शनिवार, २ मे, २०१५

ब्लॉगारंभ - महाराष्ट्र दिन , १ मे २०१५ आणि मी

                                                                                                   


कालच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिल २०१५ ला    ' हिटलरनं  ' आत्महत्या केल्याला   बरोब्बर  ७० वर्षं पूर्ण   झाली ...   आणि त्याच्याच  किंवा खर तर मला आवडणारया ' बिस्मार्कच्या  ' ह्या  जर्मनीत    मला येऊन  तब्बल ४४ महिने . 


सध्या   इथं   एका फ्रेंच कंपनीत जर्मन लोकांबरोबर  इंग्रजी भाषेचा  टेकू घेऊन    जर्मनी  आणि  आसपासच्या    काही देशात फिरण्याच काम  करतो ,विक्री प्रतिनिधी म्हणून .

जर्मन भाषा किती समजते हा  जरी संशोधनाचा  विषय असला तरी ,  समोरचा माणूस ' जर्मन मध्ये   बोलतोय की  इटालियन  अथवा फ्रेंचमध्ये ' हे मी नक्की सांगू शकतो . 


युरोपात    तीन चार हिवाळे काढल्यानंतरही   मनातल्या संवेदना अजून नक्कीच  गोठलेल्या नाहीयेत …

आयुष्य थोडं बदललं  असलं तरी , डोक्याची मंडई करणाऱ्या  समोरच्या माणसाला हासडली   जाणारी शिवी ' अस्सल मराठीच असते ' 

दरम्यानच्या काळात   जसं  इथल्या   ' ऱ्हाईनच्या ' पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलय   … तसं    तिकडही मुळा -मुठेच्या  आणि  आमच्या कोल्हापूर -निपाणीच्या  पंचगंगा आणि वेदगंगेच्या    सुद्धा  . … 

बऱ्या…. च  गोष्टी बदलल्या .…   

'' भूकंप झाले , खून पडले …  डॉलर - युरो वर- खाली होत राहिले 
 तेलाच्या किमती  चढल्या  -उतरल्या …  विमान पाडली गेली 
 जातीपातीच्या,  दहशतवादाच्या राजकारणानं   अख्खं जग ढवळून निघालं 

गाजरं  दाखवली गेली  , टोप्या घातल्या , फिरवल्या , निष्ठा    बदलल्या 
देशोदेशीची सरकारं   बदलली  , इतिहासाच्या खुणा  मिटवायचा प्रयत्न झाला 
वर्तमानाच्या कानशिलाला बंदूक लावून भविष्य घडवायचा प्रयत्न चालू झाला 

' कुठल्यातरी भाषेच्या आक्रमणामुळे दुसऱ्या कुठल्यातरी भाषेची ' मुस्कटदाबी झाली 
सांकृतिक दहशतवादाच्या भस्मासुराने  इथे युरोपात  Charlie Hebdo  ला संपवायचा  प्रयत्न केला 
आणि कदाचित तिकडे   कॉम्रेड  पानसरे आणि  नरेंद्र दाभोळकरांचा धगधगता अंगार   विझवला 


तिकडे 'भूमी अधिग्रहणाचे  आणि इकडे ' समलिंगी  संबंधांचे समर्थक-विरोधक एकमेकांना   भिडले  
' लव जिहाद ' आणि ' घर वापसी' वर चर्चासत्र झडली , ' निर्भयां वरचे बलात्कार चालूच  राहिले  

पत्रिकेतल्या 'मंगळाशी' जमो वा ना जमो पण खऱ्या मंगळावर 'प्लॉटस कधी पडणार' ह्याचे विचार सुरु झाले  
इकडे आम्सटरडॅम,पॅरिसच्या चकचकीत  आलिशान  पब्समध्ये  मद्याचे चषक रिते होत राहिले  
आणि तिकडे  मलबार हिल वरच्या  धनदांडग्यांच्या  टॉवरचे  इमले एकावर एक चढतच  राहिले  

'' पण खपाटीला गेलेल्या  पोटाच्या त्या खेड्यातील शेतकऱ्यानं आपलं स्वत:च इमान विकल नाही 
नसेल  जरी घरात खायला दाणा तेव्हा सरळ मृत्यूला कवटाळलं पण दुसऱ्याच घर  कधी फोडलं नाही ''




बस्स   मित्रानो , 


सांगायसारखं   असं खूप घडतय  आजूबाजूला आणि  मनात सुद्धा …  
आज  विचार केला की कधी वेळ मिळेल तेव्हा जमेल तसं  लिहाव …  म्हणून हा ब्लॉग प्रपंच . 




मी कोणी सिद्धहस्त लेखक  नाही  … तसच  अशुद्धलेखन आणि ऱ्हस्व- -दीर्घाची  ओढाताण हा प्रकार सुद्धा बऱ्याच वेळा होईल ह्याची खात्री आहे . ( किंबहुना  तिकडे बघायला  वेळसुद्धा नाही अजिबात  ) . 


खर तर    गेलं वर्षभर   ठरवतोय आज ब्लॉग लिहू उद्या लिहू , पण  काय करणार न्युटनचा पहिला नियम  आड येतो '' Law of inertia ''    .  जडत्वाचा किंवा खर  तर आळसाचा  नियम  म्हणायला हव  …  आणि न्यूटन  महाशयांनी   तो नियम माझ्याकडे बघूनच जगासमोर मांडला आहे अशी माझी खात्री  आहे  . असो , ह्या अवस्थेतून बाहेर काढण्याच  आणि धक्कास्टार्ट  करण्याच  काम माझ्या काही जवळच्या मित्र मंडळीनी केलय त्याना खूप धन्यवाद.  

 खर तर   मी भारतात असतांना  सह्याद्रीतील  जे दोनेकशे डोंगर -किल्ले पालथे घातले त्याबद्दलच लिहावं  असा विचार मनात डोकावत होता  होता . ' साहस पर्यटन'  ह्याच  क्षेत्रात बराच  काळ काम केल्यामुळे 'हिमालयातील बऱ्यापैकी केलेल्या   भटकंतीचे अनुभव शब्दबद्ध करावेत असंही   वाटत होत .  पण नंतर लक्षात आलं  की  ह्याच  विषयाला वाहिलेले  आणि अप्रतिम फोटोनी  सजलेले  सुंदर सुंदर ब्लॉग्स  माझे बरेच नवीन  मित्रमैत्रिणी  लिहिताहेत . आणि ते वाचायला मला जास्ती आवडतात . 

 मग ठरवलं की जेव्हा जे काही मनात येईल ते लिहायचं  . नवं - जुनं , क्वचित पूर्वी पेपरमध्ये किंवा कुठल्याश्या मासिकात  छापून  आलेलं …  आणि   बऱ्याच वेळा मीच माझ्या   फेसबुकवर पूर्वी  खरडलेलं  लिखाणसुद्धा ह्या ब्लॉगवर  टाकायचा नक्कीच प्रयत्न करायचा    . … 

जगातल्या बऱ्याच  सुंदर  किंबहुना  चांगल्या- वाईट   गोष्टीत आणि वेगवेगळ्या   क्षेत्रांत    थोडी  जास्तीच  रुची  असल्यामुळे … रोज नवे अनुभव येतात  आणि जाणीवा कल्पनेपलीकडे  समृद्ध होत असतात . उचंबळून येणाऱ्या   ह्या विचारांना मूर्त स्वरूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न.  

स्वत:ला   व्यक्त  करण  आणि इतरांनी  ते वाचावं   अशी  अपेक्षा असण्यात काहीच वावग नाही . माझीही माझ्या  मित्र मंडळींकडून तशी  अपेक्षा नक्की आहे , हे न संकोचता सांगतो .  मित्र मंडळींच्या ' लाईक्स'ना  किंवा  त्यांनी केलेल्या स्तुतीला उत्तर देताना माझा आळस  आड येतो  , तेव्हा कृपया  माझ्या प्रतिसादाची  अपेक्षा बाळगू नका  अशी नम्र विनंती  … ( कृपया राग , गैरसमज नसावा ) .   एखाद्या लेखावरून कुणी वादाचे विषय उकरून काढत असेल तर त्याचा प्रतिवाद करायला लागणारी सहनशक्ती , वेळ आणि इच्छा  कदाचित  माझ्याकडे नसेल   . ( त्यामुळे वादाच्या विषयात फारसं  न पाडण्याकडे माझा कल  राहील हे नक्की  ) 

 खरं   सांगायचं तर , ब्लॉग लिहिण्याचा  माझा उद्देश   थोडा वेगळाच   आहे .…   अजून २५ -३० वर्षांनी,  कदाचित मी जेव्हा आतासारखा भटकू शकणार नाही , तेव्हा सह्याद्रीतील किंवा हिमालयातील  कुठच्यातरी  डोंगरातल्या किंवा शेतातल्या  माझ्या छोट्याश्या घराच्या  बाल्कनीत   , आरामखुर्चीवर  सुखावताना ही माझी ब्लॉगरुपी     डायरी  नक्की  वाचत बसेन … जुन्या आठवणींच  उठलेलं मोहळ बघून त्यात दंग होईन आणि  त्या विचारात     रवंथ करताना स्वत:लाच  नक्की  सांगेन  ' मित्रा तू आयुष्य अगदीच  वाया नाही घालवलयसं  ' … बस इतकीच माझी माझ्या कडून अपेक्षा !   

कुणाला  माझे   ब्लॉग रुपी विचार वाचून घटकाभर सुख मिळत असेल तर त्यात मी नक्कीच आनंदी आहे . 


चला तर मंडळी महाराष्ट्र दिनाच्या   सर्वाना परत एकदा शुभेच्छा !


६ टिप्पण्या:

  1. तुझे लिखाण कौशल्य अफलातून आहे.
    अनुभवांची , विचारांची तुलनात्मक मांडणी अभ्यासू असल्याचे चटकन लक्षात येते !
    वाचायला मज्जा आली !
    पुढील सवडीअंती लिखाणासाठी शुभेच्छा !

    उत्तर द्याहटवा
  2. तुझा मराठी ब्लॉग पाहून मला खूप आनंद झाला , तुझे सह्याद्री चे ट्रेक ची वर्णन चेहरा पुस्तकावर वाचून मी काही वर्षापूर्वी तुला ब्लॉग लिहिण्यास सांगितले होते . तुझे मराठी ब्लॉगर च्या समूहात स्वागत आहे , चेहरा पुस्तकावर आपली मराठी ब्लॉगर चा समूह आहे त्यात तू सामील व्हावे असे मला वाटते , तुझा ब्लॉग अनेक मराठी ब्लॉगर समूहात सामील अरुण घे म्हणजे जगभरातील मराठी वाचकांना तुझे विचार अनुभव वाचता येतील.
    पुलेशु
    पुढील लेखनास शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. तू या पूर्वी ब्लॉग लिहित नव्हतास हे आत्ता तुझा ब्लॉग वाचून समजलं. तू फेसबुक वर जेवढ्या सहजतेने सविस्तर लिखाण करतोस त्यावरून तू पूर्वी पासून ब्लॉग लिहितोस असं मी गृहीत धरून चाललो होतो.

    हरकत नाही ... मला स्वत: ला पण न्यूटन चा नियम लागू होतो, आणि मी पण बरीच वर्ष हे ब्लॉगकर्म करावं कि नाही याचा विचार करण्यातच वाया घालवली आहेत. त्यामुळे तुला झालेला विलंब मी समजू शकतो. इथून पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा ...

    उत्तर द्याहटवा
  4. वा अजित. तू आधीपासूनच चांगलं लिहितोस. आता या निमित्तानं तुझं सगळं लिखाण एकाच ठिकाणी पाहायला आणि वाचायला मिळेल. याच्या आधी वेगवेगळ्या निमित्तानं फेसबुकवर लिहिलेले छोटे लेखही इथे टाकायला हरकत नाही. विशेषतः तुझे जर्मनीतले अनुभव वाचायला जास्त आवडेल. तसंच, तुझे ट्रेकिंगमधले काही वेगळे अनुभवही. आमच्याकडे काही लिहायला नसलं, की आम्ही आधीच छापून आलेले किंवा सध्या छापले जात असलेले लेख ब्लागवर टाकतो. तुझ्या बाबतीत तसं होणार नाही. तू ब्लागसाठी वेगळं, स्वतंत्र लिहिशील आणि ते नक्कीच मनापासून असेल. वाचायला मजा येईल. वाट बघतोय.!!

    उत्तर द्याहटवा
  5. अज्या ! एव्हढ़ मराठी बऱ्याच दिवसानी वाचलं
    लिहित रहा
    मी नक्की वाचेन
    माझ्या शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा