शनिवार, २५ जून, २०१६

ब्रेग्झिटचे जर्मनीतील पडसाद




 ′ जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहराच्या परिसरात ३०००० नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार...
  फ्रँकफर्टमधील जागेचे भाव गगनाला भिडणार...
  ‘ब्रेग्झिट’नंतर युरोपची आर्थिक राजधानी असं  बिरुद मिरविणाऱ्या लंडन कडून  ते स्थान फ्रँकफर्ट किंवा पॅरिस हिसकावून घेणार ..... ‘ब्रेग्झिट’वरचे निरनिराळे विनोद      .....

जर्मनीतील मराठी माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या  ′मराठी कट्टा जर्मनीच्या ′ व्हाटसअप   ग्रुपवर  २४ जूनच्या दुपारपासून अशा संदेशांची देवाणघेवाण  जोरात सुरू सुरू झाली .  खरं तर आपण , आपला  नोकरीधंदा  , आपलं कुटुंब , सुट्टीच्या काळात आलेले बऱ्याच जणांचे आईवडील आणि त्यांच्याबरोबर युरोपात फिरण्याचे प्लॅन्स , मुलांना असलेल्या  शाळांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातल्या आपापल्या गावी जाण्याची लगबग आणि त्याच नियोजन ह्यात गुंतलेल्या जर्मनीतील मराठीजनांना हे ‘ब्रेग्झिट’ प्रकरण काय आहे  हे जाणून घायची उत्सुकता प्रकर्षाने जाणवू लागली .

जर्मनीतील काही गावात नुकत्याच झालेल्या  ′ सैराट  चित्रपट प्रदर्शनाच्या ′ च्या आठवणी ताज्या असताना ,   ′ब्रेग्झिट हे काय ′ सैराट ′  प्रकरण आहे आणि त्याचा इथं जर्मनीत राहताना आपल्यावर काही परिणाम होणार का हे जाणून घ्यायला कदाचित सगळ्यांनाच बराच वेळ लागू शकेल.

लंडनची आर्थिक क्षेत्रात दादागिरी असल्यामुळे, लंडन मधून काम करणाऱ्या  बऱ्याच जर्मन बँका  आणि इतर गुंवणूकदार आर्थिक संस्था  आता  जर्मनीत येतील आणि ह्या क्षेत्रात अजून बऱ्याच संधी उपलब्ध होतील असं आर्थिक सल्ला देणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीधर धरणे ह्या मराठमोळ्या तज्ज्ञाच ठाम मत .  तर ′  सिवरीन लॅमोती ′  ही जर्मनीत काम करणारी फेंच युवती , हा  मान  पॅरिसला मिळणार  ह्याबाबत अतिशय आशावादी .   बर्लिन स्टार्टअप्स  मधल्या  ′  फ्लोरियान  नोल ′ ला     युरोपच स्टार्ट अप  केंद्र आता ′बर्लिनच ′   होणार ह्याबाबत कोणतीही शंका नसली , तरी  स्टार्ट अप्स , किंबहुना कोणताही व्यवसाय चालवताना फक्त आपल्या देशाचा विचार करून चालत नाही , तर संपूर्ण जगाची बाजारपेठ आपल्याला कशी उपलब्ध होईल आणि त्यासाठी जगभरात आर्थिक स्थैर्य असणं किती आवश्यक आहे ह्याची पुरेपूर जाणीव आहे .
पण ह्या झाल्या जर्मनीतील माझ्यासारख्याच नोकरी धंदा करणाऱ्या  सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया . पण त्यांना जर्मन माणसाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया असं लेबल लावणं धाडसाचं ठरेल.

सध्या युरोपात फ़ुटबॉलचा हंगाम आहे .  म्युनिकच्या आयरिश  केनेडीज  बार पासून ते  कुलम्बाख सारख्या छोट्या गावातल्या बिस्त्रो मध्ये रोज संध्याकाळी बीअरचे मग्ज  उंचावत  , मोठ्या स्क्रीनवर फ़ुटबॉल मॅचचा आनंद घेण्यात आणि सोबत हेलेन फिशर च्या गाण्यावर थिरकण्यात  तरुणाई धुंद आहे .  आबालवृद्ध आपापल्या घरी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फ़ुटबॉल मॅच सहसा चुकवत नाहीत . अशावेळी ब्रेग्झिटचे जर्मनीवरील  दूरगामी परिणाम आणि सध्याचे बदल ह्यावर बोलण्याचा मक्ता केवळ वृत्तपत्र , सोशल मीडिया , राजकारणी ह्यांनी घेतलाय का असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे . ब्रेग्झिट ही  दुसऱ्या महायुद्धानंतरची युरोपमधील सर्वात मोठी घटना  आहे का ह्यावर आता खरतर चर्वीचर्वण  सुरू होईल .

