भिंतीवरच्या फोटोतल्या सुखद आठवणी
आज खरं तर कामात बिलकुल लक्ष लागत नव्हतं . MARKLUEGASTमधली कस्टमर मीटिंग संपवून KULMBACH च्या त्या निर्जन स्टेशनवर पोहोचलो . दुपारची साडेचारची वेळ असली तरी अंधारून यायला सुरुवात झाली होती आणि थंडी चांगलीच 'मी' म्हणत होती . टाइम टेबल पाहिलं तर FRANKFURT च्या ट्रेनला तब्बल तासाभराचा वेळ होता . स्टेशनच्या बाहेर आलो . आसपास पाहिलं तर जवळच्या एका बिस्तरॉमध्ये दोन चार म्हातारे हेलन फिशरच गाणं लावून बेसुरे गात होते ... मला बघून त्यांच्या हातातल्या बाटल्या उंचावत हॅलो असं ओरडले .जर्मनीमधल्या आणि त्यातही मध्य पूर्व जर्मनीच्या अशा खेड्यापाड्यात, गोरीकातडी नसलेला माणूस दिसला हे साले त्याच्याकडे तो चंद्रावरून आलाय की काय अशा नजरेनं बघतात . गेल्या पाच वर्षात अशा नजरांना मी चांगलाच सरावलोय . मीही त्यांच्याकडे काहीसं दुर्लक्ष करत शेजारच्या बेकरीत शिरलो . फेसबुक उघडून उजवीकडच्या today's birthdays कड नजर टाकली . .. तिचा बर्थडे दिसतो का ते पाहिलं ... पण तो नव्हता ... दिसण्याची शक्यताच नव्हती ...कारण फेसबुकवर ती कधी नव्हतीच . कदाचित तिला गरजही नसावी फेसबुकवर येण्याची . .. कारण फेसबुकवरच्या आभासी चेहऱ्यांच्या पलीकडचं जग कसं वाचायचं असत हे तिला चांगलाच अवगत होतं . ... इतक्यात बेकरीच्या त्या म्हाताऱ्या जर्मन मालकिणीनं एक छानसं स्मित करीत कॉफी आणि क्रोझा आणून ठेवलं .... ब्लॅक कॅफेचे दोन घोट गळ्याखाली रिचवले ... . आणि बाहेरच्या झोंबणाऱ्या थंडीत वाफाळणाऱ्या कॅफेचे घोट घेता घेता , परत परत तिचा चेहरा समोर येऊ लागला . ... आणि मन कैक वर्ष मागे जाऊ लागलं
''कोल्हापूर जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या , 'कापशी ' ह्या छोट्या खेड्यातल्या शाळेतल्या मुलांना शिकविण्यात तिने आयुष्यातली उणीपुरी तीस वर्ष काढली .
'कापशी' हे खर तर स्वराज्याच्या दौलतीचे , छत्रपतींचे सेनापती , संताजी घोरपडेंचं गाव ... त्यामुळं त्याला ' सेनापती कापशी ' असच नाव पडलं .
तिच्या घरासमोर गावातलं तळ , घोरपडे सरकारांचा भलामोठा वाडा आणि जवळच गावातलं मंदीर ...गावाच्या मावळतीला आणि दक्षिणेला लहानमोठे डोंगर ... अठरापगड जातीच्या ह्या गावात आपल्या मुलानं कुणाशी खेळावं आणि कुठे भटकावं ह्यासाठी तिन त्याला कधीच आडकाठी केली नाही . ..
गावातल्या गणेश मंदिरामागच्या शिंदेबाईच्या वर्गात न जाणाऱ्या स्वतःच्या मुलाला अधूनमधून फटके द्यायलासुद्धा कमी केलं नाही .
तळ्याजवळच्या चांभाराच्या मुलाला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे , स्वतःच्या मुलाबरोबर घरी जेवायला घातलं आणि त्याला शिकवलंसुद्धा ... खेड्यातले जुन्यापुराण्या प्रथांमध्ये गुरफटून गेलेले आजूबाजूचे त्यावेळचे ते लोक काय म्हणतील ह्याबद्दल काडीचाही विचार न करता . ..
गणित आणि विज्ञान हे तिचे आवडीचे विषय ... आणि वर्गातल्या टगेगिरी करणाऱ्या आणि 'ढ ' मुलांना ते कसे समजतील ह्याकडं तिचा अधिक कटाक्ष . आजच्या घडीला , 'आम्ही बाईंचा वर्ग कधी चुकवायचो नाही ' असं सांगणारे विद्यार्थी शेकड्याने भेटतील .
पुढे 'कापशी' सोडून 'निपाणीला 'आणि निवृत्तीनंतर कोल्हापूर असा आयुष्याचा प्रवास झाला तरी एक गोष्ट कायम राहिली ... ती म्हणजे रक्तात भिनलेली 'मास्तरकी ' ... सकाळपासून अखंड राबता असणाऱ्या कोल्हापूरच्या त्या घरात माणसांची 'आयुष्याची शिकवणी 'घेण्याचे मोफत क्लास दिवसरात्र सुरु असायचे .... सारे विद्यार्थी त्या अनुभवसागरात न्हाऊन निघायचे आणि परत परत यायचे .... जनसंपर्क तर अफाट .... स्टेशनवरच्या हमालापासून ते कोर्टाच्या न्यायाधीशापर्यंत ....
केवळ आर्थिक परिस्थितीमुळ , त्यावेळच्या इंटरसायन्सला उत्तम गुण मिळवूनसुद्धा , कुटुंबाची , खरतर लहान बहीण भावंडांची जबाबदारी असल्यामुळे , बी जे मेडिकलला जाऊन डॉक्टर नाही होता आलं आणि आयुष्य छोट्या गावात काढायला लागलं , ह्याची रुखरुख तिच्यापेक्षासुद्धा ... डॉक्टर होऊन देशात परदेशात खोऱ्याने पैसा ओढणाऱ्या तिच्या वर्गमैत्रिणींना जास्ती होती ''
.....
Sonst noch etwas? ( अजून काही हवय का ?) असं त्या बेकरीच्या मालकिणीनं दोनदा तरी विचारलं असेल ... भानावर आलो . आठवणींच्या घराचं दार बंद केलं .. जिच्याबद्दल इतका वेळ विचार करत होतो आणि जिचा आज वाढदिवस होता ती माझी आई , सहा महिन्यांपूर्वीच भिंतीवरच्या फोटोच्या फ्रेममध्ये जाऊन बसली होती .
बेकरीच्या बाहेर पडलो ... आणि स्टेशनकडे झपाझप चालू लागलो ... गडद अंधार पडला होता .... वारा सुद्धा भणाणत होता .... आणि पावसाचे हलके शिंतोडेही अंगावर पडले .. समोरच फ्रँकफर्ट ला जाणारी ट्रेन लागली होती त्यात चढलो .
आणि एप्रिलमधले ते सगळे दिवस परत आठवले . आई गेली त्या आसपास , एप्रिल २० १६ मध्ये , खरंतर मी जर्मनी आणि आसपासच्या काही देशात '' सैराट '' ह्या मराठी चित्रपटाचे शोज करण्याच्या पळापळीत होतो . ६ ते ७ ठिकाणी झालेल्या शोमध्ये थोडेसे पैसे मिळाले असतील . पण ठरवलं ,त्यात थोडी भर घालून आईच्या नावाने एक शिष्यवृत्ती सुरु करू ... ... . पहिल्या येणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी नाही तर ... 'आयुष्यात सैरभैर झालेल्या आणि सैराटपणे वागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी '... अशा विद्यार्थ्यांना त्याचा काही फायदा झाला तर नक्कीच चांगलं . जर्मनीत आल्यावर गेल्या चार पाच वर्षात काहीना काही कारणांमुळे मी आईला इकडे आणू शकलो नाही , ही सल आयुष्यात कायमच राहील.
तिच्याच गावाच्या शाळेत , तिच्याच नावाची अशी एखादी शिष्यवृत्ती ...तिला एक छोटीशी श्रद्धांजली ठरू शकेल का ? माहिती नाही ...
राम राम. छान व्यक्त केलंय,अजित.
उत्तर द्याहटवामुलांच्या शिक्षणासाठी तत्पर असणाऱ्या आईला अजून काय हवे. फारच स्तुत्य उपक्रम. ही एक फार मोठी आदरांजली आहे.
सेनापती कापशीचा उल्लेख वाचला आणि पाहिले आठवले ते चिंचेचे झाड (bus stop). सगळ्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचा, आणि अजूनही माझा आवडता निपाणी (माझे आजोळ) ते वडगांव via कापशी हा प्रवास मी इथे Stuttgart मध्ये बसूनच केला. फार सुंदर लेख.
धन्यवाद, असेच लिहीत रहा.
मयूर गुरव
राम राम. छान व्यक्त केलंय,अजित.
उत्तर द्याहटवामुलांच्या शिक्षणासाठी तत्पर असणाऱ्या आईला अजून काय हवे. फारच स्तुत्य उपक्रम. ही एक फार मोठी आदरांजली आहे.
सेनापती कापशीचा उल्लेख वाचला आणि पाहिले आठवले ते चिंचेचे झाड (bus stop). सगळ्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचा, आणि अजूनही माझा आवडता निपाणी (माझे आजोळ) ते वडगांव via कापशी हा प्रवास मी इथे Stuttgart मध्ये बसूनच केला. फार सुंदर लेख.
धन्यवाद, असेच लिहीत रहा.
मयूर गुरव