मंगळवार, ५ मे, २०१५

माझ्या शाळेचा वाढदिवस




                                                                                                                   

                                                                                                           
                                                                                                             माईन नदीचा किनारा 
                                                                                                             १५ सप्टेंबर २०१३

रविवारचा दिवस ..सकाळीच घराजवळच्या  नदीच्या किनाऱ्यावर एक चक्कर मारायला बाहेर पडलो .....नदीवरून येणारी गार वारयाची झुळूक हिवाळा जवळ आलाय ह्याची सारखी जाणीव करून देत होती ..आभाळ भरून आल होत ...आणि मनात सुद्धा आठवणींचे मळभ दाटून यायला सुरुवात झाली... आणि बघता बघता मी शाळेच्या आठवणीत हरवून गेलो ..खरतर तर त्याला एक कारणही होत ...कोल्हापूर जिल्ह्याच्या  एका टोकाला असलेल्या एका छोट्या खेड्यातली आणि निसर्गसुंदर परिसरात वसलेली माझी छोटी शाळा आज मोठी झाली होती .स्थापनेची पन्नास वर्षं पूर्ण करत होती . आणि ठरवलं की आज मी शाळेला भेट देऊ शकत नसलो तरी , पत्र लिहायला काय हरकत आहे?


माननीय मुख्याध्यापक
एम डी विद्यालय , अर्जुन नगर ,
जिल्हा ,कोल्हापूर

नमस्कार  सर  ! मी अजित रानडे , आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी ! शाळेच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर .

साल १९८६ ...पावसाळा संपत आलेला ... अपघातामुळे पहिले तीन महिने मी शाळेला जाऊ शकलो नव्हतो.... शाळेचा पहिलाच दिवस ... वर्गात प्रवेश केल्यावर लक्षात आल ..की तो ऑफ पिरेड होता ... " व्हनुंगरे " सर सर्वाना अतिशय सुंदर सुरात एक कविता शिकवीत होते ...खर तर गात गात शिकवत होते

" गे मायभू तुझे मी
फेडीन पांग सारे
आणीन आरतीला
हे सूर्य चंद्र तारे "

बहुधा त्यावर्षीच्या पाठ्यक्रमात सुद्धा ती कविता नसावी ...पण ज्या तल्लीनतेने सर ती कविता शिकवत होते त्यामुळे पहिल्याच दिवसापासून ह्या शाळेशी एक वेगळंच नात तयार झाल

इथल्या सर्व गुरुजनांनी अपार आणि निर्व्याज प्रेम दिल .... NDS सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत खेळलेले सर्व खेळ , MNK, VK आणि  वाळवे मॅडम    ह्यांच्याबरोबर स्नेहसंमेलनात  मध्ये केलेली धमाल ,  APK,MD Patil आणि PK जोशी सरांकडून गणित आणि भूमिती शिकताना खाल्लेले प्रेमाचे फटके ... शनिवारी शाळा सुटल्यावर मित्रांबरोबर केलेल्या उचापती,सायकल वरून रामलिंग आणि आणि अडी-मलय च्या डोंगरात काढलेल्या नेहमीच्या मोहिमा आणि त्यातूनच आयुष्य भर त्यांच्या बरोबर जोडली गेलेली एक मित्रत्वाची नाळ.

इतिहासाच्या सरांमुळे वाढलेली त्या विषयातली आणि विशेषत: युरोप च्या इतिहासाबद्दलची रुची ..माझ्या शिक्षकांनी पॅरिस  तर जाऊच  दे पण पुण्या - मुंबईला सुद्धा किती वेळा भेट दिली असेल कोण जाणे ? पण माझिनी आणि इटली , फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यावेळच पॅरिस , व्हर्सायचा राजवाडा , मेरी अन्तोनेत आणि तिचे विलासी राहणीमान ,युरोपातील महायुद्धं ह्याबद्दल आमच्या इतिहासाचा वर्ग संपल्यावर सुद्धा तासन तास गप्पा होत असत ...  युरोपात राहत असल्यामुळे आणि फिरतीचीच नोकरी असल्यामुळे  आज   जेव्हा जेव्हा मी ह्याठिकाणी भेट देतो तेव्हा तुमची आठवण नक्की होते सर !

.. १९८६ ते १९८९ ही तीन वर्षे आयुष्यातली सर्वात सुंदर आणि रम्य अशी वर्ष होती .

त्यातून जी गोड आठवणींची पुंजी मिळाली ती आयुष्यभर टिकून राहील ... विशेषत: कामानिमित्य गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर राहत असताना ह्या सगळ्या आठवणी मनात रुंजी घालत असतात . शाळेत मिळालेले साधेपणाचे संस्कार पाय जमिनीवर ठेवण्यासाठी नेहमीच मदत करतात .

५० वर्षे हा एक खूप मोठ्ठा टप्पा आहे आणि ह्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची .. ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायची खूप इच्छा होती सर पण दुर्देवान शक्य नाही . ह्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व आजी , माजी विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक आणि गुरुजनांना खूप खूप शुभेच्छा .


आपला नम्र
अजित नारायण रानडे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा