बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

रणधुरंधर श्रीमंत बाजीराव पेशवे आणि ' बाजीराव मस्तानी चित्रपट'


                                 


रणधुरंधर  श्रीमंत बाजीराव पेशवे  ह्यांना सादर  प्रणाम !

श्रीमंत ,

पत्रास सुरुवात करण्यापूर्वीच श्रीमंतांची माफी मागतो . महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेऊन ,  मराठ्यांच्या समशेरीचा  वचक , आलम हिंदुस्तानात  बसविणाऱ्या  आपल्यासारख्या अजेय आणि पराक्रमी   योद्ध्याच्या  नजरला नजर भिडवावी इतकी आमची पात्रता न्हाई   … तरीबी पत्र लिवायचं  धाडस करतोय … त्यामुळं  काही चूका  झाल्या तर आम्हाला लेकरावाणी पोटाशी धरा   .

 आमच नाव तात्या डोंगळे .  महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात  आमचं लहाणपण गेलं  आणि आम्ही म्हराटी सातवी पर्यंत शिक्षण कर्नाटकातच घेतलं… तिथ इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही आम्हाला कधीच  नाही भेटलात श्रीमंत  …अगदी ओझरता उल्लेख व्हता  पण ज्यादा न्हाई   . खर सांगायचं  म्हंजी     आम्हाला इतिहासात मराठ्यांच्या इतिहासापेक्षा  टिपू सुलतान , हैदरअली ,   वीर राणी चन्नमा , दुसरा पुलकेशी  ह्यांचा इतिहास शिकाय  मिळाला .   पण  आम्हाला आमच्या आईच्या भाषेची आणी मराठ्यांच्या इतिहासाची आवड  अगदी पहिल्यापासून . त्यामुळं   आम्ही पुस्तक वाचीत व्हतो .

रियासतकार सरदेसाई , वि . का . राजवाडे पासून  ते  पानिपतकार विश्वासराव पाटील ह्यांची झाडून समदी पुस्तकं वाचून काढली . जसा   जमलं तसा  मराठ्यांच्या  इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न  केला .  मोडी लिपी शिकलो थोडीबहुत .  

 साधारण  २० ते  २२ वर्षांपूर्वी आम्ही पुण्यनगरीत शिकाय आलो तवा  शनिवारवाड्यावर आपला घोड्यावर बसलेला पुतळा पाहिला ( पुण्यात त्याला अश्वारूढ पुतळा म्हणत्यात )   आणि आमच्या धमन्यातल रक्त उसळ्या मारू लागलं .  पुण्यातल्या त्यावेळच्या वातावरणानं     आणि आम्हाला भेटलेल्या  चांगल्या मित्र मंडळींमुळे  आम्ही  किल्ल्यांसाठी वेडे झालो .  मराठ्यांच्या इतिहासाच्या आवडीपोटी  आमीबी चांगले दोनेशे ते सव्वादोनशे  वेगवेगळे किल्ले पालथे घातले . थोरल्या महाराजांनंतर ,  आमचं  दूसर प्रेम कोणावर  असेल तर  ते म्हणजे तुम्हीच .  मध्य प्रदेशातल्या आपल्या रावेरखेडीच्या   समाधीवर बी आम्ही दोन वेळा डोक ठीऊन आलो .

सध्या गेल्या चार वर्षांपासून  आम्ही इथ युरोपात जर्मनीमदी राहतो … पण श्रीमंत   तुम्हास्नी एक गोष्ट सांगावी म्हणतो  , आपल्याला वळीखणारे  आणि आपल्या लढायांचा अभ्यास करणारे लोक  इथबी  हायेत . फ्रांस मधल्या   स्ट्रासबोर्ग नावाच्या शहरात  पौल मॉजे   ह्या आमच्या मित्राला तुम्ही पालखेडची    लढाई  कशी लढलात हे माहिती आहे . त्यांच्या लष्करी शाळेत  बाजीराव पेशवा कोण हे शिकवत्यात  .  इथं आमचा एक तुर्की मित्र आहे आणि त्याला  अफगाणी अहम्दशहा  अब्दालीची  आणि  इराणच्या नादीरशहाची माहिती आहे  तशी  आपलीसुद्धा माहिती  आहे . हे लोक इतिहास तज्ज्ञ आहेत असं आम्हाला  न्हाई  म्हणायचं . पण  तीनशे वर्षांपूर्वी   मराठ्यांच्या  समशेरीचा दरारा कुठपर्यंत पोचला होता हे आमच्या मित्रांकडून ऐकून आमचा ऊर अभिमानाने भरून  येतो .   माफी असावी श्रीमंत , पन  येवढ पाल्हाळ लावायचं कारण येकच आणी त्ये म्हंजे तुमी आमच पत्र शेवटपत्तूर   वाचाल .

  पत्र लिवायचं खर कारण आता सांगत हाये .   सध्या आपल्या महाराष्ट्रामधी तुमच्या आणि मस्तानीबाई साहेबांच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने  चांगलाच धुरळा उठलेला हाये .  जो उठेल तो आपलं  मत देतोय … सोशल मिडीयावर नुसती राळ उडवून दिलेली हाये समद्यांनी . आणि श्रीमंत , मजा म्हंजे कुठलाबी राजकीय पक्ष पक्ष ह्यमदी  सामील न्हाई . आम्ही लय विचार केला ह्यावर  . आणि लक्षात आलं  की कदाचित तुमच्या नावाचा त्यांना मतासाठी आणि निवडणुकीसाठी काही फायदा न्हाई . असो सांगायचा मुद्दा असा की सगळीजण  आपलीच घोडी दामटवत   सूटल्येत  ,  पण एका मोठ्या माणसाला,   ज्यानं   मराठ्यांची  भीमथडीची  तट्ट  यमुनापार केली  त्याना , म्हणजे आपल्याला ....साक्षात श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे ह्यांना कोणीच काही विचारात न्हाई … आणि म्हणूनच हा पत्रप्रपंच .

आता थोडक्यात मुद्दा सांगतो श्रीमंत. 

१. आपल्या बॉलीवूड मध्ये एक दिग्दर्शक हाये …  प्रेमकथेवर  भव्यदिव्य  चित्रपट तयार करणं ही त्याची खासियत . त्याच नाव संजय लीला वाटलावली    न्हाई  भन्साळी   . तर श्रीमंत , त्यानं    साक्षात तुमच्यावर आणि मस्तानी बाईसाहेबांवर एक चित्रपट बनवलेला हाये … फक्त २०० कोटी टाकून … एकदम कोरा करकरीत .. जबरदस्त युद्धप्रसंग आणी प्रचंड शेट ( सेट) … सगळ कस एकदम भव्य . … आता ह्यावर आमच  कायबी  म्हणण   न्हाई  . एक मराठी  नसलेला माणूस मराठ्यांच्या / पेशव्यांच्या इतिहासावारती चित्रपट बनवतोय आणी त्यो चित्रपट जगभर बघितला जाणार ह्याचा आम्हाला अतीव आनंद आहे .

२. ह्या चित्रपटात रणवीर सिंह नावाचा एक चांगला आणी थोडा गमत्या  अभिनेता तुमची भूमिका करणार हाये . तुमच्यापेक्षा त्याची उंची थोडी कमी आहे पण काही हरकत नाही ( तशी आमचीबी उंची कमीच हाये )

३. दीपिका आणी प्रियांका म्हणून दोन शिडशिडीत नट्या हायेत त्या अनुक्रमे मस्तानीबाई साहेब आणि   काशीबाई राणीसाहेब ह्यांच्या भूमिका करणार हायेत. इथबी काही हरकत नाही . आम्हाला दोघीबी  आवडतात… अभिनेत्री म्हणून

आमची खरी  हरकत पुढे आहे

१. काशीबाई  राणीसाहेब  आणि मस्तानीबाई साहेब  ह्याना ह्या चित्रपटात एकत्र नाचताना दाखिवलंय , जे  इतिहासात घडणे शक्य नव्हते , खर म्हणजे घडलच नाही .
त्यातून ह्या दोन स्त्रिया  बेंबाटताना  दाखविल्या आहेत ( बेंबी दाखवत नाचणे ) . मराठेशाही आणी पेशवाईतील कुलीन स्त्रियांच्या पेहरावा बद्दल मी आपल्याला काय सांगणार  श्रीमंत ?   पिंग्याच्या नावाने लावणी सारखा नृत्यप्रकार दाखवून  दिग्दर्शकाला आपला गल्ला वाढवायचा आहे हे उघड आहे . आम्हास्नी बी लावणी जाम आवडते … पण पिंगा म्हंजी लावणी न्हाई ना ?  असो , दीपिका आणी प्रियांका  ह्या सुंदर अभिनेत्री आहेत , आम्हाला त्याचं सर्व नृत्यप्रकार आवडतील  , पण त्या चटकचांदण्यांना मराठ्यांच्या   इतिहासाशी काय देणघेण , पैसे आणि चांगली भूमिका मिळाली की संपलं   …  दिग्दर्शकाच्या तालावर  नाचणाऱ्या  कळसूत्री बाहुल्या   .

पण येक महत्वाची गोष्ट आहे  ,  संजय लीला भन्साळी   हा माणूस आपले म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे नाव वापरून चित्रपट बनवतोय … तेबी कुणाला  कुठलीही रॉयलटी  न देता  … आणी तेबी इतिहासाचे लचक तोडून .   ' श्रीमंत '   , इतिहासाचा काथ्याकूट मी करत बसत नाही … आपणापेक्षा   सत्य  अधिक कोण जाणणार? 

२. अर्ध्या पेक्षा अधिक हिंदुस्तान आपला ताब्यात घेणारं   बाजीराव पेशवे  जेव्हा  चित्रपटात  ' वाट लावली … वाट लावली'  किंवा ' चटक मटक   चटक मटक '  अस  म्हणतात तेव्हा चांगलच  खटकत आम्हाला  ते  श्रीमंत  …  बाजीराव पेशवा म्हणजे कोणी टपोरीगिरी करणारा दाक्षिणात्य भडक चित्रपटातला हिरो नाही . त्यांच्या तोंडचं  शब्द गीतकाराने निवडताना काळजी घेतली पाहिजे .

३. हे ह्या चित्रपटाचे फक्त प्रोमोज आहेत … खरया चित्रपटात अजून काय वाट लावली आहे हे फक्त भन्साळी लाच माहिती असेल  आणि ते १८ डिसेंबर ला कळेल ,

असो , आपण सत्य जाणताच … मी काय सांगणार आपल्याला ?
आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही …आम्हीबी कलाकार हाये .  येखादा चित्रपट करताना कलात्मक मुभा ( म्हराटीत त्याला आम्ही  शीनेमाटीक लिबर्टी  म्हणतो ) घेण  नवीन न्हाई  पण इतिहासाची तोड फोड करून नाही एवढंच आमचं म्हणण आहे .

विरोधासाठी विरोध करणारे विरोधक आम्ही न्हाई . ह्या चित्रपटाला आमच्या शुभेच्छा हायेत  हे नक्की पण चूका दुरुस्त  केल्यावर .हा चित्रपट ४०० काय ५०० कोटी कमवूदे आम्हाला आनंद  हाये . आमच्या मराठी साम्राज्याचा डंका परत एकदा जगभर वाजेल .पण  आहे त्या घोडचूका तशाच ठेऊन हा जर चित्रपट प्रसिद्ध झालाच  तर चुकीचा इतिहास इतिहास लोकांसमोर येईल .

असो , जाऊदे  ज्यादा इच्चार करून डोस्क्याची  मंडई  न्हाई करणार आता .  श्रीमंत खर सांगतो आम्हाला  आता ह्याची आता भीती वाटेनाशी झालीये … कारण असे भन्साळीचे किंवा अजून  कोणाचे छप्पन्न  चित्रपट येतील

पण आमच्या  मनातील श्रीमंत बाजीराव   एकच असतील , ते म्हणजे   मोंगल , निजाम , पोर्तुगीज ,  सिद्दी अशा सर्व  शत्रूंना  पुरून उरणारे आणि  मराठ्यांचा जरीपटका  आलम  हिंदुस्थानवर फडकवणारे  रणधुरंधर  श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे 

बहुत काय लिहिणे ?


आपला नम्र 

तात्या डोंगळे 
मु. पो. जर्मनी 
 ॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान

 

 

१० टिप्पण्या:

 1. त्यात्यानू … लैच भारी लेख लिवलायसा तुमि… यकदम भूमिकेतच शिरला जनू . लई दिसापास्नं सपाक वाचून कट्टाळलो हुतो … तुमचं लिखाण वाचून परत तोंडाला चव आली बगा . हितून पुढ पण असच मुद्द्याचं, मजेमजेचं लिवून समद्यांच मनोरंजन आनी परबोदन करावं ही नम्र इनंती …
  - समस्त ग्रामस्थ मंडळी, बोंबीलवाडी

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. पाटील, पाटील तुम्ही बोललात … लय झ्याक वाटलं आम्हास्नी … 'पाटलांचा हात डोक्यावर तर, झेंडा रोवू चंद्रावर ' असं आमचं दाजी नेहमी म्हणायच . परत एकदा धन्यवाद …

   आनी परबोदन कराय आम्ही पुढारी किंवा महात्मा न्हाई हो पाटील . आमी साडी मानसं . मनात , कधी काई अगदीच आपल्या कोल्हापुरी लाल रस्श्यावाणी उकळाय लागलं न्हाई , की आम्ही त्ये सांगून मोकळ व्हतो इतकंच . आणि तुमचं ब्लॉग आमी वाचतो बर का . तुमी म्हराठी बरोबर विंग्रजी मदी बी भारी लिवता एकदम .

   हटवा
 2. Sahi lihitos ti Ajit.....aani te Maharashtra karnataka bordercha marathi lai bhari...keep going...all da best

  उत्तर द्याहटवा
 3. अप्रतिम लेख.तू खरच Multitalented आहेस मित्रा

  उत्तर द्याहटवा
 4. अप्रतिम लेख Ajit.तू खरच Multitalented आहेस मित्रा.

  उत्तर द्याहटवा