#HarmonicaofaWanderer #MajhiGermanDiary #charliechaplin
मागच्या आठवड्यातल्या गुरुवारची गोष्ट .
Block chain , Augmented reality , connected consumer आणि Digital Initiatives ह्या विषयांवर त्या स्विस कस्टमर टीमबरोबर दिवसभर काथ्याकूट करून झालाय ....
ह्या वर्षाच्या शेवटच्या quarter ची सेल्स प्रोजेक्शन्स आणि धंदा आणायचं आणि नंबर्सच टार्गेट complete करण्यासाठीचं प्रेशर आणि गेले तीन दिवस रात्रंदिवस चाललेलं काम ह्यामुळं डोक्याचा नुसता भुगा झालाय....
स्वतःची बायको , आपलाच कस्टमर आणि आपल्याच स्वतःच्या टीम मधले काम न करणारे लोक ह्यांच्याशी हुज्जत घालून , फायदा तर शून्य होतो आणि वर आपलंच ब्लड प्रेशर वाढतं हे , वयाच्या चाळीशीत का होईना , पण स्वतःला समजावत दिवसातली शेवटची कॉफी ढोसतोय . 🙂
आणि कॉफीचा शेवटचा सीप घेताना लक्षात येतंय की गेले तीन दिवस आपण जिनिव्हा लेकच्या ह्या अतिशय रमणीय आणि आप्लसच्या कुशीतल्या गावात रहातोय हे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत
पुढच्या पाच मिनिटात ऑफिसच्याच अवतारात तडक , फ्रांस बॉर्डर ला खेटून असलेल्या स्विझर्लंडच्या त्या छोट्या गावातल्या एका सुंदर गल्लीत येतोय ... तिथल्या रेस्टॉरंट मधल्या Happy hours च्या दिसणाऱ्या दोन तीन पाट्यांकडे थोडं दुर्लक्ष करत पुढं सरकतोय . थोडंसं उन्ह असूनही वातावरणात जाणवणारा गारवा , लाकडावरची अप्रतिम कलाकुसर असलेली लहानमोठी घरं, जवळच्याच चर्चच्या टॉवर क्लॉक मधून ऐकू येणारे संध्याकाळचे सहाचे ठोके , लेक जिनिव्हाचा अथांग पसरलेला तो जलाशय आणि त्याला खेटून असलेल्या आणि लांबचं लांब पसरलेल्या बीचवर पहुडलेली जोडपी आणि वाइन, आणि बीअरचे किणकिणणारे चषक हे सगळं पहात पुढे चालतोय
...
साधारणपणे दहा मिनिटं चालल्यावर एका ठिकाणी पावलं थबकताहेत ...त्या सुंदर तलावाच्या काठावर एक पुतळा दिसतोय ... गेल्या शतकात ...आणि खरं तर अजूनही , सर्व रसिकांच्या मनावर राज्य करणारा मूकपटांचा नायक , कॉमेडीकिंग चार्ली चॅप्लिनचाचाच तो पुतळा आहे हे ते तिथे लिहिलेलं असूनही , ते खरं आहे का हे कन्फर्म करण्यासाठी चार चार वेळा विकिपीडिया चा आधार घेतला जातोय . आणि नंतर लक्षात येत की जगावर राज्य केलेल्या आणि जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या ह्या महान कलाकाराला काही वादग्रस्त प्रकरणांमुळे हॉलिवूड आणि अमेरिकेचा निरोप घ्यायला लागला ...आणि आयुष्यातली शेवटची वीस वर्ष त्यानं ह्या आप्लसनं वेढलेल्या आणि जिनिव्हा लेकने कुशीत घेतलेल्या नितांतसुंदर स्विस खेड्यात काढली ... आणि ह्याच खेड्यात चीरविश्रांती घेत तो पहुडला आहे .
लहानपणापासून पारायणं केलेले त्याचे बरेच सिनेमे डोळ्यासमोर येऊ लागतात ... चार्ली चॅप्लिन आणि व्हर्जिनिया चेरील च ते रोमँटिक City Lights ह्या मूकपटामधलं थिम सॉंग आठवतं ..... आणि जळी स्थळी काष्ठी पाषाणी , गेली २० वर्ष माझ्यासोबत असलेला माझ्या माऊथ ऑर्गनवर , आपसूकच ही ट्यून वाजू लागते ... , आजूबाजूला असलेले लोक काय म्हणत असतील ह्याचा अजिबात विचार न करता ...
अजित रानडे
फ्रँकफर्ट जर्मनी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा