सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

जालिम तूने तो कमाल कर दिया

                                               जालिम तूने तो कमाल कर दिया




२९ डिसेंबर  १९९६ …  पुण्यातली एक रम्य संध्याकाळ … आणि त्यातही बहुधा रविवार . 
खर तर  गुलाबी थंडीतल्या अशा रम्य वेळी  ,  पुण्यात येऊन फारशी वर्षं   न लोटलेल्या माझ्यासारख्या होस्टेल वासियांचे थवे , डेक्कन किंवा कॅम्पवर प्रेक्षणीय स्थळं  शोधत रेंगाळत असतात … पण आज सकाळीच वर्तमानपत्रात वाचलेल्या त्या निवेदनाने  मला थेट गरवारे कॉलेजच्या  सभागृहात पोहोचवलंय . 

संध्याकाळचा सहाचा सुमार , गरवारेच प्रशस्त सभागृह , तरुणाईचा वावर तसा थोडा कमीच दिसतोय , …  , पण वातावरणात  एक मंद सुगंध दाटून राहिलाय , सगळ कस प्रसन्न वाटतंय , मधूनच  हास्याची कारंजी फुलताहेत , आज अनेक नव्या जुन्या साहित्यिकांची वर्दळ दिसतीये इथे … जणू काही मराठी सारस्वताचा दरबारच भरलाय . 

आणि त्याचवेळी ह्या दरबाराच्या खऱ्या मानकऱ्याचं , शहेनशहाचं  आगमन होतंय … आज हा बादशाह वयाच्या फक्त एकोणनव्वदाव्या  वर्षात पदार्पण करतोय . आणि पुढच्या दोन अडीच तासाच्या कार्यक्रमात हा शहेनशहा सभेला अक्षरश  झपाटून टाकतो . संपूच नये अस वाटत राहणारा का र्यक्रम अखेर संपतो पण त्याची  नशा , त्याची धुंदी चढते ती आयुष्यभरासाठी. 

होस्टेलवर परतल्यावर संमोहित अवस्थेतलं   माझ मन झरझर कागदावर उतरू लागतं . 

बहोत खूब ! वाह  क्या बात है ! इन्शाअल्ला ! जालीम तुने तो कमाल कर दिया ! जालीम तूने तो पीही नही !  अशा जबरदस्त  प्रतिक्रिया  श्रोत्यांमधूनउमटताहेत … प्रेक्षकांची , रसिकांची  समरसून दाद मिळते आहे  … एकंदरीत सगळा जल्लोष  चाललाय .  हे सगळ चालू असेल तर हा तर उर्दूमधला मुशायरा चाललाय हे सांगायला कुठल्याही काझी किंवा पंडिताला बोलवायची गरज नाही 
कारण उर्दू भाषा , शेरोशायरी , मुशायरा , इश्क ,मय , साकी , शमा- परवाना , गुल -गुलिस्ता , सैयाद  इ . इ . ही समीकरण  आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात   पिढ्यानपिढ्यापासून ठाण    मांडून बसली आहेत . 
आणि म्हणूनच ,  ' मराठी शायरी तुम्ही ऐकली आहे का ? '   अस विचारणं  म्हणजे  '  चितळे  बंधू मिठाईवाल्यांच्या दुकानात जाउन  ,  आज पापलेट कस किलो मिळेल आणि  असं  विचारण्यासारखच आहे असं काही लोकांच   नक्कीच मत पडेल 

असो , पण ज्याच्या नावातच   वा.  वा.  आहे असा एक जिंदादिल मराठमोळा शायर आपल्या  मायमराठीतही होऊन गेला . स्वतच्या विलक्षण शायरीनं  रसिकांना धुंद करणारा हा कलंदर म्हणजे  वा.  वा . उर्फ  भाऊसाहेब पाटणकर … मराठी साहित्य शारदेला पडलेलं  एक सुंदर स्वप्न . त्यांचा अल्पसा का होईना पण सहवास लाभला , हे माझ परमभाग्य . 

उर्दू  काव्यातला  ' कैफ '   मराठी भाषेत समर्थपणे आणणाऱ्या  भाऊसाहेबांना   ' उर्दू मुशायरा  ' आणि  ' मराठी कविसंमेलानामधला '  फरक ठळकपणे जाणवतो .  मुशायऱ्याचा विशेष म्हणजे  शायर आणि श्रोत्यांमधला सुसंवाद , श्रोत्यांची दिलखुलासपणे दाद देण्याची वृत्ती   आणि आपल्या कवीसंमेलनामध्ये  श्रोत्यांची    '  प्रतिसाद शून्यता '    बहुतेक श्रोते  चेहऱ्याची घडी न विस्कटता अस्फुट दाद देणारे . भाऊसाहेबांना  वक्ता आणि श्रोता ह्यामधला सुसंवाद हवाय 
त्यासाठीच  समोरचा रसिक कसा हवा हे सांगताना भाऊसाहेब म्हणतात 

 ' उन्मेष ज्यांच्या यौवनाचा कहीच  ना झाला कमी
प्यायले जे खूप , ज्यांना  वाटे,परी  झाली कमी
 निर्मिली मी फक्त माझी ,  त्यांच्याच साठी  शायरी
सांगतो इतरांस  ' बाबा,  वाचा सुखे ज्ञानेश्वरी ' 


भाऊसाहेबांना  असा जिंदादिल आणि चोखंदळ रसिक हवाय . ही शायरी ऐकून मैफिलीतल्या  एखाद्या रसिकाला प्रश्न पडतो की खुद्द भाऊ साहेबांच आताच वय हेच शायरी ऐवजी  ज्ञानेश्वरी
 वाचायचं  नाही का ? संभ्रमात पडलेल्या अशा रसिकाला उद्देशून भाऊसाहेब म्हणतात 

 ' शायरी ऐकून माझी , सांगेल जो आता पुरे 
तो रतीच्या चुंबनाही , सांगेल की आता पुरे 
तोंडही भगवन , अरे त्याचे मला दावू नको 
ना जरी मंजूर हेही , माझे तया  दावू नको '  

आणि आतापावेतो   ज्यांच्या  चेहऱ्यावरची  माशीही न हललेले  , खर तर तोंडाला टाडा लागलेले रसिकही हसून दाद देतात …. वाह , क्या बात है भाऊसाहेब . 
एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे , भाऊसाहेबांची  ही शायरी म्हणजे उर्दू शायरीचा अनुवाद किंवा भाषांतर आहे अस म्हणाल … तर तसं  मुळीच नाही . कारण तिची पाळमुळ  खोलवर ह्या मराठी मातीतच रुजलेली आहेत . आणि म्हणूंच ती उर्दूतली  ' नखरेल नार '  न ठरता , एका  ' ठसकेबाज मऱ्हाटमोळ्या लावणी '  सारखी  
उतरलीय . मजा म्हणजे ह्या शायरीचा फॉर्म्युलाच काही आगळा आहे … उर्दू संस्कृतीतील काव्याहून पूर्णपणे भिन्न .


आता हे दोन प्रकारचे प्रियकरच बघा ना ! 

उर्दूतला प्रियकर  बहुतेक वेळा  प्रेयसी जे करायला सांगेल ते करणारा , तिचा  ' most obedient servant  '  ( अत्यंत विनम्र  आणि लाचार  सेवक ) . तर भाऊ साहेबांचा शायर , हा मराठमोळा आणि रांगडा …  प्रेयसीच्या मागेपुढे लाळ घोटत   फिरणाऱ्या त्या लाचार उर्दू प्रियकरासारखा  तर तो अजिबात नाही .  इश्कातही स्वत:ची अस्मिता जपणारा हा शायर म्हणतो ,


 '  खेळलो इश्कात जैसे बेधुंद आम्ही खेळलो
   लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो

 अस्मिता  इश्कात साऱ्या , केव्हाच  नाही विसरलो
आली तशीही  वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो ' 


आता प्रेम म्हणजे त्यात त्यात रुसणं फुगणं   आणि रडारड आलीच . पण इथेही भाऊ साहेबांनी आपलं स्वत्व जपलय . 


 ' रडलो आम्ही इश्कात ,जेव्हा ,आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे इश्कास  ,  जेव्हा आम्ही रडावे वाटले

इश्कातल्या आसुवरी हा अधिकार ज्याला लाभला
नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे लाभला' 


श्रोत्यांमधला एखादा उतारवयाचा रसिक भाऊसाहेबाना  मनापासून दाद देतो . आयुष्यातली शास्त्रवचनं   पटण्यासाठी अनेक उन्हाळे- पावसाळे  जगावे लागतात हे खरय हे मलाही कदाचित पटत असतं . 

मैफिल पुढे सरकते परत एकदा ' इश्क '   ह्या विषयाकडे .… उर्दू शायरीतला मजनू हा अगदीच रडका . इश्कासाठी , प्रेमासाठी  आपलं  आयुष्य सुद्धा बर्बाद   करण्याची तयारी असलेला . भाऊसाहेबांचा मराठी शायर त्या   बिचाऱ्या  रडक्या मजनूची समजूत घालताना म्हणतो , '  अरे मजनू , ! प्रेमात एखाद्यासाठी पागल होण   एकदम मान्य . पण प्रेमातली ती 'लाचारी , ती अगतिकता आणि दीनदुबळेपणा  आपल्याला नाही पटत  '  . प्रेयसीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्या मजनूला तो म्हणतो 

' मजनू अरे थोडा, आम्हा का भेटला असतास तू
एकही आसू खरोखर, गाळला नसतास तू

अरे एक नाही लाख लैला, मिळविल्या असत्या आम्ही 

मिळविल्या नुसत्याच नसत्या, वाटल्या असत्या आम्ही '



' उजाडे चमन पर  हरे मन '   ह्या पठडी मध्ये   फिट्ट   बसणारा  एखादा श्रोत्यांमधला रंगेल म्हातारा आपला लुकलुकणारा एकमेव दात ओंठांवर  दाबत ओरडतो ' मुकर्रर इर्शाद '   आणि भाऊसाहेब सुद्धा हा ' वन्स मोअर '   तितक्याच सहजपणे झेलतात . 



  खरतर माणूस जन्मभर इतरांना फसवत असतो . पण मेल्यानंतरच काय ? पण इथेही भाऊसाहेबांच लॉजीक एकदम निराल आहे . ते म्हणतात मेल्यावरही आम्ही ह्या दुनियेला धोका दिला . 


' दोस्तहो , दुनियेस धोका , मेलो तरीही आम्ही दिला 
येऊनही नरकात पत्ता , कैलासाचा आम्ही दिला ' 

खरंच,    जीवनाकडे इतक्या त्रयस्थपणे पाहणाराच , इतक्या सोप्या भाषेत आयुष्याच तत्वज्ञान सांगू शकतो .

भाऊसाहेब म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व … बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर  ह्या बाण्याचे   आणि म्हणूनच  साक्षात स्वर्गाचा राजा देवेन्द्राला सुद्धा  खडसावायाला   ते मागे पुढे नाही बघत 

'स्वर्गातही जाऊन आता, काय मज मिळवायचे 
मिळविले  सारेच येथे,  स्वर्गात जे मिळवायचे 

इंद्रा अरे सांगू नको ,त्या मेनका अन उर्वशा 
कोणा हव्या विसळून तुमच्या , या चहाच्या कपबशा 

कल्पवृक्षाची तुझ्या या,ना  आम्हा मातब्बरी 
अमुच्या अरे कुंपणाची त्याहुनि मेंदी बरी 

त्यांनाच ने स्वर्गात , ज्यांनी त्रास येथे भोगला 
राहून नुसत्या संयमाने, वनवास येथे भोगला 


आम्हा कशाला स्वर्ग , आम्हा काहीच ना येथे कमी 
आहे जरा जास्तीच येथे , स्वर्गात जे आहे कमी '


 आयुष्याचा सारीपाट असा सहजपणे मांडणारे भाऊसाहेब , आता मात्र स्वत:च  ह्या मैफिलीचे रिमोट कंट्रोल  बनलेले असतात .  समोरच्या मैफिलीच्या चेहऱ्यावरचे  हावभाव , त्याचं हसणं … रडणं   , सगळ  काही भाऊसाहेबांच्या  मुठीत अल्लाद बंद झालेलं  असतं . 
भाऊसाहेबांची   शायरी म्हणजे निव्वळ कल्पनाविलास अथवा फॅन्टसी  नाही तर तिला चिंतनशीलतेची  जोड आहे हे एव्हाना रसिकांच्या  मनावर चांगलच ठसलेल असत   आणि तेसुद्धा ह्या मैफिलीचाच एक भाग बनून जातात . भाऊसाहेबांच्या बोलण्यातला जोश  आणि आत्मविश्वास   समोरच्या श्रोत्यांना  बाहेरच्या जगाचं  भान विसरायला लावण्यास समर्थ असतो . 


मृत्यूवरचं   त्याचं  भाष्यही असंच  मार्मिक . एकदा एक शायर मृत्यू पावतो .  . आपण    मेल्यानंतर आपल्या आप्तस्वकीयांच्या , जवळच्या लोकांच्या आपल्या बद्दलच्या भावना काय आहेत याची उत्कंठा लागलेला हा शायर , हळूच आपल्या चेहऱ्या वरचे  कफ़न दूर करतो … आणि पाहतो तर ,

'कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला


बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी'




मैफिल स्तब्ध …  काही डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या … क्वचितच एखादा  हुंदका .… 'संध्याछाया हृदयाला कदाचित भिववू'  लागलेल्या असाव्यात . इतरांच्या  चेहऱ्यावरच्या  रेषा  न रेषा ताणलेल्या . खरच  उस्फुर्तपणे   प्रतिक्रिया व्यक्त  करून चेहऱ्याची इस्त्री  विस्कटण्या मध्ये  किती मजा असते ह्याचा अनुभव  भाऊसाहेबांनी लूजर चा जमाना येण्यापूर्वी आपल्याला दिलाय . 

विनोद ते कारुण्य , जीवन ते मृत्यू  आणि शृंगारापासून   ते परमार्थापर्यंतचे  दुनियेतले तमाम विषय हातावेगळे करणारा हा असा अष्टपैलू आणि बहुरंगी माणूस … आणि तेही मायमराठीची  'My Marathi'  किंवा   'मऱ्हाटी ए  माय' होऊ न देणारा सापडण दुर्मिळच . असा माणूस जन्मण्यासाठी त्या भाषेच देखील भाग्य जन्माव लागतं . 


आपल्या अजर आणि अमर शायरीने मराठी साहित्यदरबाराचे सौंदर्य वाढविणाऱ्या ,  खुलविणाऱ्या भाऊसाहेबांच्या मराठी शायरीची,  तथाकथित तत्कालीन साहित्यिकांनी मात्र नेहमीच उपेक्षा केली . प्रसिद्धीची मेहेरनजर  त्यांच्यावर  खर तर म्हणवी तितकी  झालीच नाही .… किंबहुना फारच कमी झाली . पण ही    कदाचित ही खंतसुद्धा  शायरीत प्रकट होताना एखाद्या तत्व ज्ञानासारखी  भासते . 

' गालिब, अरे आमुच्याहि दारी , आहेच कीर्ति  यायची 
फक्त आहे दर थोडी , मरणास आमुच्या यायची 

येणार न आमुच्या पुढे ती , प्राण असती तोवरी 
 कीर्ति प्रिय माझी अरे , ही भलतीच आहे लाजरी'  



भाऊसाहेब स्वत : फौजदारी वकील … यवतमाळ सारख्या  थोड्याश्या आडगावातले ,  कामामुळे  स्वत उत्तम शिकारी आणि तेही जंगलात घुसून बेडरपणे वाघाची स्वत: शिकार करणारे . आमनेसामने आणि रोखठोक बोलण  ही त्यांची खासियत . म्हणूनच  भगवंताला सुद्धा सुनावताना ते म्हणतात 


'  आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही

तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला इथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो इथे 


नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही
भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही
शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन, ना अम्हा विसरेल ती'  

… बस्स !! खरचं  भाऊसाहेब  आज तुम्ही आम्हाला   जिंकलत , तुम्ही  जगायला शिकवलंत  … रडायलाही शिकवलंत  , जीवनाचा मनमुरादपणे आस्वाद घ्यायला शिकवलंत. 

'  सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कवींचा मान इतुकि पायरी माझी नव्हे


आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सम्मानितो
सम्मानितो हासू, तसे या आसवा सम्मानितो '  


असं शायरीतून तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या नम्रतेपुढे आम्ही  लोटांगण घालतो.  

ते तथाकथित  बुद्धीजीवी साहित्यिक भले तुम्हाला त्यांच्या पंक्तीत न बसवोत … पण भाऊसाहेब खर सांगतो माझ्यासारख्या सामान्य रसिकांच्या हृदयावर  तुम्ही शेकडो वर्षं राज्य करणार आहात … आज तुम्ही आमच्यात नसलात तरीही . 

पोटासाठी करत असलेला आमचा नोकरीधंदा आम्हाला निश्चित  जगवेल  ,   पण ही तुमची मराठी शेरोशायरी , आयुष्य कशासाठी जगायचं आणि कुणासाठी जगायचं हेच आम्हाला सांगत राहील . 

संदर्भ       -   ' जिंदादिल , दुनिया तुला विसरेल 



तळटीप-  सदर लेखक मराठी शेरोशायरी  ह्या विषयवार साधारणपणे ३० मिनिटांचा कार्यक्रम करू शकतो