बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

आयुष्याचा सांगाती , "राजा शिवछत्रपति"

                                                                      जर्मन डायरी 
श्रावण शुद्ध पंचमी शके १९३७
                                                                                                 १९ ऑगस्ट  २०१५


तशी  गोष्ट काही  फारा वर्षांपूर्वीची नाही . 
 
साधारणपणे सहावी सातवीत असताना दिवाळीला आम्ही काही   मित्र  मातीचे  किल्ले बांधत असू .  
हे बहुतेक सगळे किल्ले पुण्याजवळच्या मावळ मुलुखातले   असत . 

 मी स्वत: त्यावेळी,   एक म्हणजे   आमच्या  कोल्हापूर जवळचा पन्हाळा आणि सातारचा अजिंक्यतारा  हे गड सोडले तर बाकीचे किल्ले   कधीच   पाहिले  नव्हते …  पण किल्ले बांधण्याच्या उत्साहाच्या आड ही गोष्ट कधीच नाही आली .  कधी राजगड आणि पुरंदर तर त्याच्या पुढच्या वर्षी तोरणा आणि सिंहगड ,  असे प्रत्येक दिवाळीत,   एक से एक मातीचे किल्ले आम्ही उभे करत असू . 
 
पुण्यापासून दीड पावणेदोनशे मैलांवरच  माझ छोट   गाव …    आणि त्या काळात ट्रेकिंग किंवा दुर्गभ्रमंती असा प्रकार फारसा नव्हता .  त्यात  ह्याबाबतीत  मार्गदर्शन करायला तर कुणीच नव्हत .… महाराष्ट्र  कर्नाटक सीमेवरच गाव,   त्यामुळे मराठी आणि कानडी च्या मिश्रणातून तयार झालेली आणि  एक वेगळाच लहेजा असलेली , ग्रामीण बाज असलेली   भाषा मी बोलत असे  . मे महिन्याच्या  सुटीत  कोल्हापूर आणि अगदीच चुकून जर पुण्याला जाण्याचा योग आलाच तर तिथे  माझ्या बोलण्याची यथेच्छ   टिंगलटवाळी होत असे.  
 
टीव्ही हा प्रकार नुकताच गावात आला होता पण आमच्या घरी नव्हता आणि त्यामुळे गड किल्यांवरचे  कार्यक्रम असलेच तरीही  पाहण्याची सोय नव्हती . 
 
मुंबई वरून येणारा " दैनिक लोकसत्ता " गावात पोहोचायला संध्याकाळ व्हायची  आणि शाळेतून घरी आलो की  मी अधाश्यासारखा  त्याचा फडशा पाडत असे . एवढाच खर तर शहराचा संबंध .  . 
 
त्यात कधी कधी दुर्गभ्रमंती वरचे लेख असायचे  . "मिलिंद गुणाजी "  हाही त्याच काळात  नुकताच लिहिता झाला होता   आणि त्याचे  भ्रमंती वरचे लेख  " साप्ताहिक लोकप्रभात "  येत असत . पण त्यात अगदीच त्रोटक माहीती  असे . 
 
पेशाने शिक्षक असलेले  माझे वडील  दर   उन्हाळ्याच्या सुट्टीत   पुण्यात जात असत …पुणे  विद्यापीठात पेपर्स तपासण्यासाठी .  त्यांचा तिकडे महिनाभर मुक्काम असे.  ते परत गावाकडे कधी येताहेत याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत असे . कारण प्रत्येक वेळी परत येताना ते  माझ्यासाठी पुस्तक आणत  असत … घरी येउन त्यांनी बॅग उघडायच्या आधीच माझी झडप त्यावर पडलेली असे . 
 
अश्याच एका वर्षी , पुण्यातील आपा बळवंत चौकातल्या  "  राका बुक एजन्सीतून " आणलेल्या  एका जाडजूड पुस्तकाचं    खाकी रंगाच कव्हर मी उघडल . …    नेहमीच्या सवयीप्रमाणे  आधी त्या नवीन  पुस्तकाला   नाक लावून,    त्या नवीन पुस्तकाचा मस्त  वास घेतला  आणि एकाच  आठवड्यात ते  पुस्तक   वाचून  संपवलं सुद्धा … 
 
पुस्तक वाचून संपल असेल पण त्या पुस्तकाची नशा   अजूनही उतरली नाहीये  …आणि  कदाचित कधीच उतरणार नाही . कारण ते पुस्तक होत  , बाबासाहेब पुरंदरे लिखित ,  "राजा शिवछत्रपति ". 

 

 
 
  
 
मी आजतागायत  " भगवद्‍गीता " कधी  पूर्णपणे  वाचलेली नाहीये … कधी वाचेन की नाही , ते माहिती  नाही .   पण  खर सांगतो , जेव्हा जेव्हा  मन बेचैन  व्हायचं तेव्हा तेव्हा  राजा शिव छत्रपती  हे पुस्तक समोर धरून त्याची पारायण केली    ह्या पुस्तकानं   जगायला एक नवीन उमेद दिली  …  आयुष्याकड   बघण्याची वेगळी दृष्टी दिली …   आणि  कदाचित  "राजा शिवछत्रपती"   हे  पुस्तकच  आयुष्याची  " भगवद्‍गीता "  बनून गेल  .  ह्या पुस्तकातलं  प्रकरण नी प्रकरण …  खर तर ओळ आणि ओळ , अगणित  वेळा वाचली असावी … त्या अजाणत्या वयात  ह्या पुस्तकानं असं  झपाटून टाकल होत. 
 
 
रयतेच्या राजानं  ,  म्हणजेच शिवछत्रपतींनी  ,  गुलामीत खितपत पडलेल्या   महाराष्ट्राला  स्वाभिमान आणि अस्मितेचे कसे धडे दिले  हे ह्या  पुस्तकातूनच समजल  …   "अहत तंजावर ते तहत  पेशावर " आलम   हिंदुस्थानात , " मराठ्यांचा  झेंडा " फडकवण्याची  प्रेरणा देणाऱ्या  शिवरायांची थोरवी  समजण्याची ,  थोडीबहुत  पात्रता अथवा कुवत   माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या पुस्तकानच  दिली .  
 
 
राजा शिवछत्रपती ह्या पुस्तकान  ,  आयुष्यातलं  एक  नवीन दालनच  उघडलं  … शिवरायांच्या   पदस्पर्शाने  पुनीत झालेल्या सह्यगिरीतील   गडकिल्ल्यांना    भेटी देण्याच …
 
 
बारावी नंतर पुण्यात  सीओइपीत शिकायला आल्यावर  पुण्यात येण्याचा माझा खरा   मनसुबा माझ्या   घरच्यांच्या लक्षात आला  असावा … 
 
कारण पुण्यात आल्या नंतरच्या पहिल्या सात  वर्षातच  "तापी ते तिलारी " पट्ट्यातील   सह्याद्रीतील  दोनेकशे किल्ल्यांवर मुलूखगिरी करता आली  … पुण्याजवळच्या  कित्येक गडांवर  तर किती वेळा गेलो ह्याची कधीच मोजदाद नाही केली … सिंहगड, पन्हाळा  आणि राजगडावर   तर , कामानिमित्याने  सलग पंधरा पंधरा दिवस मुक्काम करण्याच  भाग्य लाभलं   …   शिवशंभूंच्या   जागरात  न्हाऊन निघालो … गडावरच्या गुहा , मंदीरं   , शिखरमाथा  आणि कडेकपाऱ्यात  जिवलग मित्रांबरोबर  फिरण्याची  खरी   प्रेरणा ह्या पुस्तकानचं   दिली .  
 