ब्रेग्झिट म्हणजे काय आणि युरोपिअन महासंघ  काय आहे ह्याबद्दल आतापर्यंत वर्तमानपत्रातून  बरंचसं  प्रबोधन झालं आहे . त्यामुळे ब्रेग्झिट आणि त्याचे जर्मनीवर होणारे संभाव्य परिणाम ह्याबद्दलच्या लोकांच्या काही प्रतिक्रिया आणि सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमुळे होणार विचारमंथन इतकाच ह्या लेखाचा आवाका आहे .

ब्रेग्झिटच्या जर्मनीमधील पडसाद समजून घेण्याआधी जर्मनी आणि ब्रिटन ह्यांच्या पूर्वापार संबंधांचा आढावा  घेणं उचित ठरेल . दोन्ही देशांचे संबंध तसे पूर्वापार पासूनचे आहेत . ब्रिटन आणि जर्मनीच्या शाही राजघराण्यात   एकमेकांशी सर्रास विवाह होत असत . ह्या सोयरिकी वेगवेगळ्या कारणांसाठी जोडल्या जात . इतकंच काय  तर ब्रिटनचं शाही राजघराण तब्बल १९१७ पर्यंत आपलं आडनाव Von Sachsen Coburg Gotha असं जर्मन पद्धतीनं  लावत असे . पहिल्या महायुद्धानंतर जनमताच्या रेट्यामुळे त्यांनी आपलं आडनाव बदलून विंडसर (Windsor) असं केलं . बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली जर्मनी एकसंध होण्याच्या आधीपासून  Hanseatic League ( हॅन्सीऍटीक लीग मुळे ) उत्तर जर्मनीतील क्युबेक , ब्रेमेन आणि हॅम्बुर्ग ह्या   शहरांशी ब्रिटनचा व्यापार होत होता . उदारमतवादाचा पुळका असणाऱ्या ब्रिटनने  , कार्ल मार्क्स आणि फ्रेड्रिश एंगल्स ह्या विचारवंतांना ब्रिटनमध्ये आश्रय दिला होता .

सागरावर हुकूमत गाजवणाऱ्या इंग्लिश आणि फ्रेंच सत्तांनी जगभर आपल्या वसाहती निर्माण केल्या . तर संशोधनाला वाहिलेल्या जर्मनीने , वेगवेगळी उत्पादन तयार करून संपूर्ण जगात आपला आर्थिक दबदबा निर्माण केला .दुसऱ्या  महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जर्मनीची आर्थिक आणि लष्करी कोंडी करण्यात ब्रिटन आघाडीवर होता . औद्योगिक दृष्ट्या समृद्ध अशा  रुहर ( RUAR)  सिलेनिया (Silenia) हे प्रांत ताब्यात घेण्यात  अनुक्रमे ब्रिटन आणि रशिया आघाडीवर होते . तर कोळशाने समृद्ध सारलँडचा  लचका फ्रान्सने तोडला.

दुसर्या महायुद्धाचा जर्मनीवर , इथल्या माणसाच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम झाला , एक संपूर्ण पिढी पराभूत मानसिकतेत जगली .. कदाचित पुढच्या एकदोन पिढ्यात सुद्धा ह्या गोष्टी संक्रमित झाल्या . पण प्रचंड चिकाटी , परिश्रम ह्या बळावर जर्मनीने जागतिक पातळीवरच आपलं स्थान अधिकच पक्क केलं.

 पहिल्या महायुद्धानंतर जेत्या राष्ट्रांनी , पराभूत राष्ट्रांवर घातलेल्या   जाचक अटीमधून  धडा घेऊन सर्वानी एकत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला . बाह्य सत्ताकेंद्रांना  ( अमेरिका आणि रशिया ) दूर ठेऊन  आपल्या भवितव्यासाठी एकत्र येणं ही
अपरिहार्य गरज बनली  आणि जागतिक शांततेचं लेबल लावत युरोपिअन युनियनचा जन्म झाला .

आज पश्चिम युरोपातील नागरिक संपन्न आयुष्य जगत आहेत . ब्रिटन हा जर्मनीचा  अमेरिका आणि फ्रान्स खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचा व्यापारातील
भागीदार आहे . दोन्ही देशांना एकमेकांना असलेली गरज अनेक गोष्टींमुळे अधोरेखित झाली आहे . जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अँगेला मर्केल  ह्यांना  ग्रीसचे संकट , युक्रेनवरील आपत्ती आणि स्थलांतरितांचा प्रश्न ह्यासाठी  ब्रिटनने साथ दिली आहे . अंतगर्त पक्षीय राजकारण आणि विविध विरोधी दबावगट ह्यामुळे
चिंतीत असलेल्या मर्केल ह्यांच्यासाठी ब्रेग्झिट ही अजूनही डोकेदुखी ठरू शकते . जगातील सर्वात जुनी लोकशाही असणारा एक साथीदार आपल्याला सोडून गेलाय हे सत्य पचवणं  युरोपिअन   महासंघातील देशांना  आणि विशेषतः जर्मनीला थोडं अवघड जाणार हे   निश्चित .
जर्मनीवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करणाऱ्या लहानमोठ्या युरोपीय राष्ट्रांना ,  फ्रान्स सारख्या शेजाऱ्याला  एकत्र पुढे घेऊन जाण्याची  आणि २७ युरोपीय राष्ट्रांची मोट टिकवून ठेवण्याचं  मोठी जबाबदारी जर्मनीवरचं आहे हे मात्र नक्की . अँगेला मर्केल त्या कशी निभावतात हे पाहावं लागेल .जगाच्या व्यापारातील एक चतुर्थांश वाट असणाऱ्या  युरोपिअन युनियनला जागतिक शांततेसाठी मोठं योगदान द्यावं लागणार हे दिसतच आहे . त्यासाठी एकमेकांमधल  संशयाचं धुकं दूर करून समस्यां हाताळण्याचा अनुभव असलेल्या जर्मनीला तारेवरची कसरत करावी
लागेल .  अभियांत्रिकी आणि उत्पादन , औषधनिर्माण  करणारे  पारंपरिक मध्यम /मोठे /कौटुंबिक उद्योग हा जर्मन अर्थव्यवस्थेचा कणा आहे . ब्रेग्झिटमुले त्याला हादरे बसले   तरी तो कोलमडणार नाही हे निश्चित .

ब्रेग्झिटमुळे  लोकांच्या  नोकऱ्या जाणार  की अजून नोकरीच्या  संधी वाढणार?  युरोपातून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेले लोक परत चरितार्थाच्या शोधात जर्मनी आणि फ्रान्स मध्ये येणार का ?  २७ राष्ट्रांची त युती अभेद्य राहणार की महासंघ दुभंगणार ? इथल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर ह्याचा काय परिणाम होणार ?  व्हिसा ची परिस्थिती काय असेल ? ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या ८०० हून जास्ती भारतीय कंपन्यांची पुढी वाटचाल कशी असेल ?  असे  अनेक प्रश्न समोर येत आहेत . त्याची उत्तर शोधण्यासाठी बराच काळ जावा लागेल .


ह्या सगळ्याचा विचार करत असताना , एकदम एक जुनी गोष्ट आठवली . २०१२ साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे त्यावेळचे गव्हर्नर  डी . सुब्बाराव ह्यांना जर्मनीत भेटण्याचा योग्य आला होता . एका युरोपियन पत्रकाराने सुब्बाराव ह्यांना एक खोचक प्रश्न विचारला . तो असा ′ भारतात ५० वर्षांपेक्षा सुद्धा जास्ती काळ लोकशाही  नांदत आहे . तरी तुमच्या देशातील दारिद्र्य , बेकारी  ह्या गोष्टी पहिल्या तर तुमचा भविष्यकाळअतिशय अवघड दिसतो ′.  
सुब्बाराव ह्यांच्यासारख्या अतिशय ज्ञानी आणि चतुरस्त्र  विद्वान माणसानं  त्या पत्रकाराला विचारलं ,  आपल्या युरोपियन युनियनमध्ये २८ देश आहेत तर आमच्या भारतात ३६ ( राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ) ,  युरोपिअन युनियनचा विचार करता भारत हासुद्धा खंडप्राय देश आहे , आमची लोकसंख्या दुप्पट आहे आणि कदाचित समस्या चौपट , काश्मीरच्या माणसाला तामिळनाडूची भाषा समजत नाही .   पण आमच्या देशाची  अजून ३६  शकलं  होऊन युरोपियन युनियनप्रमाणे ३६ देश नाही झाले . आम्ही एकसंध आहोत .  Gentleman I am worried about your future than mine . मला तुमची जास्त काळजी आहे .
सुब्बाराव ह्यांचं ते उत्तर ऐकून कार्यक्रम संपल्यानंतर सर्वात जास्ती कॉलर ताठ झालेला माणूस मीच होतो .

अजित रानडे
फ्रँकफर्ट  जर्मनी
ajit.ranade.1@gmail.com





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा