच्या  बाल्कनीत   , आरामखुर्चीवर  सुखावताना ही माझी ब्लॉगरुपी     डायरी  नक्की  वाचत बसेन … जुन्या आठवणींच  उठलेलं मोहळ बघून त्यात दंग होईन आणि  त्या विचारात     रवंथ करताना स्वत:लाच  नक्की  सांगेन  ' मित्रा तू आयुष्य अगदीच  वाया नाही घालवलयसं  ' … बस इतकीच माझी माझ्या कडून अपेक्षा !   

कुणाला  माझे   ब्लॉग रुपी विचार वाचून घटकाभर सुख मिळत असेल तर त्यात मी नक्कीच आनंदी आहे . 


चला तर मंडळी महाराष्ट्र दिनाच्या   सर्वाना परत एकदा शुभेच्छा !