 
 
  स्वत:च्या  घरादाराचा विचार न करता  , आयुष्यातील  सत्तर वर्षं वर्ष   जो माणूस केवळ " शिवाजी "  ह्या तीन अक्षरांचा ध्यास घेऊन जगला  , अशा ह्या व्रती  योग्याला   वयाच्या   नव्वदीत  का होईना "  महाराष्ट्रभूषण "  हा पुरस्कार मिळतोय हेही नसे थोडके . त्याबद्दल   बाबासाहेबांच त्रिवार अभिनंदन .  "शिवराय"  हे वाचून नाही कळत … शिकवून सुद्धा समजणार नाही हा "जाणता राजा"  कसा होता ते … त्यासाठी  शिवशंभू  जगावे लागतात … आणि बाबासाहेब एक नाही दोन नाही तर तब्बल सत्तर वर्ष  श्वास घेताहेत तो शिवरायांचाच 

 
 
छत्रपती शिवरायांच  मन विशाल , मनाची भरारी दिगंतापर्यंत जाणारी   … अशा  युगपुरुषाच कार्य  तळागाळातील   सामन्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याच काम गेली सत्तर/ पंच्याहत्तर  वर्षे  बाबासाहेब करताहेत .  अशा माणसाला  , हा पुरस्कार मिळतोय ह्याचा अतिशय आनद आहे . 
 
बाबासाहेब , तुमचं   "राजा शिवछत्रपती"  हे पुस्तक जर आयुष्यात आल नसतं  , तर आयुष्य  कस असत ह्याची कल्पनाही करवत नाही . 
 आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो अशी त्या जगदिश्वरा चरणी प्रार्थना 
 


 बहुत काय लिहिणे ?


|| जय जय रघुवीर समर्थ || 
 
 
 
तळटीप  
 
१) गडकिल्ले  आणि दुर्गभ्रमंती ह्या क्षेत्रात   थोडेबहुत काम केल्यामुले  शिवशाहीर   महाराष्ट्रभूषण  बाबासाहेब पुरंदरे  ह्याना भेटायची संधी असंख्य  वेळा मिळाली .  स्वत:  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  व्यासपीठावर उपस्थित असताना  ,  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  करण्याची जबाबदारी मला दोन तीन   वेळा मिळाली ह्याबद्दल मी  रायरेश्वराचा  सदैव ऋणी राहीन . 


 
 
२) हा ब्लॉग  ,मी  माझे विचार  व्यक्त करण्यासाठी  करत असतो .   कुणाला काही शंका  , असतील तर त्याचे यथासांग  निरसन करण्यात येईल .   वादासाठी वाद  घालणाऱ्या  "   गेमाडे पंथीय "  प्रवृत्तींपासून   मी दहा हात दूर  असतो  .  अशा लोकांचे शंकानिरसन करण्यासाठी लागणारा वेळ , सहनशक्ती माझ्याकडे नसल्याने  कृपया त्यांनी आपला स्वत:चा आणि माझा अमूल्य वेळ दवडू नये अशी नम्र विनंती . 

धन्यवाद 

अजित रानडे 
 
 
 
 
 
 


९ टिप्पण्या:

  1. Ajit-nice thoughts penned down nicely...keep it up..also request u visit my blog at https://ppkya.wordpress.com

    उत्तर द्याहटवा
  2. Mojaka, marmik ani sachebaddha....farach chaan.
    V.K. Rajwade ani G.H.Khare hyanni kelelya kashtacha PRASAD lokanna watayacha kam Babasahebanchach.
    P.L.Deshpande hyanni eka bhashanat jyeshtha sangitik ani Deodhar music school che Prof. Deodhar hyanvishayi mhatala ahe ki Tansen ghadavata yet nahi to janmalach yava lagato.....pan Jansen ghadavanyach kam matra hyanni kela ahe.....
    Rich upama Babasahebanna pan lagu hot...tyanni gavogavi Shivani chya rajyat asel kahi mavale ghadavale ahet ki tyanna trivaar mujara kelyashivay rahavat nah

    उत्तर द्याहटवा