बुधवार, ६ मे, २०१५

थेट भेट - डॉ. मोहन आगाशे’



 21st to 26th July 2014

स्थळ - फ्रँकफर्ट ट्रेन स्टेशन , संध्याकाळचा सहाचा सुमार 




Bitte zurücktreten, Zug fährt auf Gleis dreizehn (बिट झुरूक त्रेक्तन , झुग फार्त औफ ग्लाइस ड्रायझेन ) अशी अतिशय स्पष्ट आणि तितक्याच खणखणीत आवाजात उद्घोषणा होतीय … जर्मन भाषेची जाण नसणारे आणि थोडेसे गोंधळलेले काही प्रवासी ' भिवई वरती करून आणि कपाळाला आठ्या घालत ' इंग्रजीत सुद्धा ही उद्घोषणा होतीय का ह्याची वाट पाहताहेत … धीर नसलेल्या काही प्रवाशांची ह्याचा अर्थ काय हे इतरांना विचारण्यासाठी केविलवाणी धडपड चाललीय .

तसंही गर्दीने गजबजलेल्या ह्या स्टेशन वर ही वेळ म्हणजे नक्कीच धावपळीची . ऑफिसेस मधून सुटलेल्या सुटाबुटां तल्या चाकरमान्यांची घरी जायची आणि बाहेरगावहून इथे आलेल्या प्रवाशांची हॉटेलवर जाण्याची लगबग … बाहेरून इथे येणाऱ्या आणि ह्या स्टेशन वरून युरोपातील मोठ्या शहरांसाठी सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या येण्या जाण्यातून निर्माण होणार एक ' एक आगळं वेगळं  ' संगीत इथे कानावर पडतं …इतक्या गर्दीत सुद्धा 'कबुतरं' काहीतरी टिपताना दिसताहेत आणि काही तुरळक भिकारी आपलं काम निष्ठेने करताहेत . इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या ' नाईट लाईफ ' साठी आसुसलेले काही बुभुक्षित निशाचर  गल्लीबोळातल्या काही 'खास' जागांचा शोध घेण्यात मग्न आहेत . ही गर्दी मला मात्र अजिबात नवीन नाहीये .

साव्व्वासाहाच्या सुमारास, डोक्यावरची उजवीकडे झुकणारी ती खास ' नेपाळी गुरखा टोपी' किंचित डावीकडे करत सत्तरीचा एक तरुण येताना दिसला . त्याच्या चालण्याच्या रुबाबावरून ह्या गर्दीत तो नवखा आहे अस अजिबात वाटल नाही . जवळ येत त्याने माझे सहकारी श्री रवी देशपांडे आणि सलील प्रधान ह्यांच्याशी हस्तांदोलन केल आणि जणू काही मला बर्याच वर्षांपासून ओळखत असावेत अश्या पद्धतीने माझ्या पाठीवर हलकीशी थाप मारून स्वत:ची ओळख करून दिली ‘ डॉ. मोहन आगाशे’.

पुढे स्टेशन जवळच्याच एका विश्रांती गृहात ' फ्रेंच वाईन ' आणि ' जर्मन रॅड्लर ' च्या संगतीत गप्पागोष्टींना चांगलाच बहर आला आणि पुढच्या तास -दीड तासात माझ्या ' अनुभव पुस्तकात ' अजून काही चाप्टर आड (add ) झाले हे सांगणे न लगे. १९७९ -८० पासून नित्य नियमाने जर्मनीत किंबहुना युरोपात येणाऱ्या डॉक्टरांशी ' घाशीराम कोतवाल ' ते 'काटकोन त्रिकोण ' आणि ' दु अँड मी ( Du And Me) ' पर्यंतच्या गप्पा झाल्या .

पुढे त्याच आठवड्यात शनिवारी २६ जुलै ला त्यांच्या ' अस्तु -सो बी इट ' ह्या चित्रपटाचा शो ' private screening ' आम्ही काही मित्र मंडळीनी आयोजित केला होता . महाराष्ट्रात प्रदर्शित व्हायच्या आधीच हा चित्रपट बघायला मिळतोय आणि तोही मोहन आगाशे ह्यांच्या उपस्थितीत ह्याचं आम्हा प्रत्येकाला कुतुहूल मिश्रित कौतुक होत .

नुकताच 'स्टूटगार्ट जर्मनी' इथल्या आन्तरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट जर्मन लोकांना प्रचंड आवडला आणि त्याच महाराष्ट्राबाहेर प्रचंड कौतुक होतंय . येत्या १ ऑगष्ट ला तो पुण्यात प्रदर्शित होतोय त्यामुळे ह्या चित्रपटाबद्दल फारस काही लिहित नाही . ध्यानातून मिळणार्या आनंदाची केवळ अनुभूतीच घ्यावी लागते .चौपाटीवरच ' चाट ' आणि आमच्या कोल्हापूरच्या' मिसळी वरची तर्री ' ह्य्याची चव समजावून सांगता नाही येत , ती प्रत्यक्ष चाखायला लागते . तसच काहीस इथेही आहे

तद्दन गल्लाभरू ' लय भारी ' चित्रपटांची ' कीक  ' आपल्या सर्वाना बसल्यामुळे ही  ' Highly proteinecious dish of entertainment (सकस , पोष्टिक आणि दर्जेदार मनोरंजनाची डीश ) ' आपण कशी पचवतो हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भौतिक प्रगतीमुळे सध्या माणसाच सरासरी आयुर्मान वाढलंय आणि त्याचबरोबर अनेक समस्याही . (Dementia) विस्मरणासारखा असाध्य रोग जडल्यावर एका विद्वान प्राध्यापाकाची होणारी अवस्था , त्याच्या कुटुंबाची आणि आप्तस्वकीयांची होणारी फरफट आणि त्यातील नातेसंघर्ष ह्याच अतिशय प्रभावी चित्र इथे आहे .

एखादा चित्रपट प्रत्येकालाच आवडेल अस नाही . पण तुम्ही माझ्या खरडलेल्या ह्या चार(?) ओळी जर कदाचित इथपर्यंत वाचायचं धाडस करत असालच तर तुम्हाला आग्रहाची विनंती की हा चित्रपट पहाच . डॉक्टरांच्याच भाषेत सांगायचं तर , चित्रपट पाहून झाल्यावर जर तो तुमच्या प्रश्नांची उत्तर न देता जर प्रश्न निर्माण करत असेल तर तर तो नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक चित्रपट अस म्हणायला हरकत नाही. विस्मरणाचा आजार झालेले ह्यातले ' प्राध्यापक चक्रपाणी शास्त्री ' आपल्याला आपल्या आसपास पण दिसतील …कदाचित आपल्या कुटुंबात सुद्धा . आपण त्यांना कसे स्वीकारतो आणि ' समाज मनाची ' acceptance level (जसच्या तस स्वीकारण्याची वृत्ती ) कशी आहे आहे ह्याचा उहापोह करणारा हा चित्रपट आपल्याला नक्कीच काही शिकवून जाईल .

ह्यातील इतर लोकांबद्दल बोलायचं म्हंटल तर , इरावती हर्षेनी तिच्या भूमिकेच सोन केलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही . १९९५ च्या आसपास पुण्यातील पुरुषोत्तम करंडकातील ' पार्टनर्स ' ह्या नाटकामधून प्रेक्षकाना रडायला लावणारी गुणी अभिनेत्री अमृता सुभाष ने आपली छोटीशीच भूमिका समरसून केलीय . दिग्दर्शक ' सुमित्रा भावे ' आणि ' सुनील सुकथनकर ' ह्याना पैकीच्या पैकी मार्क्स .

इंग्रजी सब टायटल्स असणार्या ह्या चित्रपटा च्या शोला काही जर्मन मंडळीसुद्धा उपस्थित होती आणि चित्रपट संपल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकत असताना लक्षात आल , की अश्या कलाकृतीना भाषेची बंधन नसतात . स्वत: डॉक्टरांनी चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांना केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक डॉक्टर म्हणूनसुद्धा मनमोकळेपणे उत्तर दिली त्यामुळ ह्या कार्यक्रमाची खुमारी अजूनच वाढली .

डॉ. आगाशेनी ह्यातील केवळ मुख्य भूमिका केलीय अस नाही तर ते स्वत: ह्या चित्रपटाचे निर्मातेही आहेत . अश्या वेगळ्या विषयावरचा चित्रपट काढण्याच धाडस करत असताना ‘चित्रपट निर्मितीच्या आर्थिक प्रसव कळा ’ त्यांच्याहून अधिक कुणाला ठाऊक असणार? अशा चित्रपटाला राज्य पुरस्कार मिळतात , वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात तो गौरविला जाऊ शकतो हे खरय पण काहीवेळा चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करण्यात सुद्धा असे चित्रपट कमी पडू शकतात हे वास्तव आहे. वयाच्या सत्तरीत सुद्धा देशोदेशीच्या प्रेक्षकांसमोर ह्या चित्रपटातील संदेश पोहोचविण्याच्या त्यांच्या तळमळीला आणि धडपडीला सलाम !

' अस्तु ' हा खरोखर एक हृद्य अनुभव आहे . कार्यक्रम संपल्यावर मनात एक विचार येऊन गेला , ' इतक्या सुंदर मराठी कलाकृती आणि चित्रपट केवळ मराठीच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांसमोर पोचले पाहिजेत आणि ह्या प्रयत्नातला खारीचा वाटा आपण उचलायला काय हरकत आहे ?

धन्यवाद
अजित नारायण रानडे
Marathi Katta Frankfurt Germany

Private screening of Marathi Film ASTU in frankfurt Germany


( ता. क . -  हा लेख मी जेव्हा खरडला , तेव्हा मी ' लय भारी '  हा चित्रपट पहिला नव्हता . नुकताच तो पहिला , आणि या मताला पोहोचलो की मराठी भाषेला आणि चित्रपट रसिकांना ' अशा '   चित्रपटांची सुद्धा तितकीच गरज आहे . अजय -अतुल   आणि ' माऊली माऊली  '  निव्वळ लाजवाब ) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा