बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

रणधुरंधर श्रीमंत बाजीराव पेशवे आणि ' बाजीराव मस्तानी चित्रपट'


                                 


रणधुरंधर  श्रीमंत बाजीराव पेशवे  ह्यांना सादर  प्रणाम !

श्रीमंत ,

पत्रास सुरुवात करण्यापूर्वीच श्रीमंतांची माफी मागतो . महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेऊन ,  मराठ्यांच्या समशेरीचा  वचक , आलम हिंदुस्तानात  बसविणाऱ्या  आपल्यासारख्या अजेय आणि पराक्रमी   योद्ध्याच्या  नजरला नजर भिडवावी इतकी आमची पात्रता न्हाई   … तरीबी पत्र लिवायचं  धाडस करतोय … त्यामुळं  काही चूका  झाल्या तर आम्हाला लेकरावाणी पोटाशी धरा   .

 आमच नाव तात्या डोंगळे .  महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात  आमचं लहाणपण गेलं  आणि आम्ही म्हराटी सातवी पर्यंत शिक्षण कर्नाटकातच घेतलं… तिथ इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही आम्हाला कधीच  नाही भेटलात श्रीमंत  …अगदी ओझरता उल्लेख व्हता  पण ज्यादा न्हाई   . खर सांगायचं  म्हंजी     आम्हाला इतिहासात मराठ्यांच्या इतिहासापेक्षा  टिपू सुलतान , हैदरअली ,   वीर राणी चन्नमा , दुसरा पुलकेशी  ह्यांचा इतिहास शिकाय  मिळाला .   पण  आम्हाला आमच्या आईच्या भाषेची आणी मराठ्यांच्या इतिहासाची आवड  अगदी पहिल्यापासून . त्यामुळं   आम्ही पुस्तक वाचीत व्हतो .

रियासतकार सरदेसाई , वि . का . राजवाडे पासून  ते  पानिपतकार विश्वासराव पाटील ह्यांची झाडून समदी पुस्तकं वाचून काढली . जसा   जमलं तसा  मराठ्यांच्या  इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न  केला .  मोडी लिपी शिकलो थोडीबहुत .  

 साधारण  २० ते  २२ वर्षांपूर्वी आम्ही पुण्यनगरीत शिकाय आलो तवा  शनिवारवाड्यावर आपला घोड्यावर बसलेला पुतळा पाहिला ( पुण्यात त्याला अश्वारूढ पुतळा म्हणत्यात )   आणि आमच्या धमन्यातल रक्त उसळ्या मारू लागलं .  पुण्यातल्या त्यावेळच्या वातावरणानं     आणि आम्हाला भेटलेल्या  चांगल्या मित्र मंडळींमुळे  आम्ही  किल्ल्यांसाठी वेडे झालो .  मराठ्यांच्या इतिहासाच्या आवडीपोटी  आमीबी चांगले दोनेशे ते सव्वादोनशे  वेगवेगळे किल्ले पालथे घातले . थोरल्या महाराजांनंतर ,  आमचं  दूसर प्रेम कोणावर  असेल तर  ते म्हणजे तुम्हीच .  मध्य प्रदेशातल्या आपल्या रावेरखेडीच्या   समाधीवर बी आम्ही दोन वेळा डोक ठीऊन आलो .

सध्या गेल्या चार वर्षांपासून  आम्ही इथ युरोपात जर्मनीमदी राहतो … पण श्रीमंत   तुम्हास्नी एक गोष्ट सांगावी म्हणतो  , आपल्याला वळीखणारे  आणि आपल्या लढायांचा अभ्यास करणारे लोक  इथबी  हायेत . फ्रांस मधल्या   स्ट्रासबोर्ग नावाच्या शहरात  पौल मॉजे   ह्या आमच्या मित्राला तुम्ही पालखेडची    लढाई  कशी लढलात हे माहिती आहे . त्यांच्या लष्करी शाळेत  बाजीराव पेशवा कोण हे शिकवत्यात  .  इथं आमचा एक तुर्की मित्र आहे आणि त्याला  अफगाणी अहम्दशहा  अब्दालीची  आणि  इराणच्या नादीरशहाची माहिती आहे  तशी  आपलीसुद्धा माहिती  आहे . हे लोक इतिहास तज्ज्ञ आहेत असं आम्हाला  न्हाई  म्हणायचं . पण  तीनशे वर्षांपूर्वी   मराठ्यांच्या  समशेरीचा दरारा कुठपर्यंत पोचला होता हे आमच्या मित्रांकडून ऐकून आमचा ऊर अभिमानाने भरून  येतो .   माफी असावी श्रीमंत , पन  येवढ पाल्हाळ लावायचं कारण येकच आणी त्ये म्हंजे तुमी आमच पत्र शेवटपत्तूर   वाचाल .

  पत्र लिवायचं खर कारण आता सांगत हाये .   सध्या आपल्या महाराष्ट्रामधी तुमच्या आणि मस्तानीबाई साहेबांच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने  चांगलाच धुरळा उठलेला हाये .  जो उठेल तो आपलं  मत देतोय … सोशल मिडीयावर नुसती राळ उडवून दिलेली हाये समद्यांनी . आणि श्रीमंत , मजा म्हंजे कुठलाबी राजकीय पक्ष पक्ष ह्यमदी  सामील न्हाई . आम्ही लय विचार केला ह्यावर  . आणि लक्षात आलं  की कदाचित तुमच्या नावाचा त्यांना मतासाठी आणि निवडणुकीसाठी काही फायदा न्हाई . असो सांगायचा मुद्दा असा की सगळीजण  आपलीच घोडी दामटवत   सूटल्येत  ,  पण एका मोठ्या माणसाला,   ज्यानं   मराठ्यांची  भीमथडीची  तट्ट  यमुनापार केली  त्याना , म्हणजे आपल्याला ....साक्षात श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे ह्यांना कोणीच काही विचारात न्हाई … आणि म्हणूनच हा पत्रप्रपंच .

आता थोडक्यात मुद्दा सांगतो श्रीमंत. 

१. आपल्या बॉलीवूड मध्ये एक दिग्दर्शक हाये …  प्रेमकथेवर  भव्यदिव्य  चित्रपट तयार करणं ही त्याची खासियत . त्याच नाव संजय लीला वाटलावली    न्हाई  भन्साळी   . तर श्रीमंत , त्यानं    साक्षात तुमच्यावर आणि मस्तानी बाईसाहेबांवर एक चित्रपट बनवलेला हाये … फक्त २०० कोटी टाकून … एकदम कोरा करकरीत .. जबरदस्त युद्धप्रसंग आणी प्रचंड शेट ( सेट) … सगळ कस एकदम भव्य . … आता ह्यावर आमच  कायबी  म्हणण   न्हाई  . एक मराठी  नसलेला माणूस मराठ्यांच्या / पेशव्यांच्या इतिहासावारती चित्रपट बनवतोय आणी त्यो चित्रपट जगभर बघितला जाणार ह्याचा आम्हाला अतीव आनंद आहे .

२. ह्या चित्रपटात रणवीर सिंह नावाचा एक चांगला आणी थोडा गमत्या  अभिनेता तुमची भूमिका करणार हाये . तुमच्यापेक्षा त्याची उंची थोडी कमी आहे पण काही हरकत नाही ( तशी आमचीबी उंची कमीच हाये )

३. दीपिका आणी प्रियांका म्हणून दोन शिडशिडीत नट्या हायेत त्या अनुक्रमे मस्तानीबाई साहेब आणि   काशीबाई राणीसाहेब ह्यांच्या भूमिका करणार हायेत. इथबी काही हरकत नाही . आम्हाला दोघीबी  आवडतात… अभिनेत्री म्हणून

आमची खरी  हरकत पुढे आहे

१. काशीबाई  राणीसाहेब  आणि मस्तानीबाई साहेब  ह्याना ह्या चित्रपटात एकत्र नाचताना दाखिवलंय , जे  इतिहासात घडणे शक्य नव्हते , खर म्हणजे घडलच नाही .
त्यातून ह्या दोन स्त्रिया  बेंबाटताना  दाखविल्या आहेत ( बेंबी दाखवत नाचणे ) . मराठेशाही आणी पेशवाईतील कुलीन स्त्रियांच्या पेहरावा बद्दल मी आपल्याला काय सांगणार  श्रीमंत ?   पिंग्याच्या नावाने लावणी सारखा नृत्यप्रकार दाखवून  दिग्दर्शकाला आपला गल्ला वाढवायचा आहे हे उघड आहे . आम्हास्नी बी लावणी जाम आवडते … पण पिंगा म्हंजी लावणी न्हाई ना ?  असो , दीपिका आणी प्रियांका  ह्या सुंदर अभिनेत्री आहेत , आम्हाला त्याचं सर्व नृत्यप्रकार आवडतील  , पण त्या चटकचांदण्यांना मराठ्यांच्या   इतिहासाशी काय देणघेण , पैसे आणि चांगली भूमिका मिळाली की संपलं   …  दिग्दर्शकाच्या तालावर  नाचणाऱ्या  कळसूत्री बाहुल्या   .

पण येक महत्वाची गोष्ट आहे  ,  संजय लीला भन्साळी   हा माणूस आपले म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे नाव वापरून चित्रपट बनवतोय … तेबी कुणाला  कुठलीही रॉयलटी  न देता  … आणी तेबी इतिहासाचे लचक तोडून .   ' श्रीमंत '   , इतिहासाचा काथ्याकूट मी करत बसत नाही … आपणापेक्षा   सत्य  अधिक कोण जाणणार? 

२. अर्ध्या पेक्षा अधिक हिंदुस्तान आपला ताब्यात घेणारं   बाजीराव पेशवे  जेव्हा  चित्रपटात  ' वाट लावली … वाट लावली'  किंवा ' चटक मटक   चटक मटक '  अस  म्हणतात तेव्हा चांगलच  खटकत आम्हाला  ते  श्रीमंत  …  बाजीराव पेशवा म्हणजे कोणी टपोरीगिरी करणारा दाक्षिणात्य भडक चित्रपटातला हिरो नाही . त्यांच्या तोंडचं  शब्द गीतकाराने निवडताना काळजी घेतली पाहिजे .

३. हे ह्या चित्रपटाचे फक्त प्रोमोज आहेत … खरया चित्रपटात अजून काय वाट लावली आहे हे फक्त भन्साळी लाच माहिती असेल  आणि ते १८ डिसेंबर ला कळेल ,

असो , आपण सत्य जाणताच … मी काय सांगणार आपल्याला ?
आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही …आम्हीबी कलाकार हाये .  येखादा चित्रपट करताना कलात्मक मुभा ( म्हराटीत त्याला आम्ही  शीनेमाटीक लिबर्टी  म्हणतो ) घेण  नवीन न्हाई  पण इतिहासाची तोड फोड करून नाही एवढंच आमचं म्हणण आहे .

विरोधासाठी विरोध करणारे विरोधक आम्ही न्हाई . ह्या चित्रपटाला आमच्या शुभेच्छा हायेत  हे नक्की पण चूका दुरुस्त  केल्यावर .हा चित्रपट ४०० काय ५०० कोटी कमवूदे आम्हाला आनंद  हाये . आमच्या मराठी साम्राज्याचा डंका परत एकदा जगभर वाजेल .पण  आहे त्या घोडचूका तशाच ठेऊन हा जर चित्रपट प्रसिद्ध झालाच  तर चुकीचा इतिहास इतिहास लोकांसमोर येईल .

असो , जाऊदे  ज्यादा इच्चार करून डोस्क्याची  मंडई  न्हाई करणार आता .  श्रीमंत खर सांगतो आम्हाला  आता ह्याची आता भीती वाटेनाशी झालीये … कारण असे भन्साळीचे किंवा अजून  कोणाचे छप्पन्न  चित्रपट येतील

पण आमच्या  मनातील श्रीमंत बाजीराव   एकच असतील , ते म्हणजे   मोंगल , निजाम , पोर्तुगीज ,  सिद्दी अशा सर्व  शत्रूंना  पुरून उरणारे आणि  मराठ्यांचा जरीपटका  आलम  हिंदुस्थानवर फडकवणारे  रणधुरंधर  श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे 

बहुत काय लिहिणे ?


आपला नम्र 

तात्या डोंगळे 
मु. पो. जर्मनी 
 ॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